रहाटणी परिसरात वाहनांची तोडफोड 
सुमारे पन्नास वाहनांचे नुकसान, पोलिसाला धक्काबुक्की करून आरोपीचे पलायन

रहाटणी परिसरात वाहनांची तोडफोड सुमारे पन्नास वाहनांचे नुकसान, पोलिसाला धक्काबुक्की करून आरोपीचे पलायन

Published on

पिंपरी, ता. १ : रहाटणी व पिंपळे सौदागर परिसरात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी टोळक्याने राडा घातला. रस्त्यावर दिसेल त्या वाहनांची तोडफोड केली. रस्त्यावरील दुचाकी ढकलून दिल्या. यामध्ये सुमारे पन्नास वाहनांचे नुकसान झाले. गस्तीवरील एका पोलिसाने आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना धक्काबुक्की करून आरोपी पळून गेले. ज्या रिक्षातून आरोपी आले, ती रिक्षाही चोरीची असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली.
थर्टी फर्स्टच्या मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास चोरीच्या रिक्षातून आलेल्या या आरोपींनी दिसेल त्या दुचाकी, चारचाकी वाहनांना लक्ष्य केले. रहाटणी फाटा, रामनगरमधील भालेराव कॉलनी, रहाटणी चौक, भैय्यावाडी, नखाते वस्ती यासह भारतमाता चौक, गोडांबे चौक तसेच पिंपळे सौदागर भागातील रस्त्यालगत उभ्या केलेल्या वाहनांची तोडफोड केली. यामध्ये मोटार, रिक्षा, टेम्पो, दुचाकी या वाहनांचा समावेश आहे. वाहनांची तोडफोड करण्याबरोबरच रस्त्यात दिसेल, त्या दुचाकी ढकलून दिल्या. तोडफोड व आरडाओरडा करीत आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी सांगवी व वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, आरोपींचा शोध सुरु आहे.
-----------------

नाकाबंदी असतानाही टोळके सुसाट

थर्टी फर्स्ट असल्याने शनिवारी शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. चाळीस ठिकाणी नाकाबंदी केली होती. दीड हजार पोलिस तैनात होते. तरीही पोलिसांना आव्हान देत आलेल्या टोळक्याने वाकड व सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राडा घातला. सुमारे तासभर बिनधास्तपणे हा राडा सुरु होता. जागोजागी नाकाबंदी असल्याचे सांगितले जात असतानाही घटनेनंतर एकही आरोपी पोलिसांच्या हाती न लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
--------------

पोलिसाला धक्काबुक्की करून पसार

भारतमाता चौक ते गोडांबे कॉर्नर या मार्गावर गस्तीवर असलेले पोलिस हवालदार यांना रिक्षातून आरोपी येताना दिसले. ते वाहनांची तोडफोड करीत असल्याने रावते यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्यांच्यावर हात उगारून धक्काबुक्की करीत पळून गेले. त्यानंतर रावते यांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र, ते हाती लागले नाहीत. कासारवाडी स्मशानभूमीजवळ रिक्षा सोडून सर्व आरोपी रेल्वेमार्गाच्या दिशेने पसार झाले.
-------------
रिक्षा चोरीची
ज्या रिक्षातून आरोपी आले, ती (एमएच १४, जीसी ६५७८) या क्रमांकाची रिक्षाही चोरीची असल्याचे समोर आले आहे. याबाबत वाकड पोलिस ठाण्यात २८ डिसेंबरला गुन्हा दाखल आहे.
-------------------


या भागातील तीन रिक्षा टोळक्याने फोडल्या. पावणे दोनच्या सुमारास मोठा आवाज आल्याने आम्ही सर्वजण बाहेर आलो. रिक्षातून आलेल्या चौघांकडे सिमेंटचे गट्टू होते. त्याने तोडफोड करीत होते. तसेच उभ्या असलेल्या दुचाकी रस्त्यावर पाडत होते.
- भैय्यासाहेब गजधने, रा. रामनगर, रहाटणी, नागरिक
------------
फोटो ः 15450

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com