ओ शेठ ! तुम्ही नादच केलाय थेट...

ओ शेठ ! तुम्ही नादच केलाय थेट...

Published on

विजय गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा

पिंपळे गुरव, ता. २२ ः महापालिका निवडणुकांची घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर परिसरात इच्छुक उमेदवारांनी आपली ताकद दाखवण्यासाठी विरोधकांवर ‘भव्य आखाड पार्टी’ हे नवे शस्त्र उपसले आहे. आषाढ महिन्याच्या अखेर येणाऱ्या आखाडाचा वापर करत हे इच्छुक राजकीय गणित पक्के करण्याचा प्रयत्न करत आहेत. शेकडो किलो चिकन आणि मटणाच्या मेजवानी आधारे निवडणुकीपूर्वीच स्वतःची राजकीय तयारी करुन घेत आहेत.
पिंपळे गुरव आणि सौदागर परिसर मांसाहारी खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध. येत्या शुक्रवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आखड साजरा करण्यासाठी परिसरातील मटण, चिकन हॉटेल्समध्ये गर्दी उसळली आहे. तुपातले मटण, गावरान कोंबडा, काळ्या-तांबड्या रस्स्यातील मटण, बिर्याणी, मच्छी फ्राय यांना प्रचंड मागणी आहे. चिकनला २६० रुपये; तर मटणाला तब्बल ९०० रुपये दर असूनही खवय्ये गर्दी करत आहेत. अनेक जण फार्म हाऊस, शेतांमध्ये गावरान पद्धतीने आखाड पार्टी करत आहेत.
याच गर्दीचा आणि सणाचा इच्छुक उमेदवार उपयोग करत असून भव्य आखाड (मांसाहारी) पार्टी आयोजित करून स्वतःचा राजकीय प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर परिसरातील मोठी मंगल कार्यालये, फार्म हाऊस, हॉटेल्समध्ये या पार्टी सुरू आहेत. मित्रमंडळी, गट प्रमुख, कार्यकर्ते आणि समाजबांधवांना बोलावून उपस्थितीवर भर दिला जात आहे. शहर परिसरात अशा भव्य पार्टीचे आयोजन हे राजकीय प्रचाराचे नवे माध्यम ठरत आहे.

सोशल मीडियावर चर्चा
सोशल मीडियावर फोटो आणि रील्स पोस्ट करून आखाड पार्ट्यांची प्रसिद्धी केली जात आहे. या पार्ट्यांतून इच्छुकांची खरी ताकद, गटबाजी, खर्च करण्याची क्षमता आणि जनसंपर्क याचा वस्तुपाठ मतदारांना मिळत आहेत. कोणत्या इच्छुकाच्या पार्टीत किती लोक आले ?, कोणते नेते सहभागी झाले ? किती कार्यकर्ते उपस्थित होते ? कोणी गायकांचा कार्यक्रम ठेवला ? किती खानपान केले ? खर्च किती झाला ? याची चर्चा थेट सोशल मीडियावर रंगत आहे.

गटबाजीचेही चित्र
काही ठिकाणी गटबाजीमुळे पार्टीत नाराजीचे चित्र दिसते आहे; तर काहींच्या कार्यक्रमात समाजबांधवांनी पाठ फिरविलेली दिसत आहे. परिणामी, इच्छुकांची सामाजिक स्वीकारार्हता, गट बळ याचे दर्शन लोकांसमोर होत आहे. त्यामुळे मतदार इच्छुकांचे ‘असली व नकली’ असे विश्लेषण स्वतः करत आहेत.

मतदारांची सावध भूमिका
सध्या चिकन, मटण दुकाने फुल्ल, हॉटेल्स ओव्हरबुक्ड, फार्म हाऊस गावरान मेजवान्यांसाठी सज्ज; तर इच्छुक उमेदवारांचा जनसंपर्क व प्रतिमा यावर राजकीय तयारीचा शिक्का उमटू लागला आहे. निवडणुकीच्या आधीच मतदार सावध झाले आहेत आणि कोण आपला खरा, हे ठरवू लागले आहेत.


मटण व चिकनचे दर ही २० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले असून मागणी वाढली आहे. बोकडाचे व बोल्हाईचे मटण ९०० रुपये तर काही ठिकाणी साडेआठशे रुपयांनी किलोच्या दराने विकले जात आहे. आमच्याकडे ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी आम्ही तत्परतेने पुरवठा करत आहे.
- रघुनाथ जठार, मटण विक्रेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com