

बारा रुपये थकल्याचे सांगत दीड लाखांची फसवणूक
पिंपरी, ता. १३ : ‘‘बारा रुपयांसाठी गॅस कनेक्शन तोडले जाईल,’’ अशी भीती दाखवून सायबर चोरट्याने चिखली येथील एका व्यक्तीच्या क्रेडिट कार्डमधून एक लाख ५८ हजार ८०० रुपये लंपास केले. ही घटना चिखलीतील नेवाळे वस्ती येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी सायबर चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत संबंधिताने मंगळवारी (ता.१२) चिखली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘आरोपीने फिर्यादीला तुमचे बारा रुपयांचे गॅसचे बिल थकीत असून पेमेंट न केल्यास कनेक्शन कट होईल’’ असा बनावट मेसेज पाठवला होता. फिर्यादीने त्यावर विश्वास ठेवून आरोपीने पाठवलेली ‘‘बीआयएन एमएनजीएल बिल अपडेट’’ नावाची फाइल डाउनलोड केली. या ॲपमध्ये थकीत १२ रुपये भरण्यासाठी फिर्यादीने क्रेडिट कार्डची माहिती भरली असता, आरोपीने त्यांचा फोन हॅक केला. त्यानंतर त्यांच्या एका बँकेच्या क्रेडिट कार्डमधून चार वेगवेगळ्या व्यवहाराद्वारे एकूण एक लाख ५८ हजार ८०० रुपये परस्पर वर्ग करून आर्थिक फसवणूक केली.
गुंतवणुकीच्या नावाखाली बावधनमध्ये २८ लाखांचा गंडा
पिंपरी : शेअर मार्केट किंवा इतर गुंतवणुकीवर ५ ते २० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून बावधन येथील एकाची २८ लाख २६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित व्यक्तीने मंगळवारी (ता.१२) बावधन पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘१५ मार्च रोजी आरोपींनी फिर्यादी यांना फोन केला. आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना गुंतवणुकीवर १५ ते २० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यांच्या सांगण्यावरून फिर्यादीने एकूण २८ लाख २६ हजार रुपये गुंतवले. मात्र, आरोपींनी मूळ रक्कम किंवा त्यावर मिळणारा नफा परत न करता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली.
बँक खात्यातून सात लाख रुपये लंपास
पिंपरी : चुकीने दुसऱ्याच्या खात्यात गेलेले पैसे परत मिळवून देण्याच्या बहाण्याने एका महिलेचे बँक खाते हॅक करून ६ लाख ८७ हजार रुपये लंपास केले. हा प्रकार चिंचवडमध्ये घडला आहे. या प्रकरणी राजीव गुप्ता नावाच्या व्यक्तीसह तीन विविध बँकांच्या खातेधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्या महिलेने मंगळवारी (ता.१२) चिंचवड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादीने आपल्या मित्राला पैसे पाठवताना ते नजरचुकीने दुसऱ्याच्या खात्यात जमा झाले होते. ते परत मिळवण्यासाठी त्यांनी बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधला. त्यावेळी आरोपींनी आम्ही बँकेतून बोलत असल्याचे भासवून त्यांना विश्वासात घेतले. व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे फिर्यादीचा मोबाइल हॅक करून आणि ओटीपी देण्यास भाग पाडून आरोपींनी फिर्यादीची अन्य दोन बँकांची खाती हॅक करत पैसे लंपास केले.
क्रेडिट कार्डचा वापर करून फसवणूक
पिंपरी : क्रेडिट कार्डची माहिती चोरून सायबर चोरट्याने हिंजवडी येथील एकाची दोन लाख रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना ३ मे २०२६ रोजी दुपारी हिंजवडी फेज ३ येथील इवॉन होम्स सोसायटीमध्ये घडली. याप्रकरणी पीडित व्यक्तीने मंगळवारी (ता.१२) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘फिर्यादी हे आपल्या राहत्या घरी असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या क्रेडिट कार्डची माहिती मिळवून दोन ऑनलाइन व्यवहार केले. यामध्ये गिफ्ट कार्ड्स खरेदी करून एकूण दोन लाख रुपयांचा अपहार करण्यात आला. फिर्यादीने यापूर्वी सायबर पोर्टलवर तक्रार केली होती, त्यावरून आता हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
‘एपीके फाईल’ पाठवून चार लाखांची फसवणूक
पिंपरी : आरटीओ चलन भरण्यासाठी आलेली एपीके फाइल डाउनलोड करणे हिंजवडीतील तरुणाला महागात पडले आहे. हिंजवडी येथील व्यक्तीच्या बँक खात्यातून आरोपीने तीन लाख ९८ हजार ५०० रुपये लंपास केले. ही घटना माण, ता. मुळशी येथील बोडकेवाडी परिसरात घडली. फसवणूक झालेल्या व्यक्तीने मंगळवारी (ता.१२) हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपीने फिर्यादीच्या मोबाइलवर ‘आरटीओ चलन’ भरण्याची एपीके फाइल’ पाठवली होती. आपल्या गाडीचे कोणतेतरी चलन थकीत असावे, या समजुतीने फिर्यादीने ती फाईल डाउनलोड केली. त्यानंतर फिर्यादीला ओटीपी आला आणि त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून तीन लाख ९८ हजार ५०० रुपये कापले गेले.
किरकोळ वादातून तिघांना बेदम मारहाण
पिंपरी : जुन्या वादाचा राग मनात धरून चौघांनी मिळून तिघांना दांडके आणि विटांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (ता.११) रात्री येलवाडी येथे घडली.
या प्रकरणी सार्थक पाडळे, आशिष माने आणि सिद्धार्थ लांघे ((सर्व रा. देहूगाव, ता. हवेली) यांना पोलिसांनी अटक केली असून तोहीत इनामदार अद्याप फरार आहे. याबाबत जखमी तरुणाने दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आकाश ढेरंगे याचा प्रशांत जाधव याच्याशी किरकोळ वाद झाला होता. याच रागातून ११ मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास आरोपींनी फिर्यादी, आकाश ढेरंगे आणि प्रसाद म्हस्के यांना अडवून मारहाण केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.