

पिंपळे गुरव, ता. २३ ः सांगवी सब-स्टेशनच्या वार्षिक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी (ता.२३) सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत नियोजित शटडाऊन घेण्यात आला होता; मात्र नियोजित वेळ संपूनही वीजपुरवठा पूर्ववत न झाल्याने तब्बल सात तासांहून अधिक काळ वीज गायब राहिली. दुपारच्या कडक उन्हात व वाढलेल्या आर्द्रतेत वीज नसल्याने नागरिक होरपळले, तर अखेर दुपारी सुमारे अडीच वाजता वीजपुरवठा सुरू झाला.
पंखे, कुलर आणि एसी बंद पडल्याने नागरिकांचे हाल झाले. अनेकांना घराबाहेर पडून सावलीचा आधार घ्यावा लागला. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्ण यांना या दीर्घ वीज खंडितीचा मोठा फटका बसला. नियोजित वेळेपेक्षा अधिक काळ वीजपुरवठा खंडित राहिल्याने संतप्त नागरिकांनी महावितरणाच्या कारभारावर जोरदार टीका केली. देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली नागरिकांना वेठीस धरणे थांबवा, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. कामाचे योग्य नियोजन न करता कडाक्याच्या उन्हातच वीजपुरवठा खंडित ठेवण्याचा निर्णय का घेतला? असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला.
पूर्वनियोजित देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी शटडाऊन घेण्यात आला होता. मात्र मेंटेनन्सचे काम सुरू असताना काही अतिरिक्त तांत्रिक कामे समोर आल्याने प्रत्यक्ष कामाचा व्याप वाढला आणि त्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला.
- विकास पुरी, जनसंपर्क अधिकारी महावितरण
शटडाऊन सकाळी ७ वाजता घ्यायचा होता, मग तो ८.३० ला का घेतला? आधीच उन्हाचा तडाखा वाढलेला असताना असे ढिसाळ नियोजन का केले? याचा त्रास मात्र सामान्य नागरिकांनाच सहन करावा लागतो.
- सुनीता पाटील, स्थानिक गृहिणी
सकाळी ७ ते १२ एवढाच वेळ सांगितला होता, मग दुपारी अडीचपर्यंत वीज का गायब ठेवली? कडक उन्हात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले. महावितरणाने नियोजन नीट करून नागरिकांना वेठीस धरणे थांबवले पाहिजे.
- राजू मोरे, स्थानिक नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.