
सकाळी संथगतीने, दुपारनंतर रांगा तरूणाईबरोबरच ज्येष्ठांचाही मतदानामध्ये उत्साह
पिंपरी, ता. २६ : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सकाळी संथगतीने मतदान सुरू होते. दुपारी उन्हाची तीव्रता असल्यामुळे मतदार कमी प्रमाणात बाहेर पडले. मात्र, पिंपळे गुरव, रहाटणी, थेरगाव व वाकड परिसरात दुपारी चारनंतर ऊन उतरल्यावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. मतदारांमध्ये विशेषतः सुशिक्षित व आयटीयन्स मतदारांमध्ये उत्साह कमी दिसला. मात्र, अनेक ठिकाणी तरुणाईबरोबर ज्येष्ठांनीही उत्साहात मतदान केले.
चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार होते. त्यापैकी पुरुष ३ लाख २ हजार ९४६ व महिला २ लाख ६५ हजार ९७४ तर; तृतीयपंथी ३४ मतदार होते. या मतदानासाठी सांगवी ते किवळे-रावेतपर्यंत एकूण ५१० मतदान केंद्र होते.
सकाळी ७ वाजता मतदानाला सुरवात झाली. रविवार सुटीचा दिवस असल्याने सकाळी ९ पर्यंत तुरळक मतदारांची उपस्थिती दिसली. सकाळी ९ पर्यंत फक्त ३.५२ टक्के मतदान झाले. सकाळी १० वाजल्यानंतर नाष्टा, चहा झाल्यानंतर मतदारांनी बाहेर पडायला सुरवात केली. पिंपळे गुरवमधील मतदान केंद्रांवर सकाळी १०.३० च्या सुमारास गर्दी दिसत होती. पिंपळे गुरवला पावणे बाराला मतदारांच्या चांगल्या रांगा लागल्या होत्या.
भाजपच्या माजी नगरसेवकास मारहाण
पिंपळे गुरवमध्ये महापालिकेच्या जुन्या शाळेमधील मतदान केंद्रावर सकाळी ९.१५ च्या सुमारास भाजपचे माजी नगरेसवक सागर आंगोळकर मतदान केंद्राजवळ फिरत असताना, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक नवनाथ जगताप यांचे चुलत बंधू गणेश जगताप यांनी आक्षेप घेत कार्यकर्त्यांना काही सूचना दिल्या. त्यावेळी आंगोळकरांनी मागून मान हलवून प्रतिसाद देत चेष्टा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गणेश जगताप यांनी आंगोळकर यांना मारहाण केल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. माजी महापौर शकुंतला धराडे यांनी मध्यस्थी केल्यामुळे पुढील वाद मिटला. याबाबत आंगोळकर व जगताप यांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला. परंतु; पोलिसांनी कोणाचीच तक्रार दाखल केली नाही.
सांगवी परिसरात सकाळी रांगा नव्हत्या पण मतदारांचा प्रवाह चांगला होता. सकाळी ११ पर्यंत सांगवीत ९ टक्क्यांच्या आसपासच मतदान होते. परंतु; नंतर मतदान वाढले. काळेवाडीतही सकाळी ११.३० पर्यंत गर्दी नव्हती. तसेच; वाकड व थेरगाव परिसरातही दुपारी १२.३० ते १ पर्यंत फारशी गर्दी नव्हती. चिंचवड गाव परिसरात त्या तुलनेत सकाळी व दुपारी १.३० पर्यंत चांगली गर्दी होती. चिंचवड गावात एका नागरिकाने वेगळी वेशभूषा करत, मतदानाची जनजागृती करत मतदान केले.
पिंपळे सौदागर भागात आयटीयन मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु; दुपारी तीनच्या सुमारास त्यांची उपस्थिती कमी प्रमाणात जाणवत होती. अण्णासाहेब मगर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील मतदान केंद्रांवर दुपारी ३ पर्यंत सरासरी ३२ टक्के व पिंपळे गुरवला ३३ टक्के मतदान झाले होते. पिंपळे गुरवला दुपारी चार वाजल्यानंतर पिंपळे सौदागर, रहाटणी या परिसरात मतदारांनी रांगा लावल्या. विशेषतः: रहाटणीच्या महापालिका शाळेत मोठ्या प्रमाणात रांगा होत्या
कार्यकर्त्यांना भेटण्याकडे ओढा
काळेवाडीच्या मराठा मित्र मंडळाच्या शैक्षणिक संकुलातील मतदान केंद्रांवरही पावणे पाचच्या सुमारास मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. थेरगावमध्येही सायंकाळी ५ वाजता यशवंतराव चव्हाण प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात मोठ्या प्रमाणात मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. तर; बाहेरील बाजूस भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, अन्य पक्ष व अपक्षांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात थांबले होते. मतदार त्यांना भेटून नंतर मतदानाला जात होते.
थेरगावच्या शिवकॉलनी पसिरातही मोठ्या प्रमाणात मतदार बाहेर पडले होते. वाकड परिसरात महापालिकेच्या शाळेतील मतदान केंद्रावर सायंकाळी ५.४५ वाजताही चार मतदान केंद्रावर मोठ्या रांगा होत्या. किवळे-रावेत परिसरातही या मतदान केंद्रांवर आयटीयन्सही मतदान करताना दिसत होते. सायंकाळी ६ वाजता मतदानाची वेळ संपल्यानंतर वाकड, थेरगाव, पिंपळे गुरव परिसरात मतदान केंद्राचे
गेट बंद करून, रांगेतील मतदारांचे मतदान करून घेण्यात आले.
क्षणचित्रे -
- विकलांग, अपंगांना मतदान करण्यासाठी सहायता कक्ष
- ज्येष्ठांना, अपंगांना मतदानासाठी व्हीलचेअरची सोय
- मतदार स्लीप शासकीय कर्मचाऱ्यांकडून घेऊन येण्याचा आग्रह
- मतदारांच्या सेल्फी पाईंटचे प्रमाण २०१९ च्या तुलनेत कमी
- वाकड शाळेतील केंद्र क्रमांक ३९५ व ४०५ आणि रावेत येथील मतदान केंद्र क्रमांक २३ आदर्श मतदान केंद्र
- थेरगाव येथील सखी मतदान केंद्रात सर्व महिला कर्मचारी व अधिकारी.