महापालिका स्थायी समिती सदस्यांची आज निवड

महापालिका स्थायी समिती सदस्यांची आज निवड

Published on

पिंपरी, ता. १९ : महापालिका ‘तिजोरीच्या चाव्या’ अशी स्थायी समितीची ओळख आहे. तिच्या १६ सदस्यांसह विविध विषय समिती सदस्यांची निवड शुक्रवारच्या (ता. २०) सर्वसाधारण सभेत होणार आहे. विशेषत: स्थायी समितीवर कोणाची वर्णी लागते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपने महापौर, उपमहापौर आणि पक्षनेते पदांवर तिघांना संधी दिली आहे. आता स्थायी समितीसह विविध विषय समित्यांवर कोणाला संधी मिळते, याकडे शहराचे लक्ष लागले आहे. महापौर, उपमहापौर निवडीसाठी शुक्रवारी (ता. ६) आयोजित विशेष सभेनंतर झालेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत स्थायीसह विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, क्रीडा- कला-साहित्य व सांस्कृतिक या विषय समिती सदस्यांची निवड केली जाणार होती. मात्र, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर २० फेब्रुवारीपर्यंत सभा तहकूब करण्यात आली. ती सभा दुपारी एक वाजता होणार आहे. त्यात स्थायी समितीसह विषय समिती सदस्य निवड केली जाणार आहे. सदस्यांची संभाव्य यादी भाजपच्या कोअर कमिटीने प्रदेश समितीला पाठवली आहे. तर, विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने चार जणांची नावे निश्चित केली आहेत. शिवसेनेकडून एका सदस्याला संधी मिळेल.

अशी होईल निवड
स्थायीसह विषय समिती सदस्यांची निवड सर्वसाधारण सभेत ठरते. सत्ताधारी भाजप सदस्यांची नावे पक्षनेते प्रशांत शितोळे, राष्ट्रवादीची नावे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर व शिवसेना गटनेते विश्वजित बारणे शिवसेना सदस्याचे नाव बंद पाकिटातून पीठासीन अधिकारी तथा महापौर रवी लांडगे यांच्याकडे देतील, पीठासीन अधिकारी सदस्यांची नावे जाहीर करतील.


असा ठरतो कोटा
महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार स्थायी समितीत १६ सदस्य आहेत. निवडणुकीत जिंकलेल्या जागांच्या प्रमाणात पक्ष सदस्यांचा कोटा ठरवला जातो. त्यानुसार भाजपच्या वाट्याला ११, राष्ट्रवादीला चार आणि शिवसेनेला एक जागा मिळणार आहे. या १६ सदस्यांमधून एकाची अध्यक्षपदी निवड होईल.


भाजपकडून कोण?
महापालिकेत भाजपचे संख्याबळ अधिक आहे. पर्यायाने त्यांची स्थायीतील सदस्य संख्याही अधिक असेल. परिणामी, भाजपचाच अध्यक्ष होईल. त्यामुळे पक्षाच्या कोअर कमिटीने प्रदेश समितीला कोणाच्या नावांची शिफारस केली आहे? प्रदेश समिती कोणाला संधी देते? त्यात पक्षातील ज्येष्ठ, नवखे की निवडणुकीपूर्वी पक्षात आलेल्यांच्या नावाला पसंती मिळते, हे सभागृहातच कळणार आहे.


भाजप समतोल साधेल?
पूर्वाश्रमीचे भाजपचे असलेले मात्र मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस, नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात गेलेले आणि निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा भाजपमध्ये आलेले रवी लांडगे यांना पक्षाने महापौरपद, मूळच्या पक्षाच्या शर्मिला बाबर यांना उपमहापौरपद आणि निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून पक्षाते आलेले प्रशांत शितोळे यांना पक्षनेतेपद दिले आहे. आता स्थायीसह विषय समित्यांचे सदस्य व अध्यक्षपदी कोणाला संधी देतात? यात निष्ठावंत व अनुभवी सदस्य असतील? अननुभवी की निवडणुकीपूर्वी अन्य पक्षातून आलेल्यांचा समावेश असेल? पक्षीय समतोल साधण्यासाठी जुन्या, नव्यांचा समावेश असेल का? याची उत्सुकता आहे.

विषय समित्यांत शिवसेना नसेल
महापालिकेत विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, क्रीडा- कला-साहित्य व सांस्कृतिक या विषय समित्या आहेत. मात्र, त्यांची सदस्य संख्या प्रत्येकी ९ आहे. यात सभागृहातील संख्या बळानुसार पक्षीय कोटा ठरतो. म्हणजेच १२८ मधील १४.२२ सदस्यांमागे एक विषय समिती सदस्य असा कोटा आहे. त्यानुसार एक अपक्ष पुरस्कृतसह भाजपच्या ८५ सदस्यांमागे प्रत्येक विषय समितीत ५.९७ म्हणजे पूर्णांकात ६ आणि राष्ट्रवादीच्या ३७ सदस्यांमागे २.६० म्हणजे पूर्णांकात ३ सदस्य निश्चित झाले आहे. शिवसेनेचे सहाच नगरसेवक असल्याने त्यांना विषय समित्यांमध्ये स्थान नसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com