सकारात्मक दृष्टिकोन, सांस्कृतिक स्नेहाची जपणूक
आमची सोसायटी, आमचे उपक्रम
श्रीनिवास वेस्ट साईड काउंटी, पिंपळे गुरव
विजय गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
पिंपळे गुरव, ता. २१ ः पिंपळे गुरव येथील कांकरिया गॅस गोदाम ते सृष्टी चौक येथे रस्त्यालगत वसलेली श्रीनिवास वेस्ट साईड काउंटी सोसायटी तिच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून सर्वधर्मसमभाव अन् सांस्कृतिक स्नेह जपणारी सोसायटी म्हणून ओळखली जाते. सोसायटीकडून पर्यावरणपूरक उपक्रम राबविले जात असून त्यात वृक्षारोपण, सौरउर्जा, घनकचरा व्यवस्थापन आदींचा समावेश आहे.
श्रीनिवास वेस्टसाईड काउंटी सोसायटी बारा मजली आहे. तिच्या नऊ विंगमध्ये तब्बल ४२३ सदनिकांमध्ये १,५०० हून जास्त नागरिक गुण्यागोविंदाने राहात आहेत. विविध प्रकारच्या २५० झाडे असलेल्या पर्यावरणाच्या सानिध्यात प्रशस्त वाहनतळ आहे.
घनकचरा व्यवस्थापन
सोसायटीमध्ये घनकचरा संकलनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे. सुका कचरा महापालिकेला दिला जातो व ओल्या कचऱ्यासाठी स्वतःचे युनिट असून त्यात खत तयार होते. महापालिकेच्या स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेत सोसायटी परिसर अत्यंत स्वच्छ व कचरामुक्त ठेवला जातो. ज्येष्ठांसह लहान मुलांना स्वच्छतेबाबत जागरूकता असून श्रमदानातून परिसर स्वच्छ केला जातो.
सौरऊर्जा प्रकल्प यशस्वी
महावितरणचा वीजपुरवठा असला तरी सौरऊर्जेचा वापर करून प्रायोगिक तत्त्वावर १२० किलो वॅटची सौरउर्जा निर्मिती प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला आहे. वीजबील कमी करण्यासाठी पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करण्यास सर्वांनी पुढाकार घेतला आहे. या योजनेनुसार, शंभर टक्के सौरऊर्जेवर आधारित वाहनतळ प्रकाश व्यवस्था, पाण्याच्या मोटारीसह सर्व ठिकाणी वीजपुरवठा करण्यात येतो. जलपुरर्भरण यंत्रणेसाठी आता प्रयत्न केले जात आहेत.
सजग सुरक्षा यंत्रणा
प्रत्येक इमारतीत रोजच्या आधारावर रखवालदार उपस्थित असतो. अभ्यागत व्यक्तींची नोंद नियमितपणे ठेवली जाते. बाहेरील व्यक्तींना इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी नोंदणी करावी लागते. इमारतीच्या विविध भागांत १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. रात्रीच्यावेळी अतिरिक्त सुरक्षा उपाय लागू केले जातात. वेळोवेळी सुरक्षा तपासणी आणि प्रशिक्षण दिले जाते. यामुळे चोरीचे प्रकार रोखले जात आहेत.
वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन
दरवर्षी विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने वृक्षारोपण व संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम राबविला जातो. विविध प्रकारची साडेतीनशेहून जास्त झाडे सोसायटी परिसरात लावण्यात आली आहे. त्याचे संवर्धन केल्यामुळे उन्हाळ्यातही थंडगार हवा आणि आल्हाददायक वातावरण निर्माण होत असते.
सांस्कृतिक कार्यक्रमांचा उत्साह
राष्ट्रीय सणांसोबत शिवजयंती, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, रामनवमी आणि विविध महापुरुषांच्या जयंती, महिलांसाठी भोंडला देखील तितक्याच उत्साहात साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात येते. गणेशोत्सवात मुले व महिलांसाठी विविध स्पर्धा घेतल्या जातात. स्वातंत्र्यदिनानिमित्त लहान मुलांची देशभक्तीवरील गाणी, गुणवंत मुले व पालकांचा सत्कार केला जातो. नवरात्र उत्सवामध्ये दांडिया, गरबा असे सांस्कृतिक कार्यक्रम होतात. दिवाळीत लक्ष्मीपूजनासाठी एकत्र येऊन पूजा केली जाते. शिवजयंतीला शिवाजी महाराज यांना अभिवादन व पोवाड्याचा कार्यक्रम घेतला जातो. मनोरंजनात्मक खेळासाठी ‘सुपर ओवर एक्स टू’ अशी स्पर्धा भरवली जाते. वर्षातून एकदा या स्पर्धा संपन्न होतात.
आमची सोसायटी ही आमच्यासाठी नुसतेच घर नाही; तर आमचा अभिमानाचा विषय आहे. सोसायटीमध्ये आम्ही सामाजिक,
कौटुंबिक कार्यक्रमांत सर्व घटकांना सहभागी करण्याचा प्रमाणिक प्रयत्न करतो.
- सुजित सावंत, सचिव, श्रीनिवास वेस्ट साईड काउंटी, पिंपळे गुरव
सर्व सुविधा सुस्थितीत चालू आहेत. सुरक्षेसाठी सुरक्षा यंत्रणा दिवस-रात्र पाळीत कार्यरत आहे. अद्ययावत व्यायामशाळा, जलतरण तलाव, योग वर्ग व क्रिकेट क्लब यामुळे खेळीमेळीचे वातावरण असते. अशा सोसायटीत राहण्याचा सार्थ अभिमान आम्हा सर्वांस आहे.
- ज्ञानेश्वर यादव, अध्यक्ष, श्रीनिवास वेस्ट साईड काउंटी, पिंपळे गुरव
सर्व सदस्य दैनंदिन कामकाज सांभाळून कौटुंबिक वातावरणात व सुख दुःखात सोबत येतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्व सोयी सुविधा सोसायटीकडून दिल्या जातात. सहलीचे विनामूल्य आयोजन केले जाते.
- मनोहर वाघाडे, ज्येष्ठ नागरिक, सदस्य
आमची सोसायटी एक छोटे गाव असल्यासारखे आहे. सर्वजण एकमेकांना साथ देत काळजी घेतात. सर्व सलोख्याचे वातावरण ठेवतात. अतिशय उत्साहाने सर्व महिला सर्व कार्यक्रमांमध्ये सर्व वयोगटातील महिला सहभागी होत असतात. या सर्व गोष्टींमुळे आमची सोसायटी पिंपळे गुरवमध्ये एक आदर्श सोसायटी आहे.
- उज्वला गोरे, संचालिका
सोसायटीचे वातावरण सुंदर आहे. कार्यकारी मंडळ सर्वांना सोबत घेऊन चालते. विविध उपक्रम राबवले जातात. राष्ट्रपुरुषांच्या जयंती, गणपती उत्सव, नवरात्र उत्सव हे एकत्र येऊन साजरे केले जातात.
- नंदकिशोर गिरी, सदस्य
आमची सोसायटी सर्वोत्तम सोसायटी आहे. महिलांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यासाठी हॉलची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
- रत्नमाला वाणी, भजनी मंडळ, सदस्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.