नाट्यमय घडामोडीनंतरही राहुल कलाटे रिंगणात 
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक ः तिरंगी लढत होणार

नाट्यमय घडामोडीनंतरही राहुल कलाटे रिंगणात चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक ः तिरंगी लढत होणार

पिंपरी, ता. १० : चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज (शुक्रवारी) महाविकास आघाडीचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा अर्ज कायम राहिला. त्यामुळे या मतदार संघात तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. दरम्यान, थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये पाच जणांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने आता रिंगणात २८ उमेदवार राहिले आहेत.
भाजपच्या उमेदवार अश्‍विनी जगताप, महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे, अपक्ष राहुल कलाटे या प्रमुख उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. दुपारी तीनपर्यंत पाच जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामध्ये राजेंद्र काटे, भाऊसाहेब अडागळे, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण कदम, ॲड. मनिषा कारंडे, रवींद्र पारधे यांचा समावेश आहे.

कलाटे यांच्यावर माघारीसाठी दबाव
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सचिन अहीर आज सकाळी कलाटे यांना वाकड येथील त्यांच्या कार्यालयात भेटले. बंद दाराआड चर्चा करताना उद्धव ठाकरे यांचे कलाटे यांच्याशी मोबाईलवरून बोलणे झाले. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक नेते योगेश बहल व मोरेश्‍वर भोंडवे यांनी कलाटे यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. त्यानंतर दुपारी दीडच्या दरम्यान कलाटे हे राष्ट्रवादीचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष किशोर भेगडेंबरोबर अज्ञात स्थळी रवाना झाले. त्यानंतर दुपारी पावणे तीनच्या सुमारास वाकड येथील कार्यालयात आले. तत्पूर्वी पाच मिनिटे आधी माजी आमदार विलास लांडे, संजोग वाघेरे हे कलाटे यांच्या कार्यालयाजवळ आले होते. त्यांनीही शेवटचा शिष्टाईचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही. अखेर तीन वाजता पत्रकारांसमोर येऊन, कलाटे यांनी आपण निवडणूक लढवत असल्याचे जाहीर केले.
----

उद्धव ठाकरे, अजित पवार आदि नेत्यांनी संपर्क साधला. त्यांच्याबद्दल आदर आहे. कार्यकर्त्यांचा रेटा व जनतेची लोकभावना, आयटीचा वर्ग, जनतेचा असलेला पाठिंबा याचा आदर करत मी या निवडणुकीला सामोरे जात आहे. उमेदवारी कापल्यामुळे मलाच सहानुभूती आहे.
- राहुल कलाटे, अपक्ष उमेदवार.

लोकांचा मला खूप चांगला प्रतिसाद आहे. प्रचारात फिरताना लोक म्हणतात, की तुम्ही प्रचाराला इकडे येऊ नका, हा बालेकिल्ला आहे. त्यामुळे तिरंगी लढत झाली तरी विजय आमचाच आहे.
- अश्‍विनी जगताप, भाजप उमेदवार.

महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा व कॉंग्रेसचा मला पाठिंबा आहे. सचिन अहीर यांनी आज शिवसैनिकांना महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याबाबत सांगितले. त्यामुळे चांगला प्रतिसाद मिळत आहे. भाजपशी आमची लढत असून, विजय माझाच आहे.
विठ्ठल ऊर्फ नाना काटे, राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com