जुनी सांगवीत पवनाथडी जत्रा आजपासून सुरू

जुनी सांगवीत पवनाथडी जत्रा आजपासून सुरू

Published on

पिंपळे गुरव, ता. २४ ः सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर बहुप्रतिक्षित पवनाथडी जत्रेला बुधवारपासून (ता.२५) सुरुवात होत आहे. उद्‍घाटनाच्या दिवशी मोठी गर्दी अपेक्षित असल्याने प्रशासनाच्या तयारीची खरी कसोटी लागणार आहे. मागील वर्षी अनेक स्टॉल्सचा पुरुषांनी ताबा घेतला होता. त्यामुळे यंदा पवनाथडी जत्रा खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाचा उत्सव ठरतो का ? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
महिला सक्षमीकरण, स्थानिक महिला बचत गटांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि राज्याच्या ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणे या हेतूने पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्यावतीने दरवर्षी ‘पवनाथडी’ जत्रा भरविण्यात येते.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदा जत्रा उशिराने होत आहे. मागील वर्षी महिला सक्षमीकरणाचे धोरण प्रत्यक्षात प्रभावी ठरले नसल्याचे चित्र दिसून आले होते. महिला बचत गटांच्या नावावर दुकाने मंजूर झाली असली तरी अनेक ठिकाणी प्रत्यक्ष दुकाने पुरुषांकडून चालवली जात असल्याचे आढळले होते. तसेच एका दुकानाचे दोन भाग करून वेगवेगळ्या गटांना अरुंद जागा देण्यात आल्याने स्टॉलधारकांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर यंदा प्रत्यक्ष महिला उद्योजकांनाच संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह
गेल्या वर्षी स्टॉल वाटप, अर्ज प्रक्रिया आदी सर्व बाबी महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली पार पडल्या. यंदा काही नगरसेवकांच्या समाज माध्यमांवरून अर्ज वाटपाची माहिती प्रसिद्ध होत असल्याने स्टॉल वाटपावर राजकीय छाया पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे, पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

पवनाथडीवर एक नजर...
- यंदा तब्बल ७५० स्टॉल्स उभारण्याचे नियोजन
- मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या मोठी
- जागा व्यवस्थापन, अग्निसुरक्षा, पार्किंग, पाणीपुरवठा, स्वच्छता, गर्दी नियंत्रण या बाबी महत्त्वाच्या ठरणार
- सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्यपदार्थांचे स्टॉल, खेळणी, महिला बचत गटांच्या उत्पादनांची विक्री तसेच तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्टॉल्स असे विभागणीचे नियोजन


महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगाराची नवी संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे स्टॉलवर महिला बचत गटांतील महिलाच त्यांच्याकडील उत्पादने, खाद्यपदार्थांची विक्री करतील.
- ममता शिंदे, उपायुक्त, समाज विकास विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पवनाथडी जत्रेनिमित्त महानगरपालिकेकडून विविध उपक्रम राबवले जात असले तरी स्टॉलअभावी अनेक महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीची संधी मिळाली नाही. या प्रकारामुळे महिलांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
- सुरेखा बनसोडे, अध्यक्षा, सावित्रीबाई फुले महिला बचत गट
PNE26V98648

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com