जॉगिंग ट्रॅक नव्हे; मद्यपी, टवाळखोरांचा अड्डा
पिंपळे गुरव, ता. २६ ः नवी सांगवी येथील साई चौक ते माहेश्वरी चौकापर्यंत महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून जॉगिंग ट्रॅक विकसित करण्यात आला. सुमारे ७०० मीटर लांबीच्या या ट्रॅकचा उद्देश नागरिकांना आरोग्यदायी व स्वच्छ जागा उपलब्ध करून देणे हा होता. परंतु प्रत्यक्षात ही सुविधा सध्या अस्वच्छता, मद्यपी आणि टवाळखोरांचा अड्डा बनली आहे.
साई चौक येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोकळ्या मैदानालगत नाल्यावर हा ट्रॅक तयार करण्यात आला आहे. त्याच्या दोन्ही बाजूंनी संरक्षक जाळी बसवण्यात आली असून परिसर सुरक्षित करण्यात आला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात नागरिकांनी मोठ्या उत्साहाने या ट्रॅकचा वापर केला. परंतु सध्या या ट्रॅकचा शेवटचा सुमारे १०० ते २०० मीटरच्या भागावर मद्यपी व टवाळखोर कब्जा करत आहेत. दुपारी व रात्रीच्यावेळेस येथे मद्यपींची टोळकी खुलेआम बसलेली दिसतात. अस्वच्छता, प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा व उग्र दुर्गंधीमुळे परिसरात वावरणेही कठीण झाले आहे.
नागरिकांचे मौन
या परिसरात तीन ते चार मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या, शाळा, दुकाने असून येथे सुशिक्षित व कुटुंबवत्सल नागरिक वास्तव्यास आहेत. वारंवार त्रास होऊनही कोणी मद्यपींना विरोध करायला धजावत नाही. कारण काही वेळा भांडण अथवा मारहाणीची वेळ येते. त्यामुळे, नागरिक मौन बाळगून त्रास सहन करत आहेत.
मागणी काय ?
- पोलिस गस्त, कारवाई वाढवावी
- महापालिकेकडून नियमित स्वच्छता केली जावी
- प्रकाश व्यवस्था सुधारावी
- जागरूकता फलक व सूचना लावाव्यात
- स्वयंसेवी व नागरी गस्त समिती स्थापन करावी
जॉगिंग ट्रॅक परिसरातील मद्यपींविरुद्ध कठोर पावले उचलण्यात येतील.
- जितेंद्र कोळी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सांगवी पोलिस ठाणे
जॉगिंग ट्रॅक हा आरोग्यासाठी तयार केला आहे की मद्यपींच्या अड्ड्यासाठी ? प्लास्टिकच्या बाटल्या, घाण आणि मद्यधुंद व्यक्तींमुळे आम्हा महिलांना आणि मुलांना बाहेर पडणे अवघड झाले आहे. महापालिका आणि पोलिस प्रशासनाने यावर तातडीने कठोर उपाययोजना करावी.
- सुरेखा बनसोडे, रहिवासी
PMG25B02632
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.