शिवकालीन महादेव मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान

शिवकालीन महादेव मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान

Published on

विजय गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
पिंपळे सौदागर, ता.३ ः पिंपळे सौदागर परिसरातील पवनेच्या काठावरील शिवकालीन हेमाडपंती महादेव मंदिर आजही भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे. दरवर्षी महाशिवरात्री आणि दर श्रावणी सोमवारी इथे भाविकांची मोठी गर्दी होत असते.
या मंदिराचा संपूर्ण पाया, गाभाऱ्याचा भाग हा दगडी बांधकामात केलेला आहे. मंदिरात प्रवेश करताना समोर भव्य दगडी कमान असून २०१० मध्ये ती बांधण्यात आली. कमानीतून आत गेल्यानंतर समोर मेघडंबरीत काळ्या पाषाणात साखळी आणि घंटा गळ्यात घातलेला नंदी विराजमान आहे. मंदिराच्या आवारात जुना मोठा पिंपळ वृक्ष आहे. त्याखाली नाग देवतेची मूर्ती आहे. शेजारी पितळेचा मोठा त्रिशूळ भाविकांचे लक्ष वेधून घेतो. मुख्य गाभाऱ्यापूर्वी छोटे सभा मंडप असून त्याची रचना गोलाकार घुमटाकार आहे. त्यात एका बाजूस देवळीमध्ये गणपतीची मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे. तर उजव्या बाजूस श्री दत्त यांची आकर्षक मूर्ती आहे. दक्षिण व उत्तर बाजूंच्या दगडी भिंतीतील देवळ्यांमध्येही संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे. तर मुख्य गाभाऱ्यामध्ये स्वयंभू प्राचीन शिवलिंग असून मुख्य गाभाऱ्यात पाच ते सहा भाविक बसू शकतील एवढी जागा आहे.

कळसाचा जीर्णोद्धार
या मंदिराचा पाया व गाभारा हे जुने दगडी असून कळस वाळू, चुना व शिसे वापरून बांधलेला होता. सुमारे वीस वर्षांपूर्वी वीज पडून कळसाचे नुकसान झाले होते. त्यानंतर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. पुण्यातील संग्रहालयात मिळालेल्या मंदिराच्या प्रतिकृतीच्या आधारावर दोन वर्षांत कळसाचा जीर्णोद्धार पूर्ण झाला.

महादेव मंदिर पांडव कालीन असून स्वयंभू महादेवाची पिंड असल्याने परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. वीस वर्षांपूर्वी मंदिरावर वीज पडल्यानंतर जीर्णोद्धाराच्या कामादरम्यान लाकडी पाळणा व पितळेच्या प्राचीन वस्तू आढळून आल्या. आजही हे सुंदर दगडी बांधकाम असलेले हे शिव मंदिर प्राचीन इतिहासाची साक्ष देते.
- माऊली हांडे, शिव मंदिर, पुजारी, पिंपळे सौदागर

PMG25B02654

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com