मैलामिश्रित पाणी थेट पवनेच्या पात्रात

मैलामिश्रित पाणी थेट पवनेच्या पात्रात

पिंपळे गुरव, ता. २९ : पिंपळे गुरवमधील कै. बट्टूराव जगताप उद्यानाशेजारील पार्किंग खालून गेलेल्या स्ट्रॉमवाटरच्या लाइनमधून चेंबर फुटल्याने मैलामिश्रित पाणी थेट पवना नदीपात्रात मिसळत आहे. त्यामुळे घाणीच्या साम्राज्याने व दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. एकीकडे नदी स्वच्छता अभियान राबविले जात आहे. दुसरीकडे महापालिका प्रशासन अशा समस्येकडे दुर्लक्ष करीत आहेत. तसेच पिंपळे गुरव, नवी सांगवी, जुनी सांगवी या भागाला जोडणारी पवनानदी पात्रात मैलामिश्रित पाणी मिसळत आहे.

चेंबर फुटून नदी प्रदूषण वाढत आहे. याकडे महापालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत, अशी तक्रार येथील स्थानिक रहिवासी करीत आहेत. पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकाला लागूनच अनेक नागरी वसाहती आहेत. मलःनिस्सारणाची समस्या सोडविण्यासाठी या भागात सांडपाणी चेंबर्स उभारले मात्र, ड्रेनेजमध्ये गळती होणाऱ्या गळतीमुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे.

दुरुस्तीची मागणी
सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरातून अनेक नागरिक ये-जा करीत असतात. पण; घाण पाण्यामुळे येणाऱ्या दुर्गंधीमुळे नदीकिनारी उभे राहणे मुश्कील झाले आहे. सृष्टी चौकातील पार्किंग जवळ ड्रेनेजचे मलमिश्रीत पाणी हजारो लिटर पवना नदीत मिसळत आहे. फुटलेल्या चेंबरची पाहणी करून ती दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पिंपळे गुरव येथील पवनानदी पात्रात दूषित पाणी जात असल्याने येथील नदी दूषित होऊन परिसरात डासांचे साम्राज्य वाढले आहे त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे.

या ठिकाणचे काम हे स्मार्ट सिटी अंतर्गत झाले आहे. स्मार्ट सिटीशी चर्चा करून स्ट्रॉमवाटर लाइनमधून मैलामिश्रित पाणी येत असेल तर तातडीने त्याचा शोध घेऊन मैलामिश्रित पाण्याचा प्रवाह बंद करण्यात येईल.
- संजय काशीद, उपअभियंता जलनिस्सारण विभाग.

पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकातील पार्किंगच्या खालून मैलामिश्रित पाणी सोडले जाते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. याकडे मात्र, महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
- तृप्ती साबळे, गृहिणी, पिंपळे गुरव

या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. तसेच, डासांमुळे येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे. महापालिका प्रशासनाने तत्काळ याकडे गांभीर्याने लक्ष घालून कारवाई केली पाहिजे.
- शंतनू डोळस, स्थानिक नागरिक, पिंपळे गुरव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com