
कॉपी प्रकरणी शिक्षकांवर कारवाई नको
सोमाटणे,ता. ७ ः कॉपी प्रकरणी विद्यार्थ्यांबरोबर पर्यवेक्षण करणाऱ्या शिक्षकावर कारवाई केल्यास परीक्षेवर बहिष्कार घालण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाच्या वतीने भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकामार्फत सध्या विद्यार्थी तपासणी केली जात आहे. एखाद्या विद्यार्थ्यांकडे चुकून कॉपी आढळल्यास विद्यार्थ्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. परंतु, आरोपी असलेल्या विद्यार्थ्यांबरोबर पर्यवेक्षण करणाऱ्या शिक्षकावरही संबंधित विभागाच्या वतीने कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. हा प्रकार चुकीचा असून या प्रकारामुळे पर्यवेक्षण करणाऱ्या शिक्षकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पर्यवेक्षण करणाऱ्या शिक्षकावरील कारवाई न थांबवल्यास परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार घालणार असा इशारा शिक्षक संघटांच्यावतीने लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. संबंधित विभागाला दिलेल्या निवेदनावर महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे जिल्हा विश्वस्त के.एस.ढोमसे, कार्याध्यक्ष जी.के.थोरात, जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले, मुरलीधर मांजरे, स्वाती उपर, पंकज घोलप, राजेंद्र पडवळ, माधुरी काळभोर, आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.