महापालिका इमारतींच्या भाड्याची पोलिस आयुक्तालयाकडे थकबाकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका इमारतींच्या भाड्याची पोलिस आयुक्तालयाकडे थकबाकी
महापालिका इमारतींच्या भाड्याची पोलिस आयुक्तालयाकडे थकबाकी

महापालिका इमारतींच्या भाड्याची पोलिस आयुक्तालयाकडे थकबाकी

sakal_logo
By

पिंपरी, ता. २१ : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी महापालिकेच्या काही इमारती भाडेतत्वावर दिलेल्या आहेत. या इमारतींच्या भाड्यापोटी पोलिस आयुक्तालयाकडून महापालिकेला साडे पाच कोटी रूपये भाडे येणे आहे. वर्षानुवर्षे भाडे भरले नसल्याने मोठी थकबाकी राहिली आहे.
पुणे शहर व ग्रामीण हद्दीतील पोलिस ठाणे मिळून नव्याने पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. १५ ऑगस्ट २०१८ पासून नवीन आयुक्तालयाचे कामकाज सुरु झाले. चिंचवडमधील प्रेमलोक पार्क येथील महापालिकेच्या महात्मा फुले शाळेची इमारत पोलिस आयुक्तालयासाठी देण्यात आली. १ जानेवारी २०१९ पासून प्रेमलोक पार्क येथील नवीन इमारतीतून पोलिस आयुक्तालयाचे कामकाज सुरु झाले.

स्वतंत्र पोलिस आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर पोलिस आयुक्तांनी विविध कामकाजासाठी महापालिकेच्या इमारती भाडेतत्वावर देण्याबाबतची मागणी केली. त्यानुसार, पोलिस उपायुक्त परिमंडळ तीनच्या कार्यालयासाठी चिंचवड स्टेशन येथील प्रिमिअर प्लाझा येथील दोन मजली इमारत दिली आहे. तसेच सांगवीतील भाजी मंडईसाठी विकसित केलेले गाळे सांगवी पोलिस ठाण्याच्या इमारतीसाठी देण्यात आले. यासह पिंपरीतील मेघाजी लोखंडे कामगार भवन, मोहननगर येथील बहुउद्देशीय इमारत, पिंपळे गुरव उद्यानातील क्वॉटर्स, दिघी, वडमुखवाडी येथील जागाही पोलिसांच्या वाहतूक विभाग, गुन्हे युनिट शाखा या विविध विभागासाठी भाडेतत्वावर दिल्या आहेत.
मुख्यालयासाठी निगडी येथील कै. अंकुश बोऱ्हाडे शाळेची इमारत तसेच मोकळी जागाही दिली आहे. थेरगाव पोलिस चौकीसाठी महिला विकास केंद्राची इमारत, गुन्हे शाखा युनिट दोनसाठी यमुनानगर येथील अहिल्यादेवी होळकर व्यायामशाळा अशा विविध इमारती दिल्या आहेत. १५ ऑगस्ट २०१८ पासून अद्यापपर्यंत या इमारतींच्या भाड्यापोटी महापालिकेला पाच कोटी ६२ लाख रूपये थकबाकी येणे आहे. या थकबाकीची पूर्तता होण्याची महापालिकेला प्रतिक्षा आहे.


कार्यालयाचे नाव मासिक भाडे थकबाकी
१) सांगवी पोलिस ठाणे १८ हजार ९ लाख
२) पोलिस उपायुक्त , परिमंडळ तीन २८ हजार १५ लाख
प्रीमिअर प्लाझा, चिंचवड
३) पिंपरी वाहतूक विभाग, ११ हजार ६ लाख
४) गुन्हे युनिट -३, मोहननगर, १२ हजार ३६५ १७ लाख
५ ) सांगवी पोलिस ठाणे, पिंपळे गुरव ३ हजार ४५२ १ लाख
६) पोलिस आयुक्तालय, प्रेमलोक पार्क, चिंचवड ३ लाख ८० हजार २ कोटी ३ लाख
७) दिघी पोलिस ठाणे, दिघी २ लाख २६ हजार १ कोटी २० लाख
८) पोलिस मुख्यालय , निगडी ६० लाख
९) वाहतूक शाखा, चापेकर चौक, २ लाख ३१ हजार १ कोटी
चिंचवड
१०) थेरगाव पोलिस चौकी ४३ हजार २३ लाख
११) गुन्हे शाखा युनिट २, यमुनानगर २७ हजार ७ लाख
१२) गुन्हे शाखा युनिट ४, डांगे चौक २ हजार १ लाख


या थकबाकीसंदर्भात पोलिस विभागाला पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून या मार्चअखेरपर्यंत थकबाकीची पूर्तता होणे अपेक्षित आहे.

- प्रशांत जोशी, सहायक आयुक्त, भूमी व जिंदगी विभाग, महापालिका.