बिब्बा सापडला अंधश्रद्धेच्या विळख्यात

बिब्बा सापडला अंधश्रद्धेच्या विळख्यात
Published on

पिंपरी, ता. २४ : ‘सफेद भिलावा म्हणजेच बिब्बा जवळ ठेवा लक्ष्मीप्राप्ती होईल’, असे सांगणारा एक व्हिडिओ सध्या विविध सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बिब्बा समोर ठेवल्यास आगकाडी पेटते किंवा त्यामध्ये चुंबकीय प्रतिकर्षण कसे आहे हे व्हिडिओव्दारे सांगितले आहे. याची सत्यता ‘सकाळ’ने पडताळली केली असता पैसे कमविण्यासाठी केलेली फसवणूक असल्याचे उघड झाले. वनस्पती शास्त्र अभ्यासकांच्या मते, पश्चिम घाटातच नव्हे तर संपूर्ण भारतात किंवा जगात कोठेही असा पांढरा बिब्बा नाही.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असे दिसते, की या बिब्ब्याचे प्रतिबिंब आरशात दिसत नाही. काळा दोरा सुईव्दारे आरपार नेल्यास पांढरा होतो, समोर आगकाडी धरली असताना ती पेट घेते, बिब्बा पाण्यात ठेवून आगकाडी जवळ धरली तर‌ ती पेट घेते. तांब्याची तार आणि बिब्बा यामध्ये प्रतिकर्षण आहे. मात्र, बारकाईने पाहिले असता संगणकीय करामती करून व्हिडिओ केल्याचे समोर आले आहे. हा बिब्बा घेतल्यास अल्पकाळात भरपूर पैसे मिळतात, असे सांगत संपर्क क्रमांकही दिले आहेत. यावर चौकशी केली असता १० फळांची किंमत २५ हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत असल्याचे सांगण्यात आले.
--

अंधश्रद्धेला बळी पडलेल्या अनेक दुर्मिळ व इतर वनस्पतींचे जंगलामधून मोठ्या प्रमाणावर संकलन केले जात आहे. तसेच, काष्टाऔषधींच्या बाजारामध्ये मूळ औषधांमध्ये हुबेहूब सारख्या दिसणाऱ्या अनेक वनस्पतींची भेसळ करून विकल्या जात आहेत. त्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जात नाही.
- प्रा. किशोर सस्ते, वनस्पती आणि जैवविविधता अभ्यासक
--
सध्या निरनिराळ्या कारणांसाठी मोठ्या प्रमाणात वनस्पतींचा ऱ्हास होत आहे. वनस्पतींमध्ये काही चमत्कार घडतात व त्यामुळे आर्थिक वृद्धी होऊ शकेल हे सांगून किंवा चुकीचा औषधी गुणधर्म सांगून सामान्य माणसांमध्ये गैरसमज पसरवणे चुकीचे आहे. वैज्ञानिक आधारावर यामधील तथ्य जाणून घेऊन लोकांसमोर मांडणे आवश्यक आहे. नाहीतर, भविष्यात अनेक वनस्पती नामशेष होतील.
- डॉ. प्राची क्षिरसागर, वनस्पती अभ्यासक
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com