पाणी बचतीसह पर्यावरण संवर्धनाला हातभार

पाणी बचतीसह पर्यावरण संवर्धनाला हातभार

Published on

विजय गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा

पिंपळे सौदागर, ता.५ ः येथील नाशिक फाटा ते कोकणे चौक बीआरटी रस्त्यालगत वसलेली ‘गणेशम -२’ सोसायटी तिच्या विविध उपक्रमांच्या माध्यमांतून सामाजिक अन् सांस्कृतिक स्नेह जपणारी टाऊनशिप म्हणून ओळखली जाते. रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे सोसायटीमध्ये आता पाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे. सोसायटीला आता टँकरची आवश्यकता राहिलेली नाही. पाण्याच्या बचतीबरोबरच पर्यावरण संवर्धनाला हातभार लागला आहे.
पिंपळे सौदागर येथील गणेशम- २ सोसायटीत ‘ए’ ते ‘आय’ अशा नऊ विंग आहेत. त्यातील तब्बल ४३० सदनिकांमध्ये दीड हजारांहून जास्त नागरिक गुण्यागोविंदाने राहात आहेत. विविध झाडे असलेल्या पर्यावरणाच्या सानिध्यात प्रशस्त पार्किंग, घनकचरा व्यवस्थापन, सौरऊर्जा प्रकल्पांसह पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम राबविले जात आहेत. वर्षभरामध्ये सामाजिक सलोख्याचे संस्कार तरुणाईवर रुजविण्यासाठी राष्ट्रीय सणांसोबत विविध उत्सव देखील तितक्याच उत्साहात साजरे केले जातात.

श्रमदानाने परिसराची स्वच्छता
गणेशम-२ सोसायटीमध्ये घनकचरा संकलनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे. महापालिकेच्या स्वच्छता अभियानात सक्रीय सहभाग घेत सोसायटी परिसर अत्यंत स्वच्छ व कचरामुक्त ठेवला जातो. ज्येष्ठांसह लहान मुलांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता असून श्रमदानातून परिसर स्वच्छ केला जातो.

सौरउर्जा प्रकल्प पूर्ण
महावितरणच्या वीजपुरवठा असला तरी सौरउर्जेचा वापर करून प्रायोगिक तत्त्वावर सौरउर्जा वीजनिर्मिती प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला आहे. वीजबील कमी करण्यासाठी पारंपरिक उर्जा स्त्रोतांचा वापर करण्यास सर्वांनी पुढाकार घेतला आहे. या योजनेनुसार, शंभर टक्के सौरउर्जेवर आधारित वाहनतळासहीत सर्व ठिकाणी वीजपुरवठा करण्यात येत आहे.

पावसाद्वारे भूजल पुनर्भरण
मागील दहा वर्षांपासून सोसायटीमध्ये रेन हार्वेस्टिंग प्रणाली यशस्वीपणे कार्यान्वित आहे. पावसाच्या पाण्याचा योग्य साठा करून भूजल पुनर्भरण होत आहे. त्यामुळे, पिण्याचे व इतर आवश्यकतेचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. सोसायटीला आता टँकरची आवश्यकता उरली नाही. रेन हार्वेस्टिंगने पाण्याचा खर्च कमी झाला आहे. सोसायटीमधील पाण्याची कमतरता आता मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे.

विविध भागांत सीसीटीव्ही कार्यरत
प्रत्येक इमारतीत येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींची नोंद नियमितपणे ठेवली जाते. इमारतीच्या विविध भागांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले असतात. रात्रीच्यावेळी अतिरिक्त सुरक्षा उपाय लागू केले जातात. वेळोवेळी सुरक्षा तपासणी आणि प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे, रहिवाशांना चोरीचे प्रकार रोखण्यात यश आले आहे.

वृक्षारोपण अन् वृक्षसंवर्धन
दरवर्षी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने वृक्षारोपण व संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम राबविला जातो. सोसायटीमध्ये २५ ते ३० फुटांची विविध प्रकारची दोनशेहून जास्त झाडे लावण्यात आली आहेत. त्याचे संवर्धन केल्यामुळे उन्हाळ्यातही थंडगार हवा आणि आल्हाददायक वातावरण निर्माण होत असते.


विविध सांस्कृतिक कार्यक्रम
प्रजासत्ताक दिनानिमित्त आरोग्य शिबिर भरविले जाते. सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकाच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात येते. गणेशोत्सवामध्ये अनेक स्पर्धा घेतल्या जातात. स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्टला लहान मुलांची देशभक्तीवरील गाणी, भाषणे आयोजित केली जातात. नवरात्राच्या काळात रोज सर्व महिला भगिनी एकत्र येऊन नवरात्र उत्सव साजरा करतात. यामध्ये दांडिया, गरबा असे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात.

सोसायटीचा वर्धापन दिन
फेब्रुवारी महिन्यात सोसायटीचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा
केला जातो. या दिवशी गायत्री यज्ञ आणि सत्यनारायण पूजेचे आयोजन केले जाते. सोबतच गरिबांना अन्नदान केले जाते. त्याद्वारे समाजसेवेचा संदेश दिला जातो. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होतो. हा सोहळा सोसायटीतील एकात्मतेचे आणि धार्मिक भावनांचे प्रतीक आहे.

रहिवासी म्हणतात....
आमची सोसायटी खरंच आदर्श सोसायटी आहे. येथे पर्यावरणपूरक उपक्रमांवर विशेष भर दिला जातो. जलसंधारण, प्लेट बँक यासारखे कार्यक्रम प्रभावीपणे राबवले जातात. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत आणि स्त्री-पुरुष सर्वांचाच उत्स्फूर्त सहभाग असतो.
- रेखा पाबळकर

आमच्या सोसायटीत सर्वधर्मीय सण मोठ्या उत्साहात साजरे होतात. गणेशोत्सव, नवरात्र, कोजागिरी, दिवाळी पहाट, नवीन वर्ष स्वागत, २६ जानेवारी, पंजाबी लोहडी, होळी, मकरसंक्रांती यासारखे विविध सण मोठ्या उत्साहाने साजरे होतात. महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजनही होते.
- अनिल रतनलाल लखोटे

ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र क्लब आहे. त्यामध्ये त्यांचे वाढदिवस आणि बैठका आयोजित केल्या जातात. सोसायटीत अंध व्यक्तींनाही विशेष काळजीने सांभाळले जाते. विरंगुळा केंद्र म्हणून कॅरम क्लब देखील आहे.
- अंबादास दुडका

आमची सोसायटी ही आगळीवेगळी असून, येथील सिद्धीविनायक मंदिरात महिलांचे भजन चालते. त्यामुळे सोसायटीतील वातावरण सतत आनंदी व शांत असते. सोसायटीच्या आवारात दोनशेहून अधिक वृक्ष असून त्यामुळे, पर्यावरण शुद्ध राहण्यास मदत मिळते.
- तुकाराम पवार

सोसायटीतील मंदिरात महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. सर्व स्त्रिया त्यात सक्रीय सहभाग घेतात. सोसायटी स्वच्छ व सुंदर ठेवण्यावर विशेष लक्ष दिले जाते. तसेच प्रत्येकाच्या कलागुणांना वाव देऊन एकमेकांना प्रोत्साहित केले जाते.
- सुनेत्रा कुलकर्णी

आमच्या आदर्श सोसायटीत सदैव आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असते. सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन सण-समारंभ साजरे करतात. येथील फन फेअर कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहाने पार पडतो.
- विलासिनी (निशा) कुलकर्णी

ओला व सुका कचरा व्यवस्थापन सोसायटीतच केले जाते. कॉमन विंग्ज सोलर सिस्टमवर चालवली जात असल्यामुळे वीज बिलात बचत होते. गेल्या १० वर्षांपासून सोसायटीला २४ तास पाणीपुरवठा असून पाण्याच्या टँकरची कधीही आवश्यकता पडलेली नाही.
- सागर लढ्ढा, सचिव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com