
गावकी-भावकी, नाते-गोते, मैत्री अन् निष्ठा चिंचवड पोटनिवडणुकीत प्रत्यय, अनेक मोठमोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
पिंपरी, ता. ३ ः उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहरात विधानसभेचे तीन मतदारसंघ आहेत. त्यातील चिंचवड मतदारसंघात पोटनिवडणूक झाली आणि स्थानिकसह राष्ट्रीय स्थरावरचे राजकारण ढवळून निघाले. गावकी-भावकीपासून नात्या-गोत्यांभोवती निवडणूक फिरली. अपापसातील मतभेदांपासून राजकीय वैचारिक विरोधापर्यंत आणि गावकीच्या बंधनापासून मैत्रीच्या धाग्यापर्यंतची कसोटी बघायला मिळाली. प्रसंगी राजकीय नेते व पक्षांप्रतीची निष्ठा आणि नेत्यांच्या सक्रिय सहभागाने प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्याचे प्रत्त्युत्तर निकालानंतर सर्वांनाच मिळाले.
पिंपरी-चिंचवड शहराची निर्मितीच अनेक गावांच्या एकत्रिकरणातून झाली आहे. त्यामुळे प्रत्येक गावात आजही गावठाण, वाड्या, वस्त्या, वसाहती अशी रचना आहे. त्यात नियोजनबद्धपणे उभारलेल्या प्राधिकरणासारख्या नगररचना व विविध गृहप्रकल्पांची भर पडली आहे. कामधंदा, नोकरी, व्यवसायानिमित्त अनेक जण बाहेरून येऊन इथेच स्थायिक झाला आहे. सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रासह राजकीय क्षेत्रातही काही जण सक्रिय झाले आहेत. त्यामुळे शहराच्या राजकारणात स्थानिक व बाहेरचा असा फरक नेहमीच बघायला मिळतो. मात्र, बाहेरून आलेला व्यक्तीही आता स्वतःला स्थानिक संबोधू लागला आहे. कारण अनेकजण तीन-तीन पिढ्या इथे स्थायिक झाले आहेत. त्यामुळे कधी गावकी-भावकी तर कधी नाते-गोत्याची चर्चा होते. तर कधी मैत्री, निष्ठा, प्रतिष्ठा पणाला लागते. याचाच प्रत्यय चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतही आला.
गावकी...!
पोटनिवडणुकीतील तीनही प्रमुख उमेदवार स्थानिक होते. पिंपळे गुरवच्या अश्विनी जगताप, पिंपळे सौदागरचे विठ्ठल ऊर्फ नाना काटे आणि वाकडचे राहुल कलाटे अशी त्यांची ओळख. त्यामुळे यापूर्वी झालेल्या निवडणुकांप्रमाणेच याही वेळी तीनही ठिकाणच्या नागरिकांनी आपापल्या गावातील उमेदवाराच्या पारड्यात मतदान केल्याचे आकडेवारीवरून दिसते. प्रचाराच्या दरम्यानही एक-दोन अपवाद वगळता गावकीची एकी दिसून आली.
भावकी... !
भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप होत्या. माजी नगरसेवक राजेंद्र जगताप राष्ट्रवादीत आहेत. नवनाथ जगताप अपक्ष नगरसेवक होते. आमदार जगताप यांच्याशी त्यांचे राजकीय मतभेद सर्वश्रुत आहेत. नाना काटे राष्ट्रवादीत आणि शत्रुघ्न काटे भाजपमध्ये आहेत. राहुल कलाटे शिवसेनेत (उद्धव ठाकरे गट) आणि त्यांचे चुलत बंधू मयूर कलाटे राष्ट्रवादीत आहेत. काटे व कलाटे माजी नगरसेवकही आहेत. पण, एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत.
नाते-गोते
जगताप यांच्या कट्टर समर्थक माजी महापौर उषा ढोरे आणि राहुल कलाटे सोयरे आहेत. कलाटे हे ढोरे यांचे नात्याने जावई लागतात. महापालिका सभागृहातसुद्धा ढोरे त्यांचा उल्लेख ‘जावई’ असाच करायच्या. शिवाय, कलाटे, काटे, जगताप हे एकमेकांचे नातेवाईकही आहेत. त्यांचे समर्थक नवले, साठे, कस्पटे, नखाते, नढे, बारणे, भोंडवे, पवार, कुटे वेगवेगळ्या राजकीय पक्षात असले तरी, एकमेकांचे नातेवाईक व सोयरेही आहेत.
मैत्री...!
राहुल कलाटे व नवनाथ जगताप यांची मैत्री सर्वांना माहिती आहे. राजकीय व्यूव्हरचना असेल वा विकास कामांबाबतचा पाठपुरावा, दोघेही एकमेकांचा सल्ला घेत असल्याचे दिसते. शिवाय, जगताप व कलाटे, जगताप व काटे, काटे व कलाटे, जगताप व नखाते, शितोळे व काटे, जगताप व बारणे, जगताप व कस्पटे या कुटुंबातील काही राजकीय पदाधिकाऱ्यांची मैत्री व त्यांच्यातील राजकीय वैचारिक मतभेद वेळोवेळी दिसून आले आहेत.
निष्ठा...!
काही अपवाद वगळता जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या महापालिका निवडणुकीत नगरसेवक झालेले भाजपसोबत आहेत.
शिवसेनेचे (ठाकरे गट) राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली तरी पक्षावर निष्ठा असलेले पदाधिकारी व बहुतांश कार्यकर्ते महाविकास आघाडीसोबत होते. कलाटे समर्थक कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते. जगताप यांच्यासोबतचे राजकीय मतभेद विसरून शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार श्रीरंग बारणे प्रचारात होते. राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही पक्षनिष्ठा दाखवली आहे.
प्रतिष्ठा... !
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, नेते अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नेते चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, नेत्या पंकजा मुंडे; वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे निवडणूक प्रतिष्ठेची झाली. पिंपरी-चिंचवड हे एकेकाळचा पवार यांचा बालेकिल्ला. तो त्यांना पुन्हा ताब्यात घ्यायचा आहे. तर, विद्यमान आमदार तथा शहराध्यक्ष महेश लांडगे यांना महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी चिंचवडमध्ये विजय हवा होता. तो मिळाला आहे.
--