प्रशासनाच्या ‘सौजन्या’ने उपासमार

प्रशासनाच्या ‘सौजन्या’ने उपासमार

Published on

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी ः टँकर उलटून तब्बल २८ तास होऊनही वाहतूक सुरळीत न झाल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. वाहन चालक, प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांना खाण्यापिण्याची, स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने प्रचंड गैरसोय झाली. प्रशासनाच्या ‘सौजन्या’ने उपासमार झाल्याची तीव्र प्रतिक्रिया अनेक प्रवाशांनी व्यक्त केली.
अनेक वाहन चालक मंगळवारी मध्यरात्रीचे बारा वाजल्यापासूनच कोंडीत अडकले होते. अनेक जण हतबल होऊन गाडी बंद करून रस्त्यावर बसले होते. एसटी, खासगी ट्रॅव्हल्समधून जाणारे प्रवासी किमान दहा ते बारा तास अडकले होते. महामार्गावर खाद्यपदार्थांची दुकाने किंवा हॉटेल नसल्याने प्रवाशांची उपासमार झाली.

विक्रेत्यांनी लुटले
वाहतूक कोंडीचा गैरफायदा घेत अनेक विक्रेत्यांनी पंधरा रुपयाचा वडापाव ३० रुपयांना, २० रुपयाची पाणी बाटली चाळीस रुपयाला, दहा रुपयाचा बिस्किटपुडा पंधरा रुपयांना विकून प्रवाशांची सर्रास लूट केली. विक्रेते महामार्गाच्यामधून वडापाव आणि इतर खाद्यपदार्थ चढ्यादराने विक्री करताना दिसून आले.
-----

कोल्हापूरवरून मुंबईला निघालो आहे. रात्री दोन वाजल्यापासून कोंडीत अडकलो आहे. रस्त्यावर कसलीच सोय नाही. प्रचंड मनस्ताप होत आहे.
- प्रकाश भोसले, ट्रक चालक
---

प्रशासन बुलेट ट्रेनच्या गप्पा मारत आहे. त्यांना साधा गॅसचा टँकर काढायला २७-२८ तास लागतात. पोकळ घोषणा करण्यापेक्षा वाहतुकीच्या पायाभूत सुविधा चांगल्या व्हाव्यात म्हणून प्रयत्न करा.
- अमित केदारी, नागरिक

सोलापूरहून भिवंडीला कंपनीचा माल घेऊन चाललो आहे. रात्री तीन वाजल्यापासून कोंडीत अडकलो असून अजूनही घाटातच आहे. प्रशासनाला वाहतूक कोंडी फोडण्यात अपयश आले आहे.
- संजय जोगदंड, ट्रक चालक
----

तीन तारखेला लग्नासाठी पुण्यात आले होते. बुधवारी बोरिवलीला परत जाण्यासाठी सकाळी सहा वाजता स्वारगेटवरून एसटीत बसले. सात वाजता उर्से टोल नाक्याजवळ पोहोचले. तेव्हापासून दुपारी दोन वाजले तरी टोल नाक्यावरच आहोत.
- अरुणा हंसाटे, प्रवासी

गेल्या आठ तासापासून वाहतूक कोंडीत अडकलो आहे. जवळपास कोणतेच दुकान किंवा हॉटेल नाही. त्यामुळे खाण्यापिण्याची काहीच सोय नाही. एक टँकर काढण्यासाठी प्रशासनाला इतका वेळ लागतो का ?
- राजेश चव्हाण, प्रवासी
------
आयआरबीकडे यंत्रणाच नाही..
गॅस, पेट्रोल आणि डिझेल वाहतूक करणारे टँकरही या महामार्गावरून ये-जा करतात. वाहन चालकांकडून दररोज कोट्यवधी रुपयांचा महसूल टोलच्या माध्यमातून आयआरबी कंपनीला मिळतो. पण, अपघात रोखण्यासाठी आणि अपघात झाल्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत वाहने काढण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. तज्ज्ञांचे पथक नाही. टॅंकर काढण्यासाठी लागणारा उच्च प्रतीचा बेल्टही नाही.
------

टोल वसुली सुरूच
अपघातानंतर वाहनांच्या ३० ते ४० किलोमीटर रांगा लागल्या होत्या. त्यामुळे कोंडीमुळे अगोदरच त्रस्त झालेल्या वाहन चालकांकडून आयआरबीने टोल वसुली सुरूच ठेवली होती. आयआरबीचे अधिकारी टोल वसुली बंद करत असल्याचे सांगत होते. प्रत्यक्षात टोल नाक्यावर सर्वच वाहन चालकांकडून सर्रास टोल वसूल केला जात होता.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com