चिंचवडमध्ये भाजपने गड राखला महायुतीच्या उमेदवार अश्र्विनी जगताप यांचा ३६ हजार मतांनी विजयी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिंचवडमध्ये भाजपने गड राखला
महायुतीच्या उमेदवार अश्र्विनी जगताप यांचा ३६ हजार मतांनी विजयी
चिंचवडमध्ये भाजपने गड राखला महायुतीच्या उमेदवार अश्र्विनी जगताप यांचा ३६ हजार मतांनी विजयी

चिंचवडमध्ये भाजपने गड राखला महायुतीच्या उमेदवार अश्र्विनी जगताप यांचा ३६ हजार मतांनी विजयी

sakal_logo
By

पिंपरी, ता. २ : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत तिरंगी लढतीत भाजप व मित्र पक्ष महायुतीच्या उमेदवार अश्‍विनी जगताप यांचा सुमारे ३६ हजार १६८ मताधिक्याने विजय झाला. चिंचवडचा गड पुन्हा राखण्यात भाजप महायुतीला यश मिळाले आहे.
जगताप यांना १ लाख ३५ हजार ६०३ मते मिळाली तर महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांना ९९ हजार ४३५ मते मिळाली. तर; वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ४४ हजार ११२ मते मिळाली. या पोटनिवडणुकीत एकूण २८ उमेदवार रिंगणात होते. परंतु; प्रमुख लढत जगताप, काटे व कलाटे यांच्यातच होती.
मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत व पोस्टल मतांपासूनच जगताप यांनी मतांमध्ये आघाडी घेतली होती. काही अपवाद वगळता ती शेवटपर्यंत कायम राहिली. पोस्टल मतदानामध्ये ३४७ मतदानापैकी ४५ मते अवैध ठरली. तर; ३०२ मतांपैकी जगताप यांना १६९, काटे यांना ९२ व कलाटे यांना ३० मते मिळाली. पहिल्या फेरीतच जगताप यांनी ४४९ मतांची आघाडी घेतली.
दुसऱ्या फेरी दरम्यान एका ईव्हीएम मशिनमध्ये तारीख चुकीची असल्याची शंका कलाटे यांच्या निवडणूक प्रतिनिधींनी घेतली. त्यावेळी काही प्रमाणात गोंधळ झाला. परंतु; निवडणूक अधिकाऱ्यांनी शंका दूर केल्यानंतर मोजणी पुन्हा सुरळीत सुरु झाली. मामुर्डी, किवळे, रावेत, विकासनगर या भागात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनाही २०१९ च्या निवडणुकीत मताधिक्य मिळाले नव्हते. परंतु; अश्‍विनी जगताप यांनी या भागातही मताधिक्य घेतले.
भोईरनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, चिंचवड या भागातही जगताप यांना नवव्या फेरीअखेरपर्यंत ३२ हजार २८८ मते मिळाली. तर; काटे यांना २५ हजार ९२२ व कलाटे यांना १० हजार ७०५ मते मिळाली. कलाटे यांच्या पुनावळे भागात त्यांना चांगले मताधिक्य मिळाले. त्यानंतर दहाव्या फेरीत काकडेपार्क परिसरात १०६० व अकराव्या फेरीत केशवनगर परिसरात १ हजार १०८ मताधिक्य जगताप यांना मिळाले.
काळेवाडी-विजयनगर भागातील बाराव्या फेरीत काटे यांनी जगताप यांच्यापेक्षा ३८२ मताधिक्य घेतले. त्यानंतर काळेवाडीतील १३, १४ व १५ व्या फेरीत १२७ मताधिक्य जगताप यांना मिळाले. थेरगाव गावठाण भागात १५ व्या फेरीत ७८६ मताधिक्य जगताप यांना मिळाले. त्यानंतर १६ व्या फेरीत थेरगावभागात १ हजार ४६३ मताधिक्य जगताप यांना मिळाले. काळेवाडी-ज्योतिबा भागातील १७ व्या फेरीत जगताप यांना काटे यांच्यापेक्षा २३ मते जादा मिळाली. तर १८ व्या फेरीत थेरगाव- किर्तीनगर भागात जगताप यांना काटेंपेक्षा ५०१ व १९ व्या फेरीत थेरगाव-संतोषनगर भागात ४७६ मताधिक्य मिळाले.

रहाटणीत काटेंना मताधिक्य
रहाटणी भागातील विसाव्या फेरीत काटे यांना जगताप यांच्यापेक्षा १ हजार ४६७ मताधिक्य मिळाले. तर; रहाटणी-श्रीनगर भागात २१ व्या फेरीत कलाटे यांनी जगताप यांच्यापेक्षा ५३० मताधिक्य घेतले. पिंपळे सौदागर-वाकड या भागातील २२ व्या फेरीत काटे यांना जगताप यांच्यापेक्षा ४९१ मताधिक्य मिळाले. पिंपळे सौदागर भागात २३ व्या फेरीत काटे यांना जगताप यांच्यापेक्षा ८०२ मताधिक्य मिळाले.

पिंपळे गुरवमध्ये जगतापांना मताधिक्य

पिंपळे सौदागर-पिंपळे निलख भागात २४ व्या फेरीत जगताप यांनी ९७९ मताधिक्य घेतले. तर; जगताप यांचे निवासस्थान असलेल्या पिंपळे गुरव-सुदर्शननगर भागात २५ व्या फेरीत ३ हजार ३४६ मताधिक्य घेतले तर पिंपळे गुरव गावठाण, पिंपळे गुरव-नवी सांगवी येथील २६ व्या फेरीत ४ हजार २९५ व ३१ व्या फेरीत १ हजार ९६० मताधिक्य मिळाले. वाकडच्या २८ व्या फेरीतही जगताप
यांनी कलाटेंपेक्षा १ हजार १०४ मताधिक्य मिळाले. दरम्यान; नवी सांगवी, पिंपळे निलख, जुनी सांगवी शितोळेनगर या ३२ ते शेवटच्या ३७ व्या फेरीपर्यंत जगताप यांना मताधिक्य मिळाले.
दरम्यान, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यासह एकूण २६ जणांचे डिपॉझिट जप्त झाले.

---------------
चिंचवड मतदारसंघातील ठळक घडामोडी
----------
- तिरंगी लढतीमुळे कमालीची चुरस
- बहुतांश फेऱ्यांत जगताप यांचीच आघाडी कायम
- एका ईव्हीएम मशिनमध्ये चुकीची तारीख आल्याने काही काळ गोंधळ
- मामुर्डी, किवळे, रावेत, विकासनगर भागात जगताप यांना अनपेक्षित मताधिक्य
- खासदार बारणे यांच्या थेरगाव भागात जगताप यांनाच मताधिक्य
- रहाटणी-पिंपळे सौदागरमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांना मताधिक्य
- अपक्ष राहुल कलाटे यांच्यासह २६ जणांचे डिपॉझिट जप्त