गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला !
पिंपळे गुरव, ता.२ ः ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’चा जयघोष, लेझीम, ढोल-ताशांचा निनाद आणि ‘डीजे’च्या तालावर नवी सांगवी आणि पिंपळे गुरवमध्ये मंगळवारी उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला.
नवी सांगवीतील प्रमुख रस्ते व चौक भक्तांच्या गर्दीने सकाळपासूनच गजबजले. विसर्जन मिरवणुकाही सकाळपासूनच सुरू झाल्या. विविध चौकांमधून त्या जात असताना भक्तांच्या उत्साहाला उधाण आले.
चैत्रबन मित्र मंडळाने विद्युत रोषणाईसह ‘झाडे वाचवा, झाडे लावा’ चा संदेश आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. श्री समर्थनगर तरुण मंडळाने विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा देखाव्याबरोबरच फुलांची आकर्षक सजावट केली. शिवप्रतिष्ठानने फेमस चौकात सर्व मंडळांच्या प्रतिनिधींचा सन्मान सोहळा आयोजित केला. नवी सांगवी विभागीय गणेश मंडळाने पारंपरिक स्वरूपात पालखीमधून गणेश विसर्जन मिरवणूक काढली. अखिल क्रांती चौक मित्र मंडळाकडून सर्व गणेश भक्तांची स्वागत करण्यात आले.
पिंपळे गुरव येथील गजानन महाराज मित्र मंडळ, नेताजीनगर मित्र मंडळ, स्वराज प्रतिष्ठान, नवयुग मित्र मंडळ, त्रिमूर्ती मित्र मंडळांनी फुलांची आरास, विद्युत रोषणाई तसेच ‘डीजे’ लावून मिरवणूक काढली.
चोख बंदोबस्त
पोलिस आयुक्तालयाच्या परिमंडळ एक मार्फत मोठा बंदोबस्त लावण्यात आला. या बंदोबस्तात एक पोलिस उपायुक्त, एक सहाय्यक पोलिस आयुक्त, सहा वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सतरा सहाय्यक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक, एकशे एकोणीस अंमलदार आणि छत्तीस होमगार्ड यांचा समावेश होता. याशिवाय, सांगवी वाहतूक शाखेतर्फेही एक उपायुक्त, एक पोलिस निरीक्षक, दोन पोलिस उपनिरीक्षक, सहा श्रेणी पोलिस उपनिरीक्षक, ५३ हवालदार आणि ३२ होमगार्ड असा स्वतंत्र फौजफाटा तैनात करण्यात आला.
क्षणचित्रे...
- नवी सांगवी, पिंपळे गुरवमध्ये कृत्रिम विसर्जन हौदांची सोय
- घरगुती गणपतींचे कृत्रिम हौदांत अधिक विसर्जन
- फेमस चौक, एम. के. हॉटेल, मयूर नगरी सोसायटी, काळूराम जगताप बॅडमिंटन हॉल शेजारील मैदान येथे कृत्रिम तलावांची व्यवस्था
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटावर देखील हौद उपलब्ध
- स्वच्छता, सुरक्षा आणि नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे विसर्जन सोहळा सुरळीतपणे पार
‘डीजे’चा दणदणाट
नवी सांगवी व पिंपळे गुरव परिसरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत भक्तिमय वातावरणासोबतच डीजेच्या कर्कश आवाजाने कानठळ्या बसवणारा अनुभव नागरिकांना आला. लेझीम, ढोल-ताशांच्या पारंपरिक गजरात भक्तिभाव व्यक्त होत असताना डीजेच्या प्रचंड गोंगाटामुळे वातावरणात गडबड आणि गोंधळ निर्माण झाला.
PMG25B02764, PMG25B02763
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.