
माणुसकी नाही राहिली सुरक्षाही चोरीला गेली
-------------
प्रति,
मा. वरिष्ठ पोलिस निरीक्षक, यांना सविनय सादर,
प्रतिवेदक ः आर. एम. सूर्यवंशी, पोलिस उपनिरीक्षक.
विषय ः उपरिनिर्दिष्ट प्रकरणी गुन्हा दाखल होण्याबाबत.
महोदय, उपरोक्त संदर्भीय विषयान्वयाच्या अनुसंगाने आपणास विहित नमुन्यात विदित करण्यात येते, की
गजानन नामे गृहनिर्माण सोसायटीत अज्ञात चोरट्यांनी घरमालकाची तोंडी वा लेखी पूर्वपरवानगी न घेता घराच्या उत्तर दिशेने मध्यरात्रीच्या सुमारास, खिडकीचे लोखंडी गज वाकवून घरामध्ये बेकायदेशीररीत्या प्रवेश केला. त्याकामी सदरहू दोन अज्ञात इसमांविरूद्ध कायदेशीर तक्रार आहे.
जबाब नोंदवणार ः सुधीर मानकोजी कापसे. राहणार ः भाड्याच्या घरात.
उमर ः ४५, कदखाठी ः ५ फूट ८ इंच, नोकरी - धंदा ः तसले काही नाही. आवड ः निवांतपणे घरी बसून दोन वेळेचे आयते खाणे.
मेहेरबान साहेब, उपरोक्त विषयान्वये मी सुधीर कापसे यांच्या भाड्याच्या घरात समक्ष हजर राहून, जबाब नोंदवला आहे. या कामी नशापाणी न केलेल्या व संपूर्णपणे शुद्धीत असलेल्या दोघा साक्षीदारांचा त्यांच्या राजखुशीने जबाब नोंदवला आहे.
सुधीर कापसे हे मध्यरात्री २. ३५ च्या सुमारास घरात डाराडूर घोरत असताना, सदरहू दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात बेकायदेशीररीत्या प्रवेश केला. २. ४० मिनिटांनी त्यांनी घरातील कर्ता पुरूष निद्राधीन झाल्याची खात्री केली. त्यानंतर घरामध्ये उचकापाचक केली. पण घरातील कर्ता पुरूष (जे की सुधीर कापसे, निवांतपणे घरी बसून, दोन वेळचे आयते खाणारे) काही कमवत नसल्याने, सदरहू अज्ञात चोरट्यांच्या हाती मुदलात काही लागले नाही. मध्यरात्री २. ४५ मिनिटांनी त्यांनी लोखंडी कपाट (सासऱ्याने लग्नात हुंडा म्हणून दिलेले) उघडले. मात्र, त्यातही काही आढळले नाही. अधिक खोलात गेल्यावर त्यांना एका कप्प्यात दहा लिंबे व वीस हिरव्याकंच मिरच्या मिळाल्या. तो ऐवज पाहून अज्ञात चोरट्यांचा चेहरा आनंदाने डबडबला. (की खुलला. दोन्हीपैकी योग्य असेल ते घ्यावे.) चोरट्यांनी खुशीमधे सगळा ऐवज आपल्या ताब्यात घेतला. सध्या लिंबे आणि हिरव्या मिरच्यांचा भाव गगनाला भिडला आहे. त्यामुळे सर्वसामान्य इसमांचे घर, दुकान आणि वाहनांना मिळणारी वाय सुरक्षाव्यवस्था महाग झाली आहे. त्यामुळे अनेक सर्वसामान्य इसमांना आपल्या दारासमोर आणि गाडीला लिंबू- मिरची टांगणे अवघड झाले आहे. तदनुषंगिक अनेकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. जबाब नोंदवणारे सुधीर कापसे हा इसमदेखील त्याच कॅटगिरीतला आहे. दाराला लिंबू- मिरची टांगली नसल्यानेच आपल्या घरी चोरी झाल्याचा वहीम जबाब नोंदवणाऱ्यास आहे. अज्ञात चोरट्यांना एकाचवेळी दहा लिंबू व वीस हिरव्याकंच मिरच्या एवढा महागडा ऐवज मिळाल्याने त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. त्यामुळे त्यांनी सदरहू फिर्यादीची झोपमोड केली नाही, तसेच मारहाणही केली नाही. (हे जरा अज्ञात चोरट्यांचे चुकलेच. आम्हाला चोरटे सापडल्यास, आम्ही त्यांना याबाबत जाब विचारू.) मध्यरात्री ३. १० मिनिटांनी अज्ञात चोरटे ऐवज घेऊन पसार झाले. फिर्यादीने जबाब नोंदवल्यानंतर आपल्या खात्याने या चोरीची गंभीर दखल घेतली आहे. तपासाकामी चार पथके नेमली असून, अज्ञात चोरटे कोठेही लिंबू- मिरची विकताना आढळल्यास त्यांच्या मुसक्या आवळण्याचे लेखी आदेश निर्गमीत केले आहेत. या कामी अज्ञात चोरट्यांविरूद्ध भां. दं. वि. कलम ४५४, ४५७, ३८०, ५११ प्रमाणे फिर्याद नोंदवली असून, यासोबतच ती पाठवली आहे.
तरी सदर बाबत ठाणे दैनंदिनी नोंद होऊन, गुन्हा रजिस्ट्रर होऊन, तपासकामी पुढील आदेश होणे ही विनंती. मा. सादर व्हावे.
आपल्या अनुज्ञप्तीच्या अधीन
आर. एम. सूर्यवंशी
(पोलिस उपनिरीक्षक)