महापालिकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणार
पिंपरी, ता. ८ : ‘‘शहरात सध्या जॅकवेल, केबल, निविदांमधील रिंग केली जात आहे. भाजपची यादी पाहिली तर; अनेक जुने चेहरे दिसत आहेत. सध्या ‘इथं तूही खा, मीही खातो’, अशी अवस्था होती. शहरात होणाऱ्या भ्रष्टाचाराची प्रकरणे चव्हाट्यावर आणून विकासाचे ‘व्हिजन’ आम्ही मांडणार आहोत. यंदा बहुमताने सत्तेत बसण्याच्या निर्धाराने निवडणुकीत उतरलो आहे,’’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजयाचा निर्धार व्यक्त केला.
पिंपरी येथे गुरुवारी (ता. ८) आले असता ते माध्यमांशी बोलत होते. ‘‘देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून मतदान केले. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. सुरुवातीला बाहेरचा-गाववाला अशी परिस्थिती होती, मात्र नंतर ती बदलली. आम्ही मोठ्या प्रमाणात कामे करून येथे जागा मिळवली. आम्ही परिस्थिती बदलण्याचे प्रयत्न सातत्याने करत आहोत. मुंढवा जमीन प्रकरणात केवळ माझे नाव आले म्हणून विषय वाढवण्यात आला. मात्र, कागदोपत्री काहीही सिद्ध होणार नाही,’’ असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. तर, स्थानिक प्रश्नांवर पवार म्हणाले, ‘‘शहरात सध्या पाणी, कचरा, टँकर माफिया, बकालपणा हे गंभीर प्रश्न आहेत. पाण्याच्या व्यवस्थेसाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आमचा विचार आहे. ’
आधी चर्चा झाली असती, तर शिवसेनेशी युती
‘‘पिंपरी चिंचवड शहरात सुरुवातीपासून चर्चा झाली असती, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी युती केली असती. तरीही मला पूर्ण विश्वास आहे की आम्हाला निर्विवाद बहुमत मिळेल’’ असे पवार म्हणाले. तर, ‘‘आमदार रोहित पवार आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रचाराकडे पाठ फिरवलेली नसून ते वेळ देणार आहेत,’’ असे स्पष्ट करत ‘‘पूर्वीचा माझा स्वभाव आणि आजचा स्वभाव वेगळा आहे. पक्षाचा अध्यक्ष म्हणून सगळ्यांना सोबत घेऊन काम करावे लागते, हे आता कळले आहे. राजकारणात टीका होत असते. ते एका कानाने ऐकायची आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायची,’’ असे पवार म्हणाले.
भाजपमधील निष्ठावंत नाराज
भाजपमधील अंतर्गत नाराजीचा उल्लेख करताना पवार म्हणाले, ‘‘महापालिका निवडणुकीत उमेदवारीवरून निष्ठावंत भाजप कार्यकर्ते सध्या नाराज आहेत. त्यामुळे अनेक जण आमच्याकडे येत आहेत. गेल्या महापालिका निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट आणि ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांच्यासारखे आम्हाला सोडून गेल्याने फटका बसला,’’ असे पवार म्हणाले.
आर्थिक स्वार्थासाठी अनेकांनी साथ सोडली
‘‘महापालिकेत सत्ताकाळात मी अनेकांना विविध पदे दिली. त्यानंतर काही जणांना ताकद मिळाली. मात्र, चुकीच्या मार्गांतून पैसे मिळवू दिले नाही. त्यामुळे अनेकांना जबाबदारी पेलली नाही. आर्थिक ताकद दिली नाही, म्हणून अनेक जण माझी साथ सोडून दुसरीकडे गेले. त्यामुळेच आज घडी विस्कटली आहे,’’ असे पवार यांनी नमूद केले.
कामे पोचविण्यात स्थानिक नेते कमी पडले
‘‘महापालिकेत सत्ता असताना खूप कामे केली. मात्र, ती कामे जनतेपर्यंत पोचविण्यात स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते कमी पडले. त्यामुळे आता विरोधकांना जागे करायला मी आलो आहे. टीका करणारा किती पात्रतेचा आहे, हे पाहूनच ती मनावर किती घ्यायची हे ठरवले पाहिजे,’’ असे पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले...
- परिस्थिती पाहून जिल्हा परिषदेत शिवसेनेशी युती करायची किंवा नाही हे ठरवू
- शहरातील पदाधिकाऱ्यांना संधी दिल्यानंतर काम कसे करायला पाहिजे याचे आत्मचिंतन त्यांनी करावे
- महापालिका निवडणुकीत पार्थ पवार, जय पवार प्रचारासाठी येणार नाहीत
- यंदा महापालिका निवडणुकीत मी पूर्ण ताकदीने उतरलो आहे
- शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली, हे वास्तव आहे
- काही जण सुपारीबाज आहेत. त्यांना महत्त्व देण्याची गरज नाही
PNE26V83666
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

