
पिंपळे गुरव, ता. १४ ः पिंपळे गुरव येथील कवडेनगर ते कांकारिया गॅसकडे जाणाऱ्या मार्गावर एचडीएफसी बँकेजवळील परिसरात दररोज वाहनचालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. दोन्ही बाजूंनी ‘नो-पार्किंग’ असतानाही बिनधास्तपणे वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
बेशिस्त वाहतूक व नो-पार्किंगमध्ये उभी वाहने यामुळे हा रस्ता अपघातप्रवण बनला आहे. नेहमीच गजबजलेल्या या रस्त्यावर ‘नो-पार्किंग’चे फलक लावण्यात आले असले; तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कुठेच होताना दिसत नाही. बँकेच्या बाहेर दोन्ही बाजूंनी दुचाकी व चारचाकी वाहने बिनधास्तपणे उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहनचालकांना रस्ता ओलांडणे तर दूरच पुढे जाणेही कठीण होत आहे. नेहमी वाहतूक कोंडी होत असताना देखील वाहतूक पोलिस येथे अनुपस्थित असतात.
रस्त्यावर वाहनांची संख्या वाढत असताना पार्किंगसाठी पुरेशा जागा नसल्याने वाहनचालक बेशिस्तपणे रस्त्यावरच वाहने लावतात. दररोज सकाळ-संध्याकाळ कार्यालये आणि शाळांच्यावेळात वाहतुकीचा खोळंबा होऊन अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दररोज सकाळी आणि संध्याकाळी इथे प्रचंड वाहतूक कोंडी होते. ‘नो-पार्किंग’मध्ये वाहने लावून काही जणांचा स्वार्थ पूर्ण होतो. पण, त्याचा त्रास हजारो वाहनचालकांना सहन करावा लागतो. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून हा प्रश्न कायमचा मिटवावा.
- राज पवार, दुचाकी चालक
लवकरच त्या परिसराची पाहणी करून ‘नो-पार्किंग’मध्ये उभी वाहने हटविण्याची तसेच संबंधित वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याची कार्यवाही केली जाईल.
- प्रदीप पाटील, पोलिस निरीक्षक वाहतूक
PMG25B02589