बहुतेक अधिकाऱ्यांची दांडी; जनसंवाद सभेत नाराजीचे सूर

बहुतेक अधिकाऱ्यांची दांडी; जनसंवाद सभेत नाराजीचे सूर

Published on

पिंपळे गुरव, ता.१५ ः महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयात तब्बल तीन आठवड्यांनंतर सोमवारी (ता.१४) जनसंवाद सभा पार पडली. मात्र या सभेला काही मोजक्या अधिकाऱ्यांचा अपवाद वगळता क्षेत्रीय अधिकारी, मुख्य समन्वय अधिकारी यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी, विविध विभागांतील मुख्य अधिकाऱ्यांनी दांडी मारली. तक्रारींचे निराकरण न झाल्याने अर्जदार नागरिक नाराजी व्यक्त करत सभेतून बाहेर पडताना दिसून आले.
महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयात तब्बल तीन आठवड्यानंतर जनसंवाद सभा पार पडली. याआधी २३ जून रोजी जनसंवाद सभा झाली होती. या सभेच्या तक्रारींचे निरसन उपअभियंता (स्थापत्य) रवींद्र सूर्यवंशी यांनी केले. सभेत क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असणारे नागरिक हे तळमळीने आपल्या वैयक्तिक तक्रारी घेऊन येत असतात. या तक्रारींचे निरसन त्वरित होण्यासाठी आतूर असतात. अशा वेळी जनसंवाद सभेलाच क्षेत्रीय अधिकारी, मुख्य समन्वय अधिकारी उपस्थित न राहता आयुक्तांच्या परवानगीविना इतर ठिकाणी तातडीच्या बैठकीला गेल्याचे सांगण्यात आले.
त्यामुळे नागरिकांनी खेद व्यक्त केला. अधिकाऱ्यांना कर भरणाऱ्या नागरिकांचे प्रश्न महत्त्वाचे वाटत नसून तातडीची बैठक अत्यंत महत्वाची वाटत असल्याचा आरोप त्यांनी केला. महिन्यातून केवळ दुसऱ्या आणि चौथा सोमवारी जनसंवाद सभा पार पडत असते. कोणत्याही परिस्थितीत जनसंवाद सभेला क्षेत्रीय अधिकारी आणि मुख्य समन्वय अधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे सक्त आदेश आयुक्तांनी याआधी दिलेले आहेत. तरी देखील आयुक्तांचे आदेश धुडकावत कुणाची परवानगी घेत अत्यंत तातडीच्या बैठकीला येथील अधिकारी वर्ग गेले ?, असा सवाल तक्रारदार नागरिकांकडून होत आहे.

तक्रारदारांचा हिरमोड
जनसंवाद सभेला सोमवारी एकूण १६ तक्रारदार उपस्थित होते. याआधी जनसंवाद सभेला इतके तक्रारदार कधीच उपस्थित नव्हते. मात्र, सध्या पावसाळा सुरू असल्याने गटारे तुंबणे, झाडांच्या फांद्या छाटणे, अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, रस्त्यांवरील खड्डे, पाणी, आरोग्य, कचरा यासारखे आदी प्रश्नांच्या तक्रारी घेऊन नागरिक आले होते. मात्र, संबंधित विभागांचे बहुतांश अधिकारी जनसंवाद सभेला उपस्थित नसल्याने तक्रारींचे निराकरण न झाल्याने आलेले तक्रारदार नागरिक नाराजी व्यक्त करीत सभेतून बाहेर पडताना दिसून आले.

पथारी विक्रेत्यांची घोषणाबाजी
पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी हिंजवडी येथे येणार असल्याने अतिक्रमण विभागाने डांगे चौक, लक्ष्मी चौक, भूमकर चौक परिसरात फिरते भाजी विक्रेते, फळ विक्रेते, चौकातील फ्लेक्स यावर मोठ्या प्रमाणात धडक कारवाई केली. त्याविरोधात विक्रेते, व्यावसायिकांनी क्षेत्रीय कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठ्या संख्येने उपस्थित राहून कारवाई विरोधात मोठ्याने घोषणाबाजी केल्याचे पाहावयास मिळाले.


मला सकाळी फोन आल्याने मी आणि विविध विभागांतील अधिकारी अत्यंत तातडीच्या बैठकीसाठी गेलो होतो. मुख्य समन्वय अधिकारी यांना संपर्क केला होता. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे ते का उपस्थित नव्हते ? हे मला सांगता येणार नाही. मुख्य प्रवेशद्वारावर आलेल्या मोर्चा प्रतिनिधींशी देखील अतिक्रमण कारवाईबाबत सकारात्मक चर्चा केली आहे.
- अमित पंडित, ‘ड’ क्षेत्रीय अधिकारी

माझी तब्येत बरी नसल्या कारणाने मी वैद्यकीय रजा घेतली होती. माझी वैद्यकीय उपचार, तपासणी सध्या सुरू आहे. त्यामुळे मी जनसंवाद सभेला उपस्थित राहू शकलो नाही.
- पंकज पाटील, उपायुक्त तथा मुख्य समन्वय अधिकारी


मला सोमवारी मुंबईमध्ये न्यायालयात तारीख असताना देखील जनसंवाद सभेला प्रथम गेलो. मात्र, जनसंवाद सभेला क्षेत्रीय अधिकारी उपस्थित नसल्याने माझ्या तक्रारीचे योग्य निराकरण होऊ शकले नाही. त्यामुळे मी स्वतः नाराजी व्यक्त करत सभेबाहेर पडलो.
- संजय झोंबाडे, तक्रारदार, पिंपळे गुरव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com