व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणांमध्ये दिवसेंदिवस वाढ
पिंपळे गुरव, ता.२० ः नवी सांगवी परिसरातील मुख्य बाजारपेठेतील साई चौक, कृष्णा चौक, एम.एस. काटे चौक आणि काटेपुरम चौक या मुख्य मार्गांलगत असलेल्या पदपथांवर व्यापाऱ्यांचे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. स्थानिक दुकानदार व फेरीवाले यांनी विक्री माल मांडल्याने पदपथ पूर्णपणे व्यापले गेले आहेत. परिणामी, वाहतूककोंडी, किरकोळ अपघात तसेच वादविवादाच्या घटनांत वाढ होत आहे.
विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला पदपथाऐवजी रस्त्यावरून चालताना वाहनांच्या धोक्यातून मार्ग काढत असल्याचे चित्र रोज दिसत आहे. भरधाव वाहनांमुळे अपघाताची टांगती तलवार पादचाऱ्यांवर असते. दुकानदारांनी दुकानासमोरील मोकळ्या जागेत रॅक, कपडे टांगण्याचे स्टँड उभे ठेवले असून भाजीपाला व फळांच्या हातगाड्यांनीही मार्ग अडवला आहे. सायंकाळी गर्दीच्या वेळी समस्या तीव्र होत आहे.
या संदर्भात महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या गेल्या तरी प्रशासन आणि अतिक्रमण विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. कारवाई केवळ कागदोपत्रीच होते, असा आरोप स्थानिकांच्या बाजूने करण्यात आला आहे. महानगरपालिका वारंवार तक्रारी होईपर्यंत कारवाई का करत नाही ?, अतिक्रमण अधिकारी प्रभागात फिरत नाहीत का ?, त्यांना ही परिस्थिती दिसत नाही का ?, असे सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. व्यापाऱ्यांच्या दबावाखाली अधिकारी काम करून कारवाई टाळत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
या परिस्थितीत प्रशासनाने ठोस पावले उचलली नाहीत तर नागरिकांचा प्रचंड रोष उसळण्याची शक्यता आहे आणि त्याचा थेट परिणाम म्हणून महानगरपालिकेच्या प्रतिमेवर परिणाम होत आहे. त्यामुळे पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळा करून त्यांना सुरक्षितपणे चालता येईल, यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याची मागणी नागरिक करत आहेत.
फ्लेक्सचाही ‘बाजार’
पिंपळे गुरव परिसरात रस्त्याच्या कडेला अनधिकृत फ्लेक्स, बॅनर आणि स्वागत कमानींमुळे परिसराचे सौंदर्य तर बिघडत आहे. शिवाय वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका देखील वाढतो आहे. निवडणुका, कार्यक्रमच्या जाहिरातींच्या नावाखाली राजरोसपणे नियमांचे उल्लंघन होत आहे.
नवी सांगवी परिसरातील पदपथ व रस्त्यावरील अतिक्रमणांची पाहणी करून योग्य कारवाई करण्यात येईल.
- पूजा दुधनाळे-पाटील, सहाय्यक आयुक्त तथा ‘ह’ क्षेत्रिय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका