
एच३एन२ संसर्गाने महापालिका प्रशासन अलर्ट
पिंपरी, ता. १६ ः ‘एच३एन२’ संसर्गाने एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याने महापालिका प्रशासन अलर्ट झाले आहे. प्रशासक शेखर सिंह यांनी आरोग्य वैद्यकीय विभागाची तातडीने बैठक घेऊन उपाययोजना करण्याची सूचना केली. दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी सिंह यांची भेट घेऊन तर, आमदार अश्विनी जगताप यांनी मोबाईलवर संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेऊन सूचना केल्या.
महापालिका प्रशासक शेखर सिंह यांनी सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे व वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या समवेत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. महापालिका प्रशासनाने राज्य सरकारच्या सूचनांनुसार उपचाराची व्यवस्था केली आहे. आठही रुग्णालये सज्ज ठेवली आहेत. प्रत्येक रुग्णालयात राखीव बेड आहेत. नागरिकांनी आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. काही लक्षणे दिसल्यास तत्काळ तपासणी करावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
आमदार लांडगे यांची सूचना
‘एच३एन२’ संसर्गाचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिका आरोग्य यंत्रणा सतर्क करा. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होता कामा नये, अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी महापालिका प्रशासक शेखर सिंह यांनी केली. विधिमंडळ अधिवेशनातून ते शहरात दाखल झाले व सिंह यांच्या समवेत बैठक घेतली. संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये १० बेड राखीव ठेवावेत. ऑक्सिजन बेडची व्यवस्था करावी. नागरिकांना सर्वोत्तम आरोग्य सुविधा द्याव्यात. रुग्णाचा मृत्यू कशामुळे झाला? याबाबत नागरिकांमध्ये जागृती करावी, अशा सूचना केल्या.
आमदार जगताप यांची सूचना
विधिमंडळ अधिवेशनासाठी मुंबईत असलेल्या आमदार अश्विनी जगताप यांनी महापालिका प्रशासक शेखर सिंह आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती घेतली. संसर्ग वाढू नये यासाठी अधिक दक्षता घेण्याची व सर्व रुग्णालयांमध्ये उपचाराची सक्षम सुविधा उभारण्याची सूचना केली. महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये उपचारासाठी व्यवस्था उभारण्यास सांगितले. तसेच, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरू नये, यासाठी कोणती काळजी घेण्यात यावी याबाबत जनजागृती करण्यासही सांगितले.