सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची ‘नजर’ धूसरच
विजय गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
पिंपळे गुरव, ता. ७ ः स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बसवलेले निम्म्याहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे सध्या बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे नवी सांगवी, पिंपळे गुरव आणि पिंपळे सौदागर परिसरातील सार्वजनिक सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. या भागातील अंदाजे ४० ते ५० टक्के कॅमेरे सध्या काम करत नाहीत.
पिंपळे गुरव आणि पिंपळे सौदागर परिसरात अनेक रहिवासी सोसायट्या असून तेथे वाहतूक आणि सुरक्षेचे अनेक प्रश्न आहेत. या पार्श्वभूमीवर, स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येक मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. त्याद्वारे अपघात, वाहनचोरी, सोनसाखळी चोऱ्या, रस्त्यावरील भांडणे आणि दुकानांतील चोरी यासारख्या गुन्ह्यांच्या तपासात पोलिस दलाला मदत होणे अपेक्षित होते. मात्र, सध्या या कॅमेऱ्यांपैकी निम्म्याहून अधिक कॅमेरे बंद असल्याने गुन्हा घडल्यानंतर पुरावे मिळणेच कठीण झाले आहे. त्यामुळे गुन्हेगारांना शोधणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे पोलिसांना कठीण बनत आहे.
नियमित देखभालीचा अभाव
रस्त्याच्या कामांमुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहेत. मात्र, रस्ते, गटारे, स्मार्ट पथदिवे यासारख्या इतर योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करता येतात. तेव्हा, महत्त्वाच्या सुरक्षा व्यवस्थेची नियमित देखभाल का होत नाही ? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. अनेक ठिकाणी स्मार्ट सिटीचे फलक झळकत असताना सीसीटीव्ही कॅमेरे दिसत आहेत. मात्र प्रत्यक्षात ते बंद आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीची भावना आहे.
बहुतांश कॅमेरे बंदच
पिंपळे गुरव परिसरात सध्या २७ ठिकाणी आणि पिंपळे सौदागरमध्ये ७९ ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यातील बहुतांश कॅमेरे बंद असल्याची माहिती स्मार्ट सिटीच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. परिणामी, या भागांतील अर्ध्याहून अधिक परिसर कोणत्याही देखरेखीखाली नाही, ही बाब अत्यंत गंभीर आहे. शहरात गुन्हेगारी वाढू नये, यासाठी सीसीटीव्ही नेटवर्क सुरळीत चालू राहणे आवश्यक आहे.
‘एआय’युक्त कॅमेरे लावा
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दुरुस्ती करताना कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) समावेश असलेले नवीन तंत्रज्ञानयुक्त कॅमेरे बसवले जावेत. त्यामुळे गुन्हेगार जलद ओळखता येतील आणि पोलिसांना तपासामध्ये मदत होईल, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.
शहरातील स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे पूर्वी वेगवेगळ्या कंत्राटदारांच्या देखरेखीखाली होते. त्यामुळे त्यांच्या देखभाल व व्यवस्थापनामध्ये समन्वयाचा अभाव होता. तसेच सुनियोजितपणे कामकाज होण्यात अडथळे निर्माण होत होते. मात्र, आता हे सर्व कॅमेरे स्मार्ट सिटीच्या अखत्यारीत आणण्यात आले असून एकत्रित तांत्रिक यंत्रणा तयार करण्यात आली आहे. सध्या स्मार्ट सिटीच्या तांत्रिक विभागाच्या विशेष पथकाकडून नादुरुस्त कॅमेऱ्यांची दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे. लवकरच सर्व कॅमेरे पुन्हा कार्यान्वित करण्यात येतील. शहरात एकूण २ हजार २२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले असून त्याच्या माध्यमातून शहराच्या सुरक्षा व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होईल.
- विजय कन्नन, महाव्यवस्थापक, स्मार्ट सिटी
शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे नेमके कोणत्या विभागाचे आहेत ? हे स्पष्ट नाही. चोरी, अपघात झाल्यास नागरिकांना संपर्कासाठी अडचण येते. त्यामुळे प्रत्येक कॅमेऱ्याच्या खांबावर संबंधित विभागाचे नाव आणि संपर्क क्रमांक असलेला फलक लावणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेवर मदत मिळू शकेल.
- संजय मराठे, नागरिक, पिंपळे गुरव
सीसीटीव्ही कॅमेरे लावले हे चांगले आहे. पण त्याचा उपयोगच होत नसेल तर काय फायदा ? पिंपळे सौदागरमध्ये काही घटना घडल्यावर कॅमेऱ्याचे फुटेज विचारले; तेव्हा कोणीच ठोस उत्तर देऊ शकले नाही. कॅमेरा कुणाचा आहे, हेच समजत नाही. ही व्यवस्था पारदर्शक असावी.
- संदीप काटे, नागरिक, पिंपळे सौदागर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.