नेत्र उपचाराच्या सुविधा एकाच ठिकाणी
पिंपरी, ता. १९ ः ‘‘नेत्र उपचारासाठी समर्पित रुग्णालयाची उभारणी करून महापालिकेने नागरिकांच्या सेवेसाठी आधुनिक तंत्रज्ञानासह अद्यावत सुपर स्पेशालिटी सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. अशा प्रकारच्या समर्पित रुग्णालयामुळे नागरिकांना नेत्र उपचाराच्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून, सर्व घटकातील नागरिकांना या सेवा निश्चितपणे उपयुक्त ठरतील,’’ असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण तथा तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
महापालिकेने उभारलेल्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण प्रसंगी पाटील बोलत होते. प्रशासक शेखर सिंह अध्यक्षस्थानी बोते. आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, विधानपरिषद सदस्या उमा खापरे, महापालिका अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, नेत्ररोग विभाग प्रमुख डॉ. रुपाली महेशगौरी आदी उपस्थित होते. पौर्णिमा भोर यांनी सूत्रसंचालन केले.
मासुळकर कॉलनीत नेत्र रुग्णालय
पिंपरी मासुळकर कॉलनीतील शंकरराव मासुळकर अर्बन हेल्थ सेंटर व आय हॉस्पिटलचे लोकार्पण झाले. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) नेत्ररोग विभाग येथे स्थलांतरित केला जाईल. रुग्णालयात ८० खाटा व चार शस्त्रक्रिया विभाग आहेत. त्यासाठी २५ कोटी ४६ लाख रुपये खर्च आला आहे. पदव्यूत्तर संस्था वायसीएमशी रुग्णालय संलग्न राहील. येथे नेत्ररोग विषयातील पदव्यूत्तर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्र असेल. सामान्य नेत्ररोग व काचबिंदूचे निदान व शस्त्रक्रिया, पापण्यांचे विकार, मधुमेही रुग्णांसाठी रेटिना तपासणी , डोळ्यातील दाब वाढ, लहान मुलांच्या डोळ्यांची काळजी व बालपणातील अंधत्व, दृष्टिहिनांना दृष्टी सहायकाबाबतच्या सुविधा, जागरूकता तपासणी व उपचार अशा सुपर स्पेशालिटी सेवा रुग्णालयात असतील.
कचरा स्थलांतर प्रकल्प
गवळीमाथा आणि कासारवाडी मैलाशुद्धीकरण प्रकल्प येथील कचरा स्थलांतर प्रकल्पाचे उद्घाटन झाले. यामुळे स्थानिक भागातील कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण, कॉम्पॅक्ट करून वाहनाद्वारे मोशी कचरा डेपो येथे नेण्यात येणार आहे. प्रत्येक कचरा स्थलांतर केंद्राची क्षमता २०० मेट्रिक टन आहे. ओला व सुका कचरा वाहतूक करण्यासाठी वाहनासह एक हूक लोडर व तीन कंटेनरची व्यवस्था आहे. या प्रकल्पांमुळे कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या कमी होऊन इंधन बचत, हवेचे प्रदूषण कमी होणे, कचऱ्याची गळती कमी होणे आदी फायदे होणार आहेत. कचरा स्थलांतर चार प्रकल्पांच्या स्थापत्य विषयक कामांसाठी १८ कोटी तीन लाख आणि यंत्र व विद्युत विषयक कामांसाठी १८ कोटी ६५ लाख रुपये निधी मंजूर आहे.