‘चिंचवड’वरून ठरणार महापालिकेचे ‘गणित’ विधानसभा निकालावरून चर्चा ः भाजप सत्ता राखणार की राष्ट्रवादी उट्टे काढणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘चिंचवड’वरून ठरणार महापालिकेचे ‘गणित’

विधानसभा निकालावरून चर्चा ः भाजप सत्ता राखणार की राष्ट्रवादी उट्टे काढणार
‘चिंचवड’वरून ठरणार महापालिकेचे ‘गणित’ विधानसभा निकालावरून चर्चा ः भाजप सत्ता राखणार की राष्ट्रवादी उट्टे काढणार

‘चिंचवड’वरून ठरणार महापालिकेचे ‘गणित’ विधानसभा निकालावरून चर्चा ः भाजप सत्ता राखणार की राष्ट्रवादी उट्टे काढणार

sakal_logo
By

पीतांबर लोहार ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २ ः गेल्या वर्षभरापासून महापालिका निवडणूक वेगवेगळ्या कारणांनी लांबणीवर पडली आहे. ती होण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक झाली. त्यात भाजपने जागा राखली. महापालिकेच्या आगामी निवडणुकीवर परिणाम करणारा हा निकाल आहे. त्यातही भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाल्यास भाजपला सत्ता राखणे थोडे जिकरीचे जाईल. पण, आघाडीतील घटक पक्षांचे जागा वाटप व इच्छुकांची संख्या वाढल्यास ‘बिघाडी’ होऊ शकते, त्याचा फायदा भाजपला होईल आणि महापालिका पुन्हा त्यांच्याकडेच राहील, असे आजचे चित्र आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत २००२ ते २०१७ अशी सलग १५ वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता होती. पण, २०१७ च्या निवडणुकीत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप व विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने महापालिका ताब्यात घेतली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दोघांनी अनुक्रमे चिंचवड व भोसरी मतदारसंघात विजय मिळवून पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले. आता जगताप यांच्या निधनामुळे चिंचवडची पोटनिवडणूक झाली. त्यात जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप भाजपच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत. मतदारसंघातील सर्व ५१० केंद्रांच्या मतदानाचा विचार केल्यास, सर्वच ठिकाणी भाजपला अधिक मते मिळाली आहेत. पण, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नाना काटे व घटक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बंडखोर अपक्ष राहुल कलाटे यांना मिळालेल्या मतांची बेरीज पाहता, भाजपने महापालिकेच्या दृष्टीने चिंतन करण्याची गरज आहे.

बदललेली समीकरणे
- २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजप, आरपीआय युती होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व अन्य पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. त्यात राष्ट्रवादीला ३६, शिवसेना नऊ व मनसेला एक जागा मिळाली होती. कॉंग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती.
- शिवसेनेत फूट पडून उद्धव ठाकरे विरुद्ध बंड करत एकनाथ शिंदे भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री झाले आहेत. चिंचवड मतदारसंघातील थेरगावला राहणारे खासदार श्रीरंग बारणे यांनी शिंदे यांना पसंती दिली. त्यामुळे एकेकाळी जगताप यांचे राजकीय विरोधक असलेले बारणे आता भाजपसोबत आहेत.
- शिवसेनेचे नगरसेवक राहुल कलाटे यांनी २०१९ च्या नियमित व २०२३ च्या चिंचवड पोटनिवडणुकीत बंडखोरी केली. त्यामुळे त्यांच्यावर ठाकरे कारवाई करतील का? कारवाई झाल्यास कलाटे यांची भूमिका काय? हे पहाणे उत्सुकतेचे ठरेल. कलाटे यांचे तीन नगरसेवक समर्थक होते.
- भाजपच्या पाच माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आणखी काही पक्ष सोडण्याच्या तयारीत होते. मात्र, आता विधानसभेत विजय झाल्याने ते पक्ष सोडणार नाहीत, अशी स्थिती आहे. शिवाय, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकानेही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
- महापालिकेच्या कार्यक्षेत्राबाबत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप व विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्यात विभागणी होती. चिंचवड मतदारसंघाबाबतचे निर्णय जगताप व भोसरीबाबतचे निर्णय लांडगे घ्यायचे. मधला पिंपरी मतदारसंघ त्यांच्या दृष्टिने नगण्यच होता. भाजपचे नेतृत्वही येथे कमी दिसते.
- दिवंगत आमदार जगताप रुग्णालयात असतानाच चिंचवड विधानसभा प्रमुखपद त्यांचे बंधू शंकर जगताप यांच्याकडे दिले. तेव्हापासून प्रत्येक कार्यक्रमात ते लांडगे व बारणे यांच्यासोबत असतात. लांडगे, खासदार बारणे व जगताप असे त्रिकूट प्रत्येक ठिकाणी दिसत आहे.
- महाविकास आघाडी एकत्रित लढल्यास त्यांच्यातील जागा वाटप कसे होणार? राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना ठाकरे गट यांसह अन्य घटक पक्षांतील इच्छुकांची संख्याही अधिक असेल. भाजपमधून आलेल्यांना प्राधान्य द्यायचे का? यांसह संभाव्य बंडखोरी रोखण्याचे आव्हान महाविकास आघाडीपुढे असेल.
- शिवसेना (शिंदे गट) यांच्यासह आरपीआय व मित्रपक्षांच्या जागा
वाटपाचे आव्हान भाजप पुढेही असेल. मात्र, महाविकास आघाडीच्या तुलनेत हे आव्हान सौम्य असेल, अशी सध्याची स्थिती आहे. तसेच, मनसे भाजपसोबत जाणार की स्वतंत्र लढणार? हा मुद्दाही महत्त्वाचा ठरेल.
- चिंचवड मतदारसंघात महापालिकेचे प्रभाग १७ वाल्हेकरवाडी, १८ चिंचवडगाव, २२ काळेवाडी, २३ थेरगाव गावठाण, २४ थेरगाव संतोषनगर, २५ वाकड- पुनावळे, २६ पिंपळे निलख, २७ रहाटणी, २८ पिंपळे सौदागर, २९ सुदर्शननगर, ३१ पिंपळे गुरव गावठाण नवी सांगवी व ३२ जुनी सांगवी अशा १२ प्रभागांचा व ४८ नगरसेवकांचा समावेश होतो.
- चिंचवड मतदारसंघात ३५ नगरसेवक स्थानिक व १३ जण बाहेरील होते. त्यातील एका स्थानिक नगरसेविकेचे निधन झाले आहे. भाजपच्या एक नगरसेविका व एक नगरसेवक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. भाजपचे ३३, राष्ट्रवादीचे ७, शिवसेनेचे ४, अपक्ष ४ नगरसेवक होते.
- स्थानिक नगरसेवकांचा प्रभाव असला तरी बाहेरचे नगरसेवक भाजपसह शिवसेना व राष्ट्रवादीचेही होते. शिवाय, जुनी व नवी सांगवी, काळेवाडी, थेरगाव, रहाटणी या भागात बाहेरील विशेषतः खानदेशी मतदार अधिक आहेत. मात्र, तो सर्व पक्षीय विचारसरणीचा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या भेटीचा परिणाम काळेवाडी, रहाटणी भागात झाला असावा, असे राष्ट्रवादीला झालेल्या अधिकच्या मतदानावरून दिसते.
--