
शून्य कचरा ठेवा; १० टक्के वाचवा
पिंपरी, ता. १ ः कोणताही कार्यक्रम असेल, स्पर्धा असेल, चर्चासत्र, व्याख्याने, परिसंवाद, संमेलन, उद्घाटने, भूमिपूजने, सत्कार, स्नेहसंमेलन अथवा अन्य समारंभ करताना शून्य कचरा (झिरो वेस्ट) कार्यपद्धतीचा अवलंब करा आणि कार्यक्रमाच्या भाडेदरात दहा टक्के सवलत मिळवा, असे धोरण महापालिकेने आखले आहे. स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमांतर्गत असे विविध उपक्रम शहरात राबविले जात आहेत.
स्वच्छ सर्वेक्षणासाठी आवश्यक बाबींची पूर्तता केली जात आहे. शहरातील कचरा कमी करण्याच्या उद्देशाने विविध नवनवीन उपक्रम राबविण्यावर भर दिला आहे. कोणत्याही कार्यक्रमप्रसंगी शून्य कचरा कार्यपद्धतीचा अवलंब करण्यासाठी मानक कार्यप्रणालीवर भर दिला आहे. त्यासाठी ३१ मार्च २०२३ पर्यंत नागरिक, संघटना, संस्था, मंडळे, कंपनी व इतरांनी कोणत्याही कार्यक्रमासाठी महापालिकेचे सभागृह, प्रेक्षागृह, खेळाची मैदाने वापरताना शून्य कचरा धोरण राबवायचे आहे. त्यांना बुकिंग करताना भाडेदरामध्ये १० टक्के सवलत देण्यात येणार आहे, असे स्वच्छ भारत अभियानाचे समन्वयक तथा महापालिका सहायक आयुक्त विनोद जळक यांनी सांगितले.
मार्चपर्यंत सभागृह ‘बुक’
शहरातील सभागृह, नाट्यगृह, प्रेक्षागृह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी गजबजली आहेत. शाळांची स्नेहसंमेलनेही सुरू आहेत. त्यामुळे प्रेक्षागृह, नाट्यगृहांच्या मार्च २०२३ पर्यंतच्या बहुतांश तारखा नोव्हेंबरमध्येच ‘बुक’ झाल्या आहेत. अद्यापही शाळांकडून बुकिंग सुरू आहे. पाच तास किंवा दिवसभराच्या बुकींगला सर्वाधिक प्राधान्य आहे.
काय करू नये...
- कार्यक्रमाची माहिती प्रदर्शन व सजावटीसाठी प्लास्टिक, फ्लेक्स, पोस्टर्स, चिन्हे
- भेट देण्यासाठी प्लास्टिक, थर्माकोल, फोमचा वापर
- पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिक बाटल्या
- प्लास्टिकचे कटलरी, कप, प्लेट
- जेवणाच्या ठिकाणी प्लास्टिकचे कटलरी, कप, प्लेट
- अन्न वाया घालवू नये
- उरलेले अन्न फेकून देऊ नये
काय करावे...
- कापड, ताग, कागद आदी इको-फ्रेंडली सामग्रीवर सर्व पोस्टर्स चिन्हे छापावित
- स्वागत फलकावर ‘स्वच्छ कार्यक्रम’ (झिरो वेस्ट इव्हेंट) असे स्पष्ट नमूद करावे
- फूट ऑपरेटेड सॅनिटायझर मशिन प्रवेशद्वारावर आवश्यक ठिकाणी ठेवाव्यात
- दिव्यांग व्यक्तींसाठी रँप किंवा व्हिलचेअरची सुविधा असावी
- पाहुण्यांच्या नोंदणीसाठी लॅपटॉप, टॅबचा वापर करावा
- नेमटॅग किंवा सहभागी प्रतिनिधींची नावे दर्शविण्यासाठी कार्डबोर्ड, ज्यूट, कापड वापरावा
- भेट देण्यासाठी कापड, ज्युटच्या वस्तु, रोपे, स्टील वस्तू, कापडी मास्क वापरावे
अत्यावश्यक सूचना
- स्वच्छ भारत अभियान किंवा स्वच्छाग्रह लोगो वापरावा
- पिण्यासाठी काच, स्टीलचे ग्लास, तांबे किंवा बाटली वापरावी
- महिला स्वच्छतागृहामध्ये सॅनिटरी पॅड वेडिंग मशिन असावे
- उरलेले अन्न आश्रम वा स्वयंसेवी संस्थांशी संपर्क करून द्यावे
- कार्यक्रम पत्रिका, कागदपत्रे, प्रकाशने, निमंत्रणासाठी सोशल मीडिया, क्यूआर कोड वापरावा
- ओल्या कचऱ्यासाठी हिरवे व सुका कचऱ्यासाठी निळे डस्टबीन ठेवावेत
शून्य कचरा म्हणजे काय?
- डस्टबिनवर ‘माझा कचरा, माझी जबाबदार’, ‘प्रत्येक दिवशी दोन डस्टबीन’ असे संदेश असावेत
- वॉश बेसिनच्या ठिकाणी पाणी बचत व हात धुणे असे फलक लावावेत
- महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृहाची स्वतंत्र व्यवस्था व फलक असावेत
- सॅनिटरी पॅड गुंडाळण्यासाठी वेस्टपेपर, विल्हेवाटीसाठी सॅनिटरी
वेस्ट लेबलचे लाल डस्टबीन ठेवावेत
- प्रत्येक स्वच्छतागृहांमध्ये स्पर्श न होईल अशा प्रकारे सेन्सर साबण व सॅनिटायझर डिस्पेंसर मशिन असावेत
दृष्टिक्षेपात महापालिकेच्या जागा
नाट्यगृहे, रंगमंदिरे ः ५
उद्याने ः १८४
समाजमंदिरे सुमारे ः ७१
व्यायाम शाळा ः ७२
जलतरण तलाव ः ११
महापालिका आपली आहे. शहर आपले आहे. शहरातील सभागृह आपलीच आहेत. त्यांची स्वच्छता ठेवणे आपले कर्तव्यच आहे. त्यामुळे महापालिकेने भाडेदरात सवलतीचा निर्णय योग्यच आहे. पण, शहरात अनेक छोट्या छोट्या संस्था आहेत. त्यांना मोठ्या सभागृहांचे भाडे परवडत नाही. त्यासाठी छोटी छोटी दोनशे ते तीनशे आसनक्षमतेचे सभागृह निर्माण करावेत. त्यामुळे त्यांचे भाडे छोट्या संस्थांना परवडेल व अधिकाधिक कार्यक्रम होतील.
- पुरुषोत्तम सदाफुले, अध्यक्ष, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद
वर्षभर आमचे विविध कार्यक्रम होत असतात. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नाट्यगृहे, बहुउद्देशीय सभागृहांची आवश्यकता असते. मात्र, त्यांच्या भाडेदर जास्त असल्यामुळे कार्यक्रम घेण्यास मर्यादा येतात. आताच्या दहा टक्के सवलतीच्या योजनेमुळे आयोजकांची आर्थिक बचत होणार आहे. शिवाय, स्वच्छतेबाबत जनजागृती होईल. घनकचरा व्यवस्थापनाची सवय लागेल. शून्य कचरा व्यवस्थापनासाठी भाडेदरात सवलतीचा महापालिकेचा निर्णय अतिशय स्तुत्य आहे.
- प्रा. राजेंद्र सोनवणे, संस्थापक, नक्षत्रांचं देणं काव्यमंच