शांतता आणि स्मृतींना अभिवादन चिंचवड पोटनिवडणूक निकाल ः भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून विजयाचे स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शांतता आणि स्मृतींना अभिवादन
चिंचवड पोटनिवडणूक निकाल ः भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून विजयाचे स्वागत
शांतता आणि स्मृतींना अभिवादन चिंचवड पोटनिवडणूक निकाल ः भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून विजयाचे स्वागत

शांतता आणि स्मृतींना अभिवादन चिंचवड पोटनिवडणूक निकाल ः भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून विजयाचे स्वागत

sakal_logo
By

पिंपरी, ता. २ ः चिंचवड पोटनिवडणुकीतील मतमोजणीत पहिल्या फेरीपासून शेवटपर्यंत भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर राहिल्या. पाठोपाठ राष्ट्रवादीचे नाना काटे यांच्या पारड्यात मते पडत होती. पण, जगताप यांचे मताधिक्य पार करून, आघाडी घेण्याइतकी मते नव्हती. असे असूनही भाजपने सकाळपासून दुपारी तीनपर्यंत ‘थांबा आणि वाट पहा’ची भूमिका घेतली. २८-२९ वी फेरी अर्थात विशालनगर- पिंपळे निलख, पिंपळे गुरव- सुदर्शननगरची मतमोजणी होऊन, २० हजारांपेक्षा अधिक मतांची आघाडी घेतल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांची संख्या वाढू लागली. स्वतः उमेदवार जगताप दुपारी चारच्या सुमारास आल्या. तेव्हा सर्वांनी त्यांना गराडा घातला. सायंकाळी दिवंगत आमदार जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील स्मृतिस्थळावर जमून, सर्वांनी अभिवादन करत विजय त्यांना समर्पित केला.
थेरगाव येथील शंकरअण्णा गावडे कामगार भवनात आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. त्यापूर्वी पहाटे पाचपासूनच भवनासमोरील रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद ठेवला होता. काळेवाडी फाटा ते चिखली बीआरटी मार्गावरील तापकीर चौकालगत डांगे चौक रस्त्यावर भवन आहे. त्यामुळे तापकीर चौकात व डांगे चौकाकडील बाजूस यशवंतराव चव्हाण विद्यालयासमोर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद केला होता. दोन्ही बाजूसह चौकातील चारही रस्त्यांच्या कोपऱ्यांवर पोलिस बंदोबस्त होता. काळेवाडी फाटा रस्त्याने येणाऱ्यांना यू-टर्न घेण्यास व काळेवाडी तापकीरनगर भागातून पिंपरीकडे जाण्यासाठी सेवा रस्त्याने वळण्यास बंदी होती. केवळ बीआरटी व सेवा रस्ता रहदारीसाठी खुला होता. चौकालगतच भाजपचे संपर्क कार्यालय आहे. तिथे काही कार्यकर्ते बसून होते. मात्र, दहा हजारांची आघाडी असूनही, त्यांच्यात जल्लोष दिसत नव्हता. ‘भाऊंना जाऊन (आमदार लक्ष्मण जगताप) अवघे काही दिवसच झालेले असल्यामुळे जल्लोष करायचा नाही. गुलाल किंवा भंडारा उधळायचा नाही, असे ठरवले आहे,’ असे एका कार्यकर्त्याने सांगितले. मतांची आघाडी असली तरी ‘थांबा व वाट पहा’ अशीच स्थिती होती. राष्ट्रवादी व अपक्षांचे कोणीही कार्यकर्ते परिसरात दिसले नाहीत.

निकालापूर्वीच फ्लेक्स
निवडणूक निकाल जाहीर होण्यापूर्वीच मतदारसंघासह शहरात काही ठिकाणी ‘ताईसाहेब आमदार’, ‘वहिनीसाहेब आमदार’ अशा आशयाचे फलक लागले होते. मतमोजणी सुरू असताना तापकीर चौकातील फलक कापडाने झाकण्यात आले. अधिकृत घोषणा न झाल्यामुळे झाकत असल्याने कार्यकर्त्यांनी सांगितले. मात्र, मतांची आघाडी तीस हजारांवर गेल्यानंतर विजय स्पष्ट दिसत असल्याने फलकांवरील कापड हटविण्यात आले. आणखी नवीन फलक मतदारसंघात लागले.

महिलांची उपस्थिती
दुपारी दोनपासून जगताप यांची मतांची आघाडी वाढू लागली. महिला कार्यकर्त्या मतमोजणी केंद्राकडे येऊ लागल्या. त्यांना पोलिसांनी थांबवले. त्यामुळे त्या पक्षाच्या तापकीर चौकातील संपर्क कार्यालयात आल्या. हळू हळू संख्या वाढू लागली. दुपारी चारच्या सुमारास अश्विनी जगताप या चौकात आल्या. त्यांना महिलांनी गराडा घातला. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, ‘‘हा विजय मी मतदारांना व साहेबांना (दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप) समर्पित करते.’’

कामगारांची टोळी
बीआरटी रस्त्याने दुपारी एकच्या सुमारास ३०-४० जण चालत आले आणि बॅरिकेटस् ओलांडून मतमोजणी केंद्राकडे जाऊ लागले. त्यांना पोलिसांनी थांबवले. त्यांच्या गळ्यात निवडणूक आयोगाचे ओळखपत्र होते. पण, पेहराव कामगारांचा होता. अधिक चौकशीअंती ते म्हणाले, ‘आम्ही कामगार आहोत. मतदान यंत्र ठेवण्याच्या पेट्या उचलून ठेवण्याचे काम करतो,’ त्यानंतर त्यांना आत सोडले.

माध्यमांवरील संदेश
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे निवडणूक झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीतील विजयाबाबत आनंदोत्सव साजरा करणार नाही. आम्ही जगताप यांच्या स्मृतीस्थळी भेट देणार असून, त्यांना

अभिवादन करणार आहोत, असे भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी सांगितले आणि भाजपचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी सायंकाळी पिंपळे गुरव येथील भाऊंच्या स्मृतिस्थळावर एकत्रित येण्याचा निरोप समाज माध्यमावर फिरला.
---
फोटो ः 28195, 28196