विज्ञानाच्या ‘वटवृक्षा’खाली अंधश्रद्धेची छाया

विज्ञानाच्या ‘वटवृक्षा’खाली अंधश्रद्धेची छाया

Published on

पिंपळे गुरव, ता. २५ : नवी सांगवीतील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात अंधश्रद्धेचा एक धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. रुग्णालय वसाहतीसमोर आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयालगत असलेल्या वडाच्या झाडावर लाल कापडात उडीद, बिया आणि नारळ बांधलेले आढळून आले. या प्रकारामुळे परिसरात आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे.
जिल्हा रुग्णालय आणि त्याच्यालगतच विज्ञान शाखेचे महाविद्यालय आहे. या परिसरात रुग्णांवर विज्ञानाधारित वैद्यकीय उपचार आणि शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले जात असताना अशा ठिकाणी जादूटोणा व अंधश्रद्धेचे प्रकार सर्रासपणे दिसून येत असतील; तर ते चिंताजनक आहे, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. वडाच्या झाडाला खिळे ठोकून लाल कापडात वस्तू बांधण्यात आल्या असून त्यामुळे झाडाच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. झाडाची वाढ खुंटणे किंवा ते वाळण्याची शक्यता निर्माण होत आहे. भूतबाधा घालवणे, करणी तोडणे, असाध्य आजार बरे करणे, कमी मेहनतीत पैसा मिळवणे अशा भूलथापांना बळी पडणारे लोक कमी नाहीत. शिक्षण वाढले असले तरी विचारसरणीत बदल झाला नाही तर; अशा प्रकारांना रोखता येणार नाही, अशी प्रतिक्रिया या भागातील नागरिक व्यक्त करत आहेत.
या घटनेबाबत अद्याप प्रशासनाकडे कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. मात्र, परिसरातील जागरूक नागरिकांमध्ये या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त होत असून जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कारवाई व्हावी, अशी मागणी काही नागरिकांमधून होत आहे.

नागरिकांच्या मागण्या...
- जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत कठोर कारवाई करावी
- जिल्हा रुग्णालय परिसरात सीसीटीव्ही बसवावेत
- अंधश्रद्धाविरोधी जनजागृती मोहिमा राबवाव्यात
- शाळा-महाविद्यालयांत विज्ञानवादी कार्यक्रम घ्यावेत
- स्थानिक पोलिस गस्त वाढवावी
- भोंदूबुवाविरोधात तक्रार नोंदवावी
- पर्यावरण विभागाने झाडांचे संरक्षण करावे


शहरांसोबतच ग्रामीण भागातही असे अनेक जादूटोण्याचे गैरप्रकार होताना दिसून येतात. आमच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे समाजामध्ये सातत्याने प्रबोधन चालू आहे. झाडाला खिळे मारणे, कापड बांधणे, बाहुल्या बांधणे असे गैरप्रकार दिसून येतात. त्यामध्ये झाडाची, पर्यावरणाचीही हानी होत असून समाजामध्ये भोंदूगिरींची विकृती वाढते. त्यामुळे अशा जादूटोणासारख्या अंधश्रद्धेच्या प्रकारांना नागरिकांनी बळी पडू नये.
- मिलिंद देशमुख, राज्य कार्यकारिणी सदस्य, अंधश्रद्धा निर्मूलन समिती
PMG25B02525

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com