पैसे गुंतविण्यास सांगून बारा लाखांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पैसे गुंतविण्यास सांगून 
बारा लाखांची फसवणूक
पैसे गुंतविण्यास सांगून बारा लाखांची फसवणूक

पैसे गुंतविण्यास सांगून बारा लाखांची फसवणूक

sakal_logo
By

पिंपरी : ट्रेडिंग अ‍ॅपमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून एकाची बारा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. आशीर्वाद मुकुंद उगे (रा. ब्लुमिंग डेल, रावेत) यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांना त्यांच्या व्हॉटसअ‍ॅपवर मेसेज आला. त्यामध्ये डिव्हाईन काऊज या ट्रेडिंग अ‍ॅपची माहिती होती. त्यावर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात माहिती दिली होती. त्यानुसार उगे यांनी ट्रेडिंग अ‍ॅपमध्ये ११ लाख ९९ हजार रुपये गुंतवले. त्यात फायदा झाल्याचा तपशील अ‍ॅपवर दिसत होता. मात्र, नंतर ती सर्व माहिती डिलीट झाली व बॅलन्स दिसत नव्हता. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसात तक्रार दिली.

भरधाव वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
रस्ता ओलांडत असताना भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना बालेवाडी येथे घडली. बाळू बापू अवचरे (वय ३२, रा. म्हाळुंगे, ता. मुळशी) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी गौतम बापू अवचरे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बाळू अवचरे हे मुंबई- बंगळुरू मार्गावर बालेवाडीतील स्टेडियमसमोरील रस्ता ओलांडत होते. दरम्यान, मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरील भरधाव वाहनाने त्यांना जोरात धडक दिली. यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

पिंपळे निलखमधील घरफोडीत ऐवज लंपास
कुलूप तोडून घरात शिरलेल्या चोरट्याने पन्नास हजारांचा ऐवज लंपास केला. हा प्रकार पिंपळे निलख येथे घडला. अनुजा अविनाश कुलकर्णी (रा. प्रेस्टन वुड सोसायटी, न्यू डी पी रोड , पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरटा आत शिरला. बेडरूममधील लाकडी वॉर्डरोब उचकटून सोने- चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ४९ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.

कोयता बाळगल्याप्रकरणी एक ताब्यात
बेकायदा कोयता बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक कोयता जप्त केला. ही कारवाई आकुर्डी येथे करण्यात आली असून निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.