
रेडझोनमधील लॅड माफियांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
पिंपरी, ता. २२ : संरक्षण क्षेत्रातील बाधित जागांची लँड माफियाकडून खरेदी-विक्री व्यवहार करुन नागरिकांची फसवणूक प्रकार सुरू आहे. लाखो रुपये खर्च करून बांधकाम केल्यानंतर बांधकाम अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जात आहे. दुसरीकडे महापालिका अधिकारी तीन पट कर आकारणी करत आहेत. तळवडे, देहूगाव, रुपीनगर, पाटीलनगर, त्रिवेणीनगर, टावरलाईन या भागातील लोकांची फसवणूक मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. त्यांना बांधकाम परवाना मिळत नाही. बँक कर्ज मिळत नाही. जागा एन. ए होत नाही. या जागा संरक्षण क्षेत्रातील बाधित जागा म्हणून पुणे जिल्हाधिकारी यांनी जाहीर केली आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात संरक्षण क्षेत्रातील बाधित जागा खरेदी-विक्री व्यवहाराविषयी अप्पर तहसीलदार यांना इ-मेल करुन तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे लँड माफिया यांच्या विरोधात मोका कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे.