कर्मचारी अद्यापही निवडणूक मूडमध्येच? महापालिकेतील अनेक कामे खोळंबली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्मचारी अद्यापही 
निवडणूक मूडमध्येच?
महापालिकेतील अनेक कामे खोळंबली
कर्मचारी अद्यापही निवडणूक मूडमध्येच? महापालिकेतील अनेक कामे खोळंबली

कर्मचारी अद्यापही निवडणूक मूडमध्येच? महापालिकेतील अनेक कामे खोळंबली

sakal_logo
By

पिंपरी, ता. ११ ः चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी महापालिकेचे २५० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. निवडणूक संपली, निकाल लागला. तरी, अद्याप अनेक अधिकारी व कर्मचारी रुजू न झाल्याने महापालिकेतील विविध विभागातील कामे खोळंबल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

पोटनिवडणुकीची घोषणा १८ जानेवारीला झाली. तेव्हापासून आचारसंहिता लागू झाली. ती दोन मार्चपर्यंत होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कर संकलन विभागाचे उपायुक्त सचिन ढोले यांची नियुक्ती झाली. तसेच, महापालिकेतील विविध विभागांचे २५० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवडणूक विभागासाठी नियुक्ती करण्यात आली.
आदेश झाल्यानंतर २४ जानेवारीपासून ते अधिकारी व कर्मचारी थेरगाव येथील निवडणूक विभागात तैनात आहेत. दोन मार्चला मतमोजणी झाल्याने निवडणूक प्रक्रिया संपली आहे. त्यानंतर सर्व अधिकारी व कर्मचारी पुन्हा महापालिकेतील आपापल्या विभागात रुजू होणे अपेक्षित होते. मात्र, निवडणूक संपून नऊ दिवस होऊनही अनेक अधिकारी व कर्मचारी पालिकेत रुजू झालेले नाहीत. त्यामुळे कामाचा खोळंबा होत आहे. अनेक विभागातील खुर्च्या रिकाम्या पडल्या आहेत. शुकशुकाट पहायला मिळत आहे.
निवडणूक कामकाजास गेल्यापासून सव्वा महिन्यांतील कामे तुंबून पडली आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. परिणामी, प्रकल्प व विकासकामांना विलंब होणार आहे.