अवघ्या वर्षभरातच वाहनचालकांच्या विश्वासाला ‘तडे’
पिंपळे गुरव, ता. ३ ः गेल्या वर्षी तब्बल ८ कोटी २५ लाख रुपये खर्चून सांगवी फाटा ते सांगवी पोलिस चौकी या केवळ ८०० मीटर अंतराच्या मुख्य सिमेंट काँक्रिट रस्त्याला अवघ्या वर्षभरातच तडे गेले असून काही ठिकाणी खचला आहे. संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याऐवजी त्याच्याकडून डागडुजी करुन घेतली जात असल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर आणि पिंपरी चिंचवड या भागांना जोडणारा हा महत्वाचा रस्ता आहे. पुणे शहरातून येणाऱ्या वाहतुकीसाठी हा मुख्य रस्ता असल्याने दररोज हजारो वाहने याच मार्गावरून जातात. तसेच जिल्हा रुग्णालय, महाविद्यालय, शाळा या परिसरात असल्याने विद्यार्थी आणि रुग्णवाहिकांचीही वर्दळ येथे कायम असते. अशा रस्त्यावर निकृष्ट दर्जाचे काम केल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या जीवाला थेट धोका निर्माण झाला आहे.
रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण चार टप्प्यांत करण्यात आले. मार्च २०२४ ही काम पूर्ण करण्याची मुदत होती. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर काही महिन्यांतच रस्त्यावर ठिकठिकाणी भेगा पडल्या; तर काही ठिकाणी पावसाळी वाहिन्या व गटारे खचली. पदपथाचाही भाग तुटल्याने पादचाऱ्यांना चालणे अवघड झाले आहे. रस्ता तयार होऊन वर्षभरही न झाल्याने पुन्हा दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले.
या रस्त्यावरील दुरुस्तीसाठी अनेकवेळा काम करण्यात आले असले तरी ही केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरवर्षी लाखो रुपये खर्चूनही रस्ते दर्जेदार होत नाहीत. त्याची जबाबदारी कोणी घेणार ?, असा सवाल सांगवी, नवी सांगवी परिसरातील नागरिक विचारत आहेत. महापालिकेला नागरिकांचा विश्वास परत मिळवायचा असेल; तर अशा निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत दोषी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.
दर्जा न तपासताच काम
रस्त्याचे काम सुरू असताना अनेकदा त्याच्या दर्जाची तपासणी न करता घाईघाईत सिमेंट काँक्रिट ओतले गेले. त्यामुळे रस्त्याच्या पृष्ठभागावर तडे गेले. अशा प्रकारे कोट्यवधी रुपयांचा रस्ता बनवून नागरिकांचा जीव धोक्यात ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली पाहिजे, अशी मागणी नागरिक व सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.
वाहनचालक अपघातग्रस्त
या १२ मीटर रुंदीच्या रस्त्यावर सिमेंटचे दोन मीटर गट्टू (ब्लॉक) लावण्यात आले आहेत. हे गट्टू आता सैल होऊन तुटत आहेत. त्यामुळे दुचाकीचालक आणि पादचारी अपघातग्रस्त होत आहेत. काही दिवसांपूर्वी तर एका तरुणीला या रस्त्यावरील अपघातात जीव गमवावा लागला.
रस्त्याची पाहणी करून रस्त्याला गेलेले तडे, पावसाळी वाहिन्या, गटारे खाली खचले गेले असतील; तर तातडीने तेथे संबंधित ठेकेदाराकडून दुरुस्ती केली जाईल.
- सतीश वाघमारे, कार्यकारी अभियंता (स्थापत्य) ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय
कोट्यवधी रुपये खर्चूनही रस्त्याची अशी दयनीय अवस्था पाहून त्रास होतो. दरवेळेस डागडुजी करून वेळ आणि पैसा वाया जातोय. प्रशासनाने दोषी ठेकेदारांवर कठोर कारवाई केली पाहिजे.
- महादेव नाईक, स्थानिक नागरिक
PMG25B02907
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

