शहरात सध्या एकही सक्रिय रुग्ण नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरात सध्या एकही सक्रिय रुग्ण नाही
शहरात सध्या एकही सक्रिय रुग्ण नाही

शहरात सध्या एकही सक्रिय रुग्ण नाही

sakal_logo
By

पिंपरी, ता. ९ : कोरोना संसर्गाचा पहिला रुग्ण १० मार्च २०२० रोजी शहरात आढळला. या घटनेला गुरुवारी (ता. १०) तीन वर्षे पूर्ण होत आहेत. सध्या एकही सक्रिय रुग्ण नसून शहर कोरोनामुक्त झाले असल्याची स्थिती आहे. शिवाय, सर्व व्यवहार पूर्णतः पूर्वपदावर आले असून शहरातील नागरिकांसह प्रशासकीय यंत्रणेने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मात्र, कोरोनामुळे चार हजार ६३० व्यक्तींचा बळी गेला आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महापालिकेचे तब्बल ३५१ कोटी ८२ लाख ७५ हजार ९२० रुपये खर्च झाले आहेत. एका रुग्णामागे सरासरी नऊ हजार ४३४ रुपये खर्च आला आहे.
कोरोना संसर्ग झालेल्या नागरिकांवर उपचार करण्यासाठी महापालिकेने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह (वायसीएम) विविध आठ रुग्णालये सज्ज ठेवली होती. शिवाय, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मदतीने नेहरूनगर येथे व खासगी संस्थांच्या मदतीने ऑटो क्लस्टर व बालभवन येथे जम्बो रुग्णालय सुरू केले होते. चिखलीतील घरकूल, म्हाळुंगे (ता. खेड) येथे म्हाडाच्या इमारती आणि खासगी संस्था व रुग्णालयांच्या सहकार्याने कोविड केअर सेंटर सुरू केले होते. आठही रुग्णालयांमध्ये तपासणीसह ऑक्सिजन व अधिकच्या खाटांची व्यवस्था केली होती. त्यामुळे बहुतांश नागरिकांचे प्राण वाचले.

दृष्टिक्षेप...
- महापालिकेच्या वायसीएम, जिजामाता पिंपरी, नवीन थेरगाव, नवीन भोसरी, तालेरा चिंचवड, कुटे आकुर्डी, यमुनानगर या रुग्णालयांत ऑक्सिजन प्लॅन्ट उभारून आयसीयूची सुविधा
- सर्व रुग्णालये मिळून खाटांची संख्या दीड हजारांहून अधिक
- सर्व रुग्णालयांच्या क्षेत्रात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुविधा उपलब्ध
- सर्व रुग्णालयांत कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांवर मोफत उपचार
- आठही रुग्णालय क्षेत्रात कोरोना तपासणी सुविधा

कोरोना प्रतिबंधक खर्च
वर्ष /खर्च
२०२०-२१ / १४३,९३,२९,४७२
२०२१-२२ / १७४,९८,३०,६२५
२०२२-२३ / ३२,९१,१५,८२३
एकूण/ ३५१,८२,७५ ,९२०

आतापर्यंत कोरोना रुग्ण
एकूण / ३,७२,९२७
मृत्यू / ४,६३०
बरे झाले / ३,६८,२९७

कोट
कोरोना संशयित रुग्णांची तपासणी नियमितपणे सुरू आहे. सद्य:स्थितीत कोरोनाचे सक्रिय रुग्ण नाहीत. पण, महापालिकेच्या आठही रुग्णालयात उपचाराची व्यवस्था आहे. रुग्णालयांच्या आवारात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारले आहेत.
- डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका