
महिलांच्या समस्या सोडविणार आमदार असावा चिंचवड पोटनिवडणूक ः गृहिणी, नोकदार आणि उद्योजिकांनी व्यक्त केल्या अपेक्षा
पिंपरी, ता. २० ः चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे. मात्र, समाजात वावरताना सोयी- सुविधा नसल्यामुळे महिलांकडून नाराजीचा सूर आळवला जात आहे. स्वच्छतागृहे, सुरक्षा, अपुरा पाणीपुरवठा, प्रवासाच्या सोयी आणि बंद पडलेले बचत गटांचे व्यवसाय याकडे कोणी लक्ष देत नसल्याची त्यांची तक्रार आहे. मतदार संघातील नोकरदार, गृहिणी आणि उद्योजिकांनी भावी आमदार यांच्यासमोर ‘सकाळ’च्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले आहेत. महिलांच्या विविध समस्या सोडविणारा आमदार असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
---------------
गृहिणी म्हणतात
‘‘सांगवी, पिंपळे गुरव परिसरात रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली रस्ते बाधित नागरिकांची घरे पाडण्यात आली. रस्ते मोठे झाले खरे पण रस्ता रहदारीसाठी की वाहने पार्किंगचा असा प्रश्न सांगवी, पिंपळे गुरव, नवी सांगवी परिसरात पाहायला मिळतो. नियोजनाचा अभाव व दुर्लक्षामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. भावी आमदारांनी रहदारीकडे लक्ष द्यावे. ’’
-राधिका घोडके, नवी सांगवी
‘‘पाणीपुरवठा नियमित व्हायला हवा. पिण्याचे पाणी दिवसाआड होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. दिवसाआडऐवजी रोज नियमित पाणी पुरवठा करावा. कमी दाबाच्या पाणी पुरवठ्यामुळे गृहिणींना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
- रंजना शिंदे, जुनी सांगवी.
‘‘सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, विद्यार्थ्यांसाठी सुविधा, अतिक्रमणमुक्त चांगले रस्ते आवश्यक आहेत. तसेच पर्यावरणाच्या मुद्द्यांनाही महत्त्व दिले पाहिजे.’’
-गीता लेले, रावेत
आम्हाला फक्त इलेक्शनच्या वेळी दर्शन देणारा उमेदवार नको आहे. रावेत एक विकसनशील क्षेत्र आहे. येथील रस्त्यांची कामे जलद गतीने झाली पाहिजेत.’’
- प्रज्ञा साळुंखे, रावेत
विशालनगर येथील वाकड फाटा येथून बाणेरकडे जाणाऱ्या किमान ४ ते ५ किलोमीटर डीपी रोडवर कोठेही महिलांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध नाहीत. तसेच रस्त्यावरील असलेल्या ज्या अनेक गल्ल्या आहेत, त्यांना ‘लेन क्रमांक’ द्यावेत. शेतकरी आठवडे बाजार फक्त एकच दिवस असावा. या रस्त्यावरील पदपथांवर ओपन जिमची उपकरणे बसवावीत. पाणी पुरवठा सलग २४ तास असावा. निवडून येणाऱ्या आमदाराने जनतेच्या तक्रारीसाठी जनता दरबार भरविला जावा.
-रोहिणी गंगावणे, विशाल नगर
‘‘महिलांच्या सुरक्षेकडे प्राधान्याने लक्ष देणारा आमदार हवा आहे. या मतदार संघात पाण्याची गंभीर समस्या आहे. सार्वजनिक वाहतूक आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांची सोय उपलब्ध करून द्यावी. अद्याप काही परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण झालेले नाहीत. नागरिकांच्या पैशाचा गैरवापर न करता शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणारा आमदार असावा.’’
नीता अविनाश जगताप, पिंपळे निलख
‘‘ नवनिर्वाचित आमदारांनी गृहिणीच्या समस्या समजून घ्याव्यात. बऱ्याच ठिकाणी अजूनही टॅंकर बोलवावे लागतात. भोईर कॉलनीत रस्त्यावर डांबर टाकले, ते एकाच बाजूला. बाकी रस्ता तसाच आहे. सिमेंटचा रस्ता करावा. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा.’’
- साधना बापट, चिंचवड
‘‘नवनिर्वाचित आमदारांनी गृहिणींचे प्रश्न समजून घेणे आवश्यक
आहेत. वाढती महागाई, भाज्या, गॅस, किराणा यांच्या वाढत चाललेल्या किंमतीमुळे कौटुंबिक बजेट पूर्णपणे विस्कळित झाल्याने संसारात रोजचे प्रश्न सोडवणे त्रासदायक झाले आहे. त्यात एक दोन दिवसा आड होणारा अनियमित पाणी पुरवठाही जाचक ठरला आहे. निवडून येणारे आमदार याबाबत दक्ष राहून सहकार्य करणारे असतील तर गृहिणींना आनंद व समाधान लाभेल.’’
-अलका इनामदार, चिंचवड
नोकरदार महिला म्हणतात
‘‘आमदार किमान शिक्षित असावा. किमान पदवीधारक असावा. जेणेकरून त्याला जगात काय चालले आहे, ते समजेल. त्याची पूर्वीची वागणूक चांगली असावी. सर्व लोकांना बरोबर घेऊन काम करणारा असावा. ’’
-राजेश्वरी ढोरे, रावेत
‘‘जनतेच्या समस्यांवर मात करणारा असावा आणि जनतेशी माणुसकीने वागणारा असावा. वेळेला गरज पडल्यास जनतेला मदत करणारा असावा. पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा असावा. जनतेला जीवनावश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देणारा असावा.’’
-सत्यशीला पाडळे, जुनी सांगवी
‘‘भावी आमदार हा मतदार संघाचा विकास करणारा असावा. विधानसभेत मतदार संघातील अडचणी मांडणारा असावा. प्रशासनावर त्याचा वचक असावा. आदिवासी जनकल्याणासाठी काम करणारा असावा. नागरी सुविधांवर भर देणारा असावा.’’
-पुष्पा शेंगाळे, पिंपळे गुरव
आमदार हा भ्रष्टाचाराला आळा घालणारा असावा. पिंपरी चिंचवडच्या राजकीय कारभारातही बदल घडवून आणणारा असा सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून त्यांचे प्रश्न सोडवणारा असावा, आमदाराचे ध्येय अचूक असावे, असे मला वाटते.
-नीलम लांडगे, पिंपळे गुरव
‘‘चोवीस तास पिण्याच्या पाण्याची उपलब्धता हवी. सोईस्कर सार्वजनिक वाहतूक सेवा असावी. महिलांसाठी कमीत कमी खर्चात वार्षिक वैद्यकीय तपासणी महापालिका रूग्णालयात सेवा द्यावी. करदाता म्हणून मोफत निदान सेवा द्याव्यात.’’
-मानसी फडके, चिंचवडगाव
उद्योजिका म्हणतात
‘‘आमदार कसा हवा तर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणारा हवा. रेड झोन, कचऱ्याचे विघटन, सांडपाणी प्रक्रिया, अनियमित वीजपुरवठा असे महत्त्वाचे प्रश्न सक्षमपणे सोडविणारा असावा. पिंपरी चिंचवडसारख्या उद्योगनगरीत उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी सवलती व संधी देणारा असावा.’’
-प्राजक्ता रुद्रवार, रावेत
‘‘आमदार सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करणारा हवा. आपल्या शहरातील समस्या काय आहेत हे जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी आक्रमक प्रयत्न हवा. बरेचदा त्यांच्या आजूबाजूच्या लोकांच्या मुळे आमदारांच्या बरोबर भेट होणे किंवा नागरिकांचे प्रश्न सहज त्यांच्या समोर मांडता येत नाहीत. म्हणून महिन्यातील काही ठराविक वेळ दिवस हे त्यांना भेटून प्रश्न मांडता यावेत.आमदारांनी भावी पिढी सक्षम होण्यासाठी आपल्या क्षेत्रातील कार्यक्षम, वैचारिक, बौद्धिक आणि समाजाचा चौफेर विचार करणारी मंडळी एकत्र करून त्यांच्याकडून देशासाठी म्हणजेच आपोआप राज्यासाठी सकारात्मक सर्व बाबी करवून घ्यायला हव्यात. विधानसभेत आपल्या भागासाठी त्याच्या विकासासाठी कायम प्रयत्नशील असायला हवा.’’
-उत्कर्षा कुलकर्णी, रावेत
‘‘माझ्या दृष्टीने येणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीतील आमदार हा दूरदृष्टी असलेला असावा. कोरोना काळानंतर डबघाईला आलेल्या छोटे छोटे उद्योग समूह बंद पडू लागले आहेत. अशा उद्योगांना आपल्या कर्तव्यातून नवी उभारी देणारा आमदार हवा आहे. सुशिक्षित बेरोजगार युवकांचा आधार बनून, त्यांना नवी दिशा दाखवणारा आमदार हवा आहे.’’
-नूतन रोहित शेळके, जुनी सांगवी
घरोघरी पोहोचण्याच्या दृष्टीने प्रायोगिक संस्थांच्या उपक्रमांना नाट्यगृह सवलतीच्या दरात उपलब्ध व्हावे. तसेच वेगवेगळ्या स्पर्धांसाठी संघ सराव करण्याच्या दृष्टीने पालिकेच्या प्रभागातील असणारे महापालिकेचे सांस्कृतिक केंद्र अथवा विरंगुळा केंद्रांचे हॉल मोफत उपलब्ध व्हावेत, जेणेकरून अनेकानेक संस्था विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन, त्यातून उत्तमोत्तम कलाकार घडत जातील. महापालिकेच्या सांस्कृतिक विभागा कडून घेतले जाणारे विविध महोत्सव ठराविक ठिकाणी न घेता शहरातील विविध भागांमध्ये घेतले जावे. स्थानिक कलाकारांना त्यामध्ये सहभागी करून घेण्यात यावे.’’
-रूपाली पाथरे, चिंचवडगाव