रिक्षावरील भोंगे, एलईडी प्रचार वाहनांनी डोकेदुखी

रिक्षावरील भोंगे, एलईडी प्रचार वाहनांनी डोकेदुखी

Published on

पिंपळे गुरव, ता. ८ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘ड’ व ‘ह’ प्रभाग अंतर्गत येणाऱ्या आठ प्रभागांमध्ये प्रचाराचा जोर वाढला आहे. यात रिक्षांवरील भोंगे आणि एलईडी प्रचार वाहनांमधून होणाऱ्या प्रचंड आवाजामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. नियम डावलले जात असले, तरी प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचे नागरिक सांगत आहेत.

ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियम व अटी ठरवून दिल्या असल्या तरी प्रचार साहित्य वापरण्याबाबत मोठ्या प्रमाणात परवानग्या देण्यात आल्या आहेत. उपलब्ध माहितीनुसार ‘ड’ प्रभागात तब्बल ९२, तर ‘ह’ प्रभागात ८० जणांना प्रचार साहित्य वापराच्या परवानग्या देण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या रिक्षा, टेम्पो व एलईडी व्हॅनवर लावण्यात येणारे भोंगे प्रचंड आवाजात वाजवले जात आहेत. विशेष म्हणजे, सकाळी लवकर आणि रात्री उशिरापर्यंत हा प्रचार सुरू असल्याने ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण आणि कामगार वर्ग त्रस्त झाला आहे. अनेक ठिकाणी आवाजाची पातळी ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा कित्येक पटींनी अधिक असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार औद्योगिक, व्यापारी, निवासी आणि शांतता क्षेत्रात वेगवेगळ्या डेसिबलची मर्यादा निश्चित आहे. हॉस्पिटल, शाळा, महाविद्यालये व धार्मिक स्थळांच्या परिसरात येणाऱ्या शांतता क्षेत्रात अत्यल्प आवाजाची मर्यादा असताना देखील या ठिकाणी प्रचार वाहनांचे भोंगे बिनधास्तपणे वाजवले जात आहेत. परिणामी, रुग्णालयातील रुग्णांची विश्रांती भंग होत असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत आहे. निवासी वसाहतींमध्ये तर परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. सततच्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना डोकेदुखी, तणाव, चिडचिड, झोप न लागणे अशा आरोग्यविषयक तक्रारी वाढल्या आहेत. अनेकांनी संबंधित उमेदवार, प्रचार प्रमुख तसेच प्रशासनाकडे तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही, असा नागरिकांचा आरोप आहे.

प्रशासन ठप्प; संशयाच्या भोवऱ्यात
ध्वनिप्रदूषणाच्या या प्रकारात महापालिका, पोलिस आणि निवडणूक यंत्रणेची डोळेझाक होत आहे. नियम अस्तित्वात असतानाही त्यांची अंमलबजावणी होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी डेसिबल मोजणी, प्रचार वेळेची काटेकोर अंमलबजावणी आणि नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

असे आहेत नियम
• ध्वनी प्रदूषण अधिनियम २००० व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे काटेकोर पालन बंधनकारक.
• सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत रिक्षा, भोंगे, एलईडी यांना परवानग्या देण्यात आले आहे.
• रात्री १२ ते सकाळी ६ या वेळेत कोणत्याही प्रकारचा भोंगा/लाउडस्पीकर वापरास मनाई.
• ध्वनीक्षेपकाचा आवाज ठरवून दिलेल्या डेसिबल मर्यादेपेक्षा जास्त नसावा.


ध्वनी प्रदूषणाबाबत प्राप्त तक्रारींची गांभीर्याने दखल घेण्यात येत आहे. संबंधित प्रकरणांची तपासणी करण्यासाठी पोलिसांना सूचना दिल्या जातील. ज्या-ज्या प्रभागांमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून येईल, त्या परिसरातील संबंधित पोलिस ठाण्यामार्फत तत्काळ कारवाई करण्यात येईल. निवडणूक आयोगाच्या नियमांचे ठरवून दिलेल्या ध्वनी मर्यादा व वेळेचे उल्लंघन सहन केले जाणार नाही.
- अनिल पवार, निवडणूक अधिकारी क्र. ४

एक पक्षाचा भोंगा जातो न जातो, तोच लगेच दुसऱ्या पक्षाचा भोंगा सुरू होतो. त्यामुळे दिवसभर शांततेचा क्षणही मिळत नाही. कोणत्या पक्षाचा प्रचार सुरू आहे, यापेक्षा सतत होणारा आवाजच नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. नियम कागदावरच राहिले असून प्रत्यक्षात कुणालाही त्याचे भान नाही. प्रशासनाने यावर तत्काळ नियंत्रण आणावे.
- ॲड. आकाश कांबळे, स्थानिक नागरिक

PNE26V83898

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com