
तीन वर्षे बंद राहूनही पुन्हा सततच् दुरूस्ती
अशा साळवी
पिंपरी, ता.१७ ः नेहरूनगर येथील ‘अण्णासाहेब मगर जलतरण तलाव’ शहरातील सर्वांत जुना आणि आकाराने मोठा आहे. एका वेळेला २०० व्यक्ती पोहण्याची क्षमता आहे. मात्र, वारंवार देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली तो बंदच राहत असल्याने शहरातील नियमीत पोहायला जाणाऱ्यांवर नाराज होण्याची वेळ येतेय. प्रवेश शुल्कातून मिळणाऱ्या वार्षिक उत्पन्नाहून देखभाल, स्वच्छता, यांत्रिकरण याचा वार्षिक खर्च अधिक आहे. दहा दिवसांपूर्वी तलाव सुरू केल्याचा दावा क्रीडा विभागाने केला आहे. प्रत्यक्षात शुक्रवारी (ता. १७) तलाव बंद असल्याचे दिसून आले.
फेब्रुवारीपासून तापमान वाढलेले आहे. आता उन्हाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात पोहायला येणाऱ्यांची संख्या मोठी असते. महापालिकेच्या तलावावर एक तास पोहण्यासाठी दहा रुपये शुल्क आहे. तसेच वयोगटानुसार तिमाहीसाठी २०० रुपये, सहामाहीसाठी ३५०, तर वार्षिक ५०० रुपयांपर्यंतचे पास देण्यात येतात. त्यामुळे महापालिकेच्या तलावावर उन्हाळ्यात प्रचंड मोठी गर्दी असते. मात्र, चुकीच्या नियोजनामुळे उन्हाळा सुरू होऊनही तलाव अधूनमधून बंदच असतो. त्यामुळे खेळाडू, नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. नुकताच डागडुजी करून १० दिवसांपूर्वी तलाव सुरू केला आहे. पण आता ऑनलाइन आरक्षण दिले जात आहे. पासची सुविधाही ऑनलाइन केल्यामुळे तलावावर एकावेळी ८० जणांची बॅच करण्याचे नियोजन आहे. महापालिकेच्या https://www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावर जलतरण तलाव ऑनलाइन नोंदणीची ‘लिंक’ देण्यात आली आहे. पण त्यामुळे उत्पन्न कमी होणार असल्याचे काही नागरीकांनी सांगितले.
सलग तीन वर्ष बंदच
दरम्यान दोन वर्ष कोरोनामुळे तलाव बंदच होता. त्यानंतर यंदा फेब्रुवारी ते जुलै २०२२ अखेरपर्यंत शहरात पाणी टंचाई होती. पाणी उपलब्धतेचा स्त्रोत खंडीत झाल्यानंतर ७ ते ८ महिन्यांच्या कालावधीत पुन्हा बंद ठेवला होता. दरम्यान, प्रवेश शुल्कातून एक रुपयाही उत्पन्न मिळाले नाही. परंतु, जीवरक्षक, सुरक्षारक्षक, लिपिक, शिपाई, सफाई कामगार, अधिकारी यांची त्याच ठिकाणी नियुक्ती कायम ठेवल्याने त्यांना बसून मासिक वेतन देण्यात आले. तसेच सलग तीन वर्ष बंदच असल्याने फरशा उखडल्या होत्या. याच्या दुरूस्तीसाठी पुन्हा बंद ठेवला होता.
फोटो ३१०७९, ८०, ८१