
भाजप आणि राष्ट्रवादीचा विकासाचा दावा फोल अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा आरोप
पिंपरी, ता. २० : चिंचवड मतदारसंघाच्या निर्मितीपासून चिंचवड मतदारसंघ जगताप कुटुंबीयांच्या ताब्यात होता. तर, राष्ट्रवादीची महापालिकेत १५ वर्षे सत्ता होती. असे असतानाही चिंचवडकरांना पाण्यासारख्या जीवनावश्यक समस्येला सामोरे जावे लागते. यातच भाजप आणि राष्ट्रवादीच्या विकासाचा दावा किती फोल आहे, हे स्पष्ट होते. विकासाच्या वल्गना करणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांनी एकाच व्यासपीठावर येऊन चर्चा करावी, असे खुले आव्हान अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी दिले.
कलाटे यांनी मतदारसंघातील वाल्हेकरवाडी, रावेत परिसरात जाऊन कोपरा सभांद्वारे नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
कलाटे म्हणाले की, मला मिळत असलेला प्रतिसाद पाहून, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. चिंचवडचा सर्वांगीण विकास झाला नाही. मागील पाच वर्षे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असताना विकास कामांपेक्षा भ्रष्टाचाराच्या आरोपांवरूनच भाजप जास्त चर्चेत राहिला. भाजपने टक्केवारीच्या राजकारणापायी शहराच्या केलेल्या विभागणीमुळे शहर मागे पडले. आताचे राष्ट्रवादीचे उमेदवार महापालिकेत विरोधी पक्षनेते असताना सभागृहात किती वेळा बोलले, हा संशोधनाचा विषय आहे.
राहुल कलाटे म्हणाले...
- शहरवासीयांना मुबलक पाणी मिळत नाही, महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप
- राष्ट्रवादी काँग्रेसला १५ वर्षे सत्ता असताना शहरातील पाण्याचे नियोजन करता आले नाही
- राष्ट्रवादी आणि भाजपला वाढत्या लोकसंख्येनुसार शहराचा विकास करता आला नाही
- त्यामुळे या पोटनिवडणुकीत जनता उच्चशिक्षित उमेदवाराच्या पाठीशी उभी राहील
फोटोः 26002