महापालिका, ‘ओंजळ’च्या वतीने टाकाऊ वस्तू संकलन केंद्र सुरू
जुनी सांगवी, ता. १२ : पर्यावरण संवर्धन आणि कचरा व्यवस्थापनाला प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ओंजळ फाउंडेशन यांच्या वतीने जुनी सांगवीत टाकाऊ वस्तू संकलन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे नागरिकांना घरगुती तसेच कार्यालयीन टाकाऊ वस्तू योग्य पद्धतीने जमा करण्यासाठी एक नवीन व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. संकलित वस्तूंमधील उपयुक्त साहित्य गरजू नागरिकांना संस्थेमार्फत वितरित करण्यात येते. नागरिकांनी घरातील तुटलेल्या खराब झालेल्या वस्तू, खेळणी, कपडे, इतर साहित्य कचऱ्यात टाकून न देता या संकलन केंद्रावर जमा करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
केंद्रावर जमा करता येणाऱ्या वस्तू
वर्तमानपत्रांचा कागद, लोखंडी वस्तू, ई-कचरा, इलेक्ट्रॉनिक साहित्य तसेच वापरात नसलेले कपडे व घरगुती साहित्य जमा करता येणार आहे. या वस्तूंचे वर्गीकरण करून पुनर्वापरासाठी पाठवले जाणार असून, काही वस्तू सामाजिक उपक्रमांत उपयोगात आणल्या जाणार आहेत.
उद्दिष्ट व फायदे
महापालिका अधिकाऱ्यांच्या मते, या केंद्राचा उद्देश म्हणजे ‘‘कचऱ्यातून पुनर्वापर ही संकल्पना रुजवणे आणि डंपिंग यार्डवरील ताण कमी करणे. योग्य वर्गीकरण व पुनर्वापरामुळे पर्यावरण संरक्षणाबरोबरच शहरातील स्वच्छतेलाही हातभार लागेल. फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांकडून नागरिकांना मार्गदर्शन तसेच जनजागृती मोहिमा राबवून सहभाग वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सामाजिक उपक्रमांना चालना
संकलनातून मिळणाऱ्या वस्तूंपैकी काही वस्तू गरजूंना पोचवण्यात येतात. या उपक्रमामुळे जुनी सांगवी परिसरातील स्वच्छता व्यवस्थापन मजबूत होण्याबरोबरच नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक जीवनशैलीची जाणीव निर्माण होणार आहे.
‘‘घरातील न वापरण्यायोग्य वस्तू फेकून देण्याऐवजी या केंद्रावर जमा करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे कचरा व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध होईल.
- चंद्रकांत बाराथे, अध्यक्ष, यश ज्येष्ठ नागरिक संघ
‘‘महापालिका व ओंजळ फाउंडेशनच्या वतीने सध्या चार प्रभागांत हे संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे. येणाऱ्या नागरिकांना कापडी पिशव्या वापरण्यासाठी प्रबोधन करण्यात येते. पिंपरी (मोरवाडी उद्यान), नवी सांगवी, पिंपळे गुरव (काटेपुरम व बॅडमिंटन हॉल), जुनी सांगवी (भाजी मंडई जवळ).
- पद्मिनी कांबळे, संस्थापक अध्यक्ष, ओंजळ फाउंडेशन
‘‘जुनी सांगवी येथे नागरिकांचा प्रतिसाद चांगला आहे. दररोज तीन ते सहा या वेळेत केंद्र सुरू आहे.
- सुनीता कांबळे, केंद्र प्रमुख, जुनी सांगवी