
महापालिकेकडून आता एजंटची नेमणूक महात्मा फुले जनआरोग्य योजना ः लवकरच निविदा प्रसिद्ध होणार
पिंपरी, ता. ५ : महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात दीड वर्षात १ हजार ११२ कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. तर, २०२० व २०२१ या कालावधीत या योजनेच्या माध्यमातून सुमारे ४४४२ जणांना आर्थिक दिलासा मिळाला होता. या योजनेचे सर्व कामकाज कोरोना काळापासून वायसीएम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पार पडले होते. आता मात्र, या योजनेच्या कागदपत्रांच्या कामकाजासाठी महापालिकेकडून एजंटची नेमणूक केली जाणार असून, लवकरच निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे.
राज्यातील सर्वच नागरिकांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना खुली करण्याचा निर्णय २३ मे २०२० रोजी आरोग्य खात्याने घेतला होता. त्यामुळे, महामारीच्या संकटामध्ये सर्वच नागरिकांना आरोग्यविषयक हमी व आर्थिक दिलासा मिळाला. कोरोना काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ गरजूंनी घेतला. त्याचे कामकाज रुग्णालयातील परिचारिका, डॉक्टर, मानधनावरील कर्मचाऱ्यांनी पाहिले. आता, मात्र याचे कामकाज हे तिसऱ्या व्यक्तीकडे सोपविले जाणार आहे. या योजनेच्या लाभासाठी त्या व्यक्तीकडे रेशनकार्ड गरजेचे आहे. ओळखपत्र, वयाचा पुरावा व इतर कागदपत्रे अपलोड करून, रुग्णाची नोंदणी प्रक्रिया केली जाते. हे कामकाज रुग्णांवर न सोपवता शासकीय रुग्णालयातील आरोग्य मित्रच पार पाडतात. त्याशिवाय, इतर प्रक्रिया रुग्णालयीन स्तरावर होते. या कामकाजासाठी शासन रुग्णालयांना ठराविक शुल्क देत आहे.
---
ओळखपत्र म्हणून कोणता पुरावा
महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत देण्यात आलेले आरोग्य ओळखपत्र, असंघटित कामगार ओळखपत्र किंवा ही ओळखपत्र उपलब्ध नसल्यास शिधापत्रिका व छायाचित्रासह असणारे ओळखपत्र यामध्ये आधार कार्ड, मतदार कार्ड, वाहन चालक परवाना, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबाची पांढरी शिधापत्रिका आणि ७/१२ उतारा आवश्यक असतो. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनानं निर्धारित केलेली ओळखपत्र यासाठी ग्राह्य धरली जातात.
--
यासाठी आरोग्य मित्राची नेमणूक
महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत हा लाभ घेण्यासाठी रुग्णालयात असणाऱ्या आरोग्य मित्रांची मदत घेता येते. योजनेमध्ये अंगीकृत असणाऱ्या रुग्णालयात आरोग्य मित्र उपलब्ध आहेत. आरोग्यमित्र रुग्णाची योजनेंतर्गत ऑनलाइन नोंदणी करतात तसेच रुग्णालयात उपचार घेताना योग्य ते सहाय्य व मदत करतात. रुग्णांची नोंदणी आरोग्य मित्रामार्फत केली जाते. रुग्ण नोंदणीच्या वेळी रुग्णाच्या नावाची पडताळणी त्याचे ओळखपत्र पाहून केली जाते. ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरल्या जाणाऱ्या कागदपत्रांची यादी www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळावर पाहायला मिळते.
--
सर्वसाधारण शस्त्रक्रिया
कान, नाक, घसा, कर्करोग, रेडीओथेरपी, त्वचा प्रत्यारोपण, जळीत, पॉलिट्रामा, प्रोस्थेसिस, जोखीम देखभाल, नेत्ररोग, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र, अस्थिरोग, पोट व जठार, कार्डिओव्हॅस्क्युलर थोरॅसिक, बालरोग, प्रजनन व मूत्र रोग, मज्जातंतू विकृती, जनरल मेडिसिन, बालरोग वैद्यकीय, हृदयरोग, नेफ्रोलोजी,
न्युरोलोजी, पल्मोनोलोजी, चर्मरोग, रोमेटोलोजी, इंडोक्रायनोलोजी, मेडिकल गेस्ट्रोइंट्रोलोजी, इंटरवेन्शनल रेडीओलोजी अशा १०३४ प्रकारांच्या सर्जरी केल्या जातात.
‘‘महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी एजंटची नियुक्ती केली जाणार आहे. या योजनेत मोठ्या प्रमाणात कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. पूर्ण योजनेचे काम बाहेर दिलेले नाही. त्याची टेंडर प्रक्रिया सुरु आहे. शासन आपल्याला पैसे देत आहे. त्यामुळे, इतरांना ते देवू शकत नाही.
- जितेंद्र वाघ, अतिरिक्त आयुक्त, महापालिका