
महिलादिन विशेष कार्यक्रम
वुमन सेल पुणे रिजन कोरीगडची यशस्वी मोहीम
पिंपरी ः दि ऑल इंडिया फिजिओथेरपिस्ट वूमन सेल पुणे रिजन आणि जी ट्राईब एक्सपेरियन्सस यांच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त कोरीगड, मोहीम यशस्वीपणे पार पडली. या मोहिमेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक महिलांचा सहभाग होता. जी ट्राईब एक्सपेरियन्ससच्या संस्थापिका गिर्यारोहक स्नेहल घेरडे यांनी सुरक्षिततेचे महत्त्व लक्षात घेऊन या मोहिमेचे नियोजन केले. लहान मुलांनी, पालकांनी सुरक्षितपणे निसर्गात भटकंती कशी करायची आणि गड किल्ल्यावर नेमकी काय काळजी घ्यायची या बद्दल देखील मार्गदर्शन केले. यामध्ये दि ऑल इंडिया फिजिओथेरपिस्ट वूमन सेलच्या डॉक्टर संजीवनी कांबळे, डॉ. अमिता अग्रवाल, डॉ. फरीन पटेल यांनी मोलाचे सहकार्य केले. सहभागींना ट्रॉफी आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
महिला महाविद्यालयात महिला सक्षमीकरण सप्ताह
पिंपरी ः डॉ. डी. वाय. पाटील कला वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय, पिंपरी आणि रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रायला’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या महाविद्यालयात महिला सक्षमीकरण आठवडा साजरा करण्यात आला. दिवाकरन पिल्लाई यांनी व्यक्तिमत्त्व विकास, संतोष गिरांजे यांनी मानसिक जडत्व आणि डॉ. दीपक शिकारपूर यांनी ‘करिअर २०२३’ या विषयावर मार्गदर्शन केले. विन्सेंट (अध्यक्ष, रोटरी क्लब पिंपरी टाऊन), सुशील अरोरा (विश्वस्त, रोटरी क्लब पिंपरी टाऊन) यांनी कार्यक्रम घेतला. प्रा. अलकनंदा माताडे यांनी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम केले. प्राचार्य डॉ. सुरेश धरणे यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास प्रा. मेघना खरात, प्रा. श्रीपाद मेढे, प्रा. सचिन जाधव, प्रा. ज्योती विश्वकर्मा, प्रा. रूपाली खरात, प्रा. समद जमादार आदी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
अभ्युदय समूहातर्फे महिलादिनानित्त विविध कार्यक्रम
पिंपरी ः समाजकार्याचा ध्यास घेतलेल्या ‘अभ्युदय समूह’ या संस्थेअंतर्गत ‘जागतिक महिला दिन’ ओमशांती बालिका श्रम येथे अगदी आगळ्यावेगळ्या रंजक पद्धतीने साजरा करण्यात आला. मुलींच्या कलागुणांना वाव देत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्पाईस अप इव्हेंट्स (Spice up events) च्या साहाय्याने मुलींना मदत पुरविण्यात आली. शी इन्स्पायर अस (SHE INSPIRE US) असे ब्रीदवाक्य घेऊन एक आगळावेगळा रॅम्पवॉक करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा डॉ. आरती राऊत, माई मुंडे, बाबासाहेब चव्हाण, आरती मनोचा, जितेंद्र ननावरे, संतोष राजपूत उपस्थित होते.