अपुरा पाणीपुरवठा, त्यात विजेचाही लपंडाव
पिंपरी, ता. २७ : रावेत येथील जलवाहिनीच्या दुरुस्ती कामांमुळे सांगवी परिसरात पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. त्यातच वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे नागरिकांना गैरसोय सहन करावी लागत आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे चाकरमानी, कष्टकरी यांना विकतच्या पाण्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
जुनी सांगवी परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ‘‘ठरलेल्या वेळेत पाणी मिळत नसल्याने अनेक कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. काही भागांत कमी दाबाने पाणी येत असून अनेक ठिकाणी दिवसभर नळ कोरडे राहण्याची स्थिती आहे. तर, वीज खंडित झाल्यावर बोअरवेल पंप बंद पडत आहे. त्यामुळे यामुळे पाणी साठवणे अडचणीचे होत आहे. त्यामुळे महिलांना घरगुती कामांसाठी अडचणी येत आहेत. तर, कामावर जाणाऱ्यांचाही खोळंबा होत आहे. प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे निश्चित वेळापत्रक जाहीर करावे, दुरुस्ती कामे तातडीने पूर्ण करून सुरळीत पाणीपुरवठा सुरू करावा, तसेच वीजपुरवठा स्थिर ठेवावा, मागणी सांगवीकरांकडून केली जात आहे.
आमच्या परिसरात अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. यामुळे अनेकदा विकतच्या पाण्याचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागत आहे.
- निमिष कांबळे, रहिवासी, जुनी सांगवी
रावेत येथील मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती कामे सुरू होती. ती पूर्ण झाली आहेत. येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत सुरू होईल.
- साकेत पावरा, पाणीपुरवठा अभियंता, ‘ह’ प्रभाग

