
महाशिवरात्रोत्सवात दक्षिणेत साकारला ''कैलास'' राष्ट्रपतींच्या उपस्थितीत कार्यक्रम; सव्वालाख भक्तांचा सहभाग
शंकर टेमघरे ः सकाळ वृत्तसेवा
कोईमतूर, ता. १८ : आदिनाथाची मनोहरी भव्य मूर्ती...नयनरम्य सजावट... आकर्षक विद्युत रोषणाई... संगीत अन् नृत्याचा अनोखा आविष्कार....भक्तिमय वातावरणामुळे कमालीचा उत्साह ... अशा जल्लोषी अन् ऊर्जेची पर्वणी आज शेकडो भक्तांनी अनुभवली. निमित्त होते ईशा फाउंडेशनच्या महाशिवरात्रीचे.
कोईमतूरजवळील वेलंगिरीच्या ११२ फुटी आदिनाथांचा महाशिवरात्रीचा उत्सव ईशा फाउंडेशनच्यावतीने दरवर्षी आयोजित केला जातो. कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळामध्ये तो होऊ शकला नाही. गतवर्षी मर्यादित स्वरूपात झाला. यंदा मात्र सुमारे दोन लाख भाविकांनी यात सहभाग घेतला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि सद्गुरू यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास शिवगीताने सुरवात झाली. संगीत आणि नृत्याने सजलेल्या वातावरणात सुरू झालेली रम्य संध्याकाळ उत्तररात्र अधिकच भक्तिरंगात न्हाऊन निघाली. अखंड श्रद्धेचा प्रवाह रात्रभर शिवभक्तीने प्रवाहित राहिला. त्याच्या केंद्रस्थानी होते आदियोगींची मूर्ती आणि सद्गुरू. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची उपस्थिती कार्यक्रमाच्या शिरपेचातील तुरा ठरली.
निलाद्री कुमार, मामे खान, राम मिरीयाला, निहार जांभेकर, अनन्या चक्रवर्ती, मंगली, वेल मुर्गन यांचे परफॉर्मन्स उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारे होते.
............
दोन अब्ज लोकांना
सहभागी करणार
महाशिवरात्रीच्या निमित्ताने महायज्ञ प्रज्वलित करण्यात आला. त्यावेळी सद्गुरूंनी दोन वर्षांत दोन अब्ज लोकांना योगाच्या सानिध्यात आणणार, असा संकल्प केला. यावेळी तमिळनाडूचे राज्यपाल तरुण रवी नारायण, मंत्री डी. एम तंगराज उपस्थित होते.
शिवमय वातावरण
आदियोगी मूर्तीवर केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने साकारलेल्या दिव्यदर्शनाने वातावरण कैलासमय झाले होते. वीस मिनिटे झालेल्या विशेष शोमुळे महाशिवरात्रीला भाविकांना दर्शनाचा आनंद घेतला.
दक्षिणेतील कैलासावर आल्याची संधी मिळाली, हे भाग्य आहे. आदियोगी, नटराज, अर्धनारी अशा अनेक नावाने असलेले शिवतत्त्व समाजाला ज्ञान योग भक्तीची शिकवण देते. सद्गुरूंच्या माध्यमातून जगभरातील तरुणांना शिवतत्वातून यशस्वीपणे जीवन जगण्याची दिशा देत आहेत.
- द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती
फोटो
कोईमतूर : ईशा फाउंडेशनच्यावतीने शनिवारी आयोजित केलेला महाशिवरात्रीचा कार्यक्रम उत्साहात रंगला.