देहूगावमध्ये टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देहूगावमध्ये टोळक्याकडून 
तरुणाला बेदम मारहाण
देहूगावमध्ये टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण

देहूगावमध्ये टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण

sakal_logo
By

पिंपरी : रिक्षाला धक्का लागल्याच्या कारणावरून सहा जणांच्या टोळक्याने दुचाकीस्वार तरुणाला बेदम मारहाण केली. हा प्रकार देहूगाव येथे घडला. कृष्णा राजाराम शिंदे (रा. चव्हाणनगर, तळवडे गावठाण) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रीराम देशमुख (वय ३०), राम भोसले, रोहित वाघ, विष्णू वाघ, विजय सुर्वे, रिक्षाचालक श्रीराम याची पत्नी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे त्यांच्या काकाच्या घरून मामाच्या घरी भंडारा डोंगराकडे जात होते. दरम्यान, देहूतील भैरवनाथ चौक येथे फिर्यादीच्या दुचाकीचा श्रीराम याच्या रिक्षाला धक्का लागला. या कारणावरून त्याने फिर्यादीला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर इतर आरोपींनीही फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. श्रीराम याने बांबूने मारहाण केली असता फिर्यादीने तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्यांना अडवले. या मारहाणीत फिर्यादी यांना पोटात गंभीर दुखापत झाली.

महिलेशी गैरवर्तन करीत संपवून टाकण्याची धमकी
महिलेचा पाठलाग करून शरीरसुखाची मागणी केली. महिलेने त्यास नकार दिला असता शिवीगाळ करीत संपवून टाकण्याची धमकी देणाऱ्यावर भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप दत्तात्रेय मुळुक (वय ४४, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने मागील आठ महिन्यांपासून वेळोवेळी फिर्यादीचा पाठलाग केला. त्यांच्या दुकानाच्या ठिकाणी तसेच सोसायटीत जाऊन फिर्यादीकडे शरीरसुखाची मागणी केली. फिर्यादीने त्यास नकार दिला असता त्याने शिवीगाळ करून संपवून टाकण्याची धमकी दिली. वेळोवेळी फिर्यादीशी गैरवर्तन केले.

तरुणाची ऑनलाइन दीड लाखांची फसवणूक
बजाज फायनान्सच्या ऑफिसमधून बोलत असून व्हेरिफिकेशन कॉलचा बहाणा करीत एका लिंकवर क्लिक करण्यास भाग पाडून तरुणाची दीड लाखांची फसवणूक केली. ही घटना चिंचवड येथे घडली. हरीश शंकर मोळावडे (रा. रजनीगंधा सोसायटी, वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीने फिर्यादी यांना फोन करून तो बजाज फायनान्सच्या बोरिवली येथील ईसीएस ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगितले. व्हेरिफिकेशन कॉल असल्याचे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांना व्हिडिओ व्हेरिफिकेशन करण्याचा बहाणा करून त्यांना लिंक पाठवली. त्यावर फिर्यादी यांना क्लिक करण्यास भाग पाडून त्यांच्या खात्याचा ॲक्सेस घेतला. त्यानंतर फिर्यादी यांच्या खात्यातून पाच व्यवहारात एक लाख ४५ हजार रुपये वर्ग करून घेत फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली.

प्रवासादरम्यान दीड लाखांचे दागिने चोरीला
पीएमपी बसने प्रवास करीत असताना दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. ही घटना डांगे चौक येथे घडली. याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे त्यांच्या पतीसह त्यांच्या मूळगावी कर्नाटक येथे जात होते. निगडी ते स्टेशन या मार्गाच्या पीएमपी बसमध्ये डांगे चौक येथून बसल्या. त्यावेळी त्यांच्याकडील पर्समध्ये ठेवलेले एक लाख ४७ हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरट्याने लंपास केले.

ऑफिसचे शटर वाकवून ऐवज लंपास
बांधकाम साईटवरील ऑफिसचे शटर वाकवून आत शिरलेल्या चोरट्याने ऐवज लंपास केला. ही घटना डुडुळगाव येथे घडली. योगेश बबन तळेकर (रा. सावतामाळीनगर, डुडुळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. डुडुळगाव येथील अर्बनिया मंगलम या बांधकाम प्रकल्पाचे ऑफिस बंद असताना ऑफिसचे शटर वाकवून चोरटा आत शिरला. प्लंबिंग मटेरिअल व रोकड लंपास केली.