दापोडी रेल्वे स्थानकात गैरसोयी
जुनी सांगवी, ता.९ ः दापोडी रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांना निरनिराळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहासह नियमित साफसफाईचा अभाव असून फलाटावर भटक्या श्वानांचा वावर आहे.
पिंपळे गुरव, जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे निलख आदी भागांतील विक्रेते, चाकरमानी आणि विद्यार्थी प्रवास करतात. स्थानकात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. स्वच्छतागृह तुंबलेले आहे. नियमित स्वच्छता होत नसल्याने स्थानकात अस्वच्छता पसरली आहे. स्थानकातील पिण्याच्या पाण्याचे कुलर बंद आहेत. रेल्वे स्थानकाकडे ये-जा करण्यासाठी असलेल्या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
प्रवासी परशुराम भाजल म्हणाले,‘‘रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना साध्या प्राथमिक सुविधा देखील पुरविण्यात येत नाहीत. दापोडी स्थानकाची प्रचंड दुरवस्था झाली आहे.’’