हरित ‘ट्रेझर’, सुरक्षित ‘ट्रेझर’

हरित ‘ट्रेझर’, सुरक्षित ‘ट्रेझर’

Published on

आमची सोसायटी - आमचा उपक्रम
ट्रेझर सोसायटी, पिंपळे गुरव

विजय गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा

पिंपळे गुरव, ता.१९ : पिंपळे गुरव येथील काशीद पार्क, भोसरी ते कोकणे चौक बीआरटी रस्त्यालगत वसलेली ट्रेझर सोसायटी ही विविध उपक्रम राबविणारी आणि सर्वधर्मसमभाव, सांस्कृतिक ऐक्य जपणारी सोसायटी म्हणून परिचित आहे.
सुमारे १२०० हून अधिक झाडांच्या सान्निध्यात वसलेली ही सोसायटी पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आदर्श ठरत आहे.
या सात मजली आणि नऊ विंग असलेल्या सोसायटीमध्ये तब्बल २६५ सदनिकांमध्ये १३०० पेक्षा अधिक नागरिक सौहार्दाने वास्तव्य करत आहेत. सोसायटीमध्ये स्वतंत्र घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा कार्यरत आहे. सुका कचरा महापालिकेला देण्यात येतो; तर ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार केले जाते. स्वच्छता अभियानात सोसायटीचा सक्रिय सहभाग असतो. परिसर कायम स्वच्छ व कचरामुक्त ठेवला जातो. ज्येष्ठ नागरिक आणि मुलांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली आहे.

सौरऊर्जा प्रकल्प
प्रायोगिक तत्त्वावर सौरउर्जेचा वापर यशस्वीरीत्या सुरू करण्यात आला आहे. २० किलोवॅट क्षमतेचा प्रकल्प यशस्वी झाला असून वाहनतळातील प्रकाश व्यवस्था, पाण्याच्या मोटारी आदींसाठी सौरऊर्जेचा वापर केला जात आहे. त्यामुळे वीजबिलात मोठ्या प्रमाणावर बचत होत आहे.

जलपुनर्भरणामधून टँकरमुक्त
पावसाळ्यात जलपुनर्भरण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) यंत्रणेच्या माध्यमातून सोसायटी टँकरमुक्त झाली आहे. परिणामी, सोसायटीच्या रहिवाशांना पाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध असून पाण्याची कोणतीही कमतरता भासत नाही. सोसायटीत दरवर्षी वृक्षारोपणाचा उपक्रम राबवला जातो. एक हजारांहून अधिक झाडे लावण्यात आली असून त्यांचे संगोपन करण्यात येत आहे. त्यामुळे परिसरात वर्षभर आल्हाददायक वातावरण राहते.

चोख सुरक्षा व्यवस्था
प्रत्येक इमारतीसाठी सुरक्षा रक्षक असून त्यांच्यामार्फत येणाऱ्या-जाणाऱ्यांची नोंद घेतली जाते. बाहेरील व्यक्तींना नोंदणी केल्याशिवाय प्रवेश मिळत नाही. याखेरीज ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सुरक्षा यंत्रणा कार्यरत आहे. डिजिटल अॅक्सेस प्रणाली आणि नियमित सुरक्षा तपासणी यामुळे सुरक्षा निश्चित केली जाते.


विविध उपक्रमांचा उत्साह
प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदन व बालगोपाळांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. गणेशोत्सवात महिलांसाठी विविध स्पर्धा, मुलांसाठी नृत्य, गायन, वाद्य स्पर्धा आयोजित केल्या जातात. नवरात्रात महिला भगिनी एकत्र येऊन गरबा आणि दांडिया कार्यक्रम साजरा करतात. दसऱ्याला रावण दहन, रामाची वेशभूषेत बालगोपाळांची मिरवणुकीचे आयोजन केले जाते. शिवजयंतीला क्लब हाऊसमध्ये शिवपूजन, पोवाडा कार्यक्रम, छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान करून मिरवणूक आणि गडकिल्ल्यांचे प्रदर्शन सादर केले जाते. रहिवाशांसाठी ट्रेझर प्रीमियर लीग ही मनोरंजनात्मक क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाते.

आधुनिक काळातील व्यस्त जीवन शैलीला आवाहन देत आमची सोसायटी एका विस्तृत कुटुंबाच्या रूपात भरभराटीला आली आहे. सोसायटीत एकोपा असून सामाजिक व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतून समाजासाठी एक घट्ट नाते निर्माण करणे हेच आमचे लक्ष्य आहे. सोसायटीतील रहिवाशांच्या सकारात्मक सहकार्यामुळे अशक्यप्राय वाटचाल शक्य झाली आहे.
- सतीश लोहिया, अध्यक्ष, ट्रेझर सोसायटी, पिंपळे गुरव

आमची सोसायटी म्हणजे विविधतेत एकता. वेगवेगळ्या जाती धर्मांचे लोक इथे एकत्र राहतात. ज्येष्ठांसाठी भक्तीपाठ, लहान मुलांसाठी संस्कार वर्ग, महिलांसाठी विविध कार्यक्रम, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असलेली
सोसायटी म्हणजे ट्रेझर सोसायटी.
- संदीप घोगरे, सचिव, ट्रेझर सोसायटी, पिंपळे गुरव

ज्येष्ठ नागरिक दररोज दुपारी हरिपाठाचे अध्याय, रामरक्षाचे पाठ करून सोसायटीला उर्जामय करतात आसाराम कुलकर्णी हे पुढाकार घेतात. मुलांसाठी संस्कार पाठ दर शनिवार - रविवारी घेतले जातात. सर्व खेळीमेळीच्या वातावरणात सोसायटी सदस्य राहतात. ज्येष्ठ नागरिक सुद्धा सर्व कार्यक्रमांत उत्साहाने भाग घेत असतात.
- नवलकिशोर बंग, निवासी, ट्रेझर सोसायटी

आमच्या सोसायटीमध्ये संक्रांतीचे हळदी-कुंकू अतिशय अनोख्या पद्धतीने साजरे केले जाते. प्रत्येक विंगचे एकत्र हळदीकुंकू पर्यावरणपूरक असे साजरे होते. त्याचप्रमाणे दहीहंडी, होळी, रंगपंचमी असे विविध सण एकत्रितपणे साजरे होतात. आजच्या मोबाईल, टीव्हीच्या युगात मुलांच्या मैदानी खेळांना जास्त प्राधान्य दिले जाते.
- मनिषा रायठठ्ठा, रहिवासी

सर्व रहिवासी एका कुटुंबासारखे राहतात. अतिशय सुरक्षित असे वातावरण इथे आहे. सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा इत्यादी सर्व क्षेत्रांत आमची सोसायटी अग्रेसर आहे. अशा याह ‘हरित ट्रेझर, सुरक्षित ट्रेझर’ मध्ये आम्ही राहतो, याचा मला अभिमान आहे.
- मनिषा दाते, रहिवासी

माणुसकी जपणारी माणसे इथे आहेत. ज्येष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत प्रत्येकाचा सहभाग इथल्या कार्यक्रमांमध्ये असतो. सोसायटीत महिला बचत गटाद्वारे महिला सक्षमीकरणाचे कार्य केले जाते.
- मीनल टेंगे, रहिवासी

आमच्या सोसायटीने जुन्या चांगल्या रूढी-परंपरा न सोडता नवीन रूढींना आत्मसात केले आहे. रोज ज्येष्ठ नागरिकांचा हरिपाठ होतो. बालसंस्कार होतो. महिला बचत गट सुद्धा चालवतो. क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल, बॅडमिंटन, नेट क्रिकेट, डान्स, कराटे, स्केटिंग, योगा या क्रीडा उपक्रमांसह सगळे मराठी सण इथे साजरे होतात.
- योगिता अध्यापक, रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com