भटक्या श्वानांमुळे पिंपळे गुरवमधील नागरिक भयभीत
पिंपळे गुरव, ता. २० ः पिंपळे गुरवमधील स्थानिक रहिवासी हे भटक्या श्वानांच्या वाढत्या उपद्रवामुळे हैराण झाले आहेत. काही श्वानांनी चावा घेतल्याचेही प्रकार घडले आहेत. त्यामुळे विशेषतः विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना भीतीच्या सावटाखाली वावरावे लागत आहे. श्वानांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.
पिंपळे गुरवमधील जवळकरनगर, साठफुटी रस्ता, काटेपुरम चौक, साई चौक तसेच कृष्णा चौकामध्ये भटके श्वान झुंडीने फिरत असतात किंवा बसलेले असतात. काही श्वानप्रेमींकडून त्यांना नियमितपणे खाऊ घातले जाते. त्यामुळे, भटक्या श्वानांची भीड चेपली असून अधूनमधून ते आक्रमक होत आहेत. काही स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, या श्वानांनी अनेक जणांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. श्वानप्रेमींकडून प्राण्यांची काळजी घेतली जात असली, तरी माणसांवर होणाऱ्या हल्ल्यांची त्यांना फारशी चिंता नसल्याचे दिसून येते. मुक्या प्राण्यांची काळजी घेणे योग्य आहे. पण, श्वानप्रेमींचा निष्काळजीपणा आणि महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना सतत श्वानांच्या दहशतीखाली राहावे लागत आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी फेरफटका मारण्यास जाणारे ज्येष्ठ नागरिक आणि शाळेत जाणारे विद्यार्थी नेहमीच भयभीत असतात.
ठोस कारवाईचा अभाव
काही वेळा भटक्या श्वानांचा घोळका अचानकपणे आक्रमक होतो. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित अंतर राखावे लागते. काही घटनांमध्ये या श्वानांनी नागरिकांना चावा घेतला आहे. परिसरातील रहिवाशांनी हे प्रकार पोलिस आणि महानगरपालिकेला कळवले असले तरीही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही.
काय करता येईल ?
- भटके श्वान पकडून त्यांना निवारा केंद्रात सोडणे
- इच्छुक श्वानप्रेमींकडून मदत घेणे
- सार्वजनिक खाऊ घालण्याबाबत समज देणे
- श्वानांची संख्या नियंत्रित करणे
समस्येची कारणे
- पुणे-पीसीएमसी सीमेवरून श्वानांचे सतत स्थलांतर
- हॉटेल कचरा, उघडे डंपिंग यामुळे अन्न सहज उपलब्ध
- १०० टक्के नसबंदी न झाल्याने प्रजनन सुरूच राहते
- लोकांकडून अन्न दिले जाते, पण दत्तक घेण्याचे प्रमाण कमी
- नवीन कुत्री परिसरात सोडली जाण्याचे प्रकार
- नियमित सर्वेक्षण व पाठपुरावाचा अभाव
‘डॉग स्कॉड’ पाठवून भटक्या श्वानांचे निरीक्षण केले जाईल. आक्रमक श्वानांना उचलून रेबीजचे इंजेक्शन देता येईल. त्यामुळे त्यांची आक्रमकता कमी होईल. परंतु, त्यासाठी प्रथम निरीक्षण महत्वाचे आहे.
- डॉ. अरुण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी
सांगवी-पिंपळे गुरव हा प्रभाग पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या सीमेवर असल्याने अन्नाच्या शोधात भटके श्वान मोठ्या प्रमाणात फिरतात. स्थानिक प्राणिमित्रांच्या मदतीने सुमारे ८० टक्के भटक्या श्वानांची नसबंदी व अँटी रेबीज लसीकरण करण्यात आले आहे. सोसायट्यांनी भटके श्वान दत्तक घेतल्यास रस्त्यांवरील त्यांची संख्या कमी होऊ शकते.
- कुणाल कामत, प्राणीमित्र, नवी सांगवी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

